नागपुरात पावणेपाच कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:09 IST2018-02-03T00:05:48+5:302018-02-03T00:09:20+5:30
११ वर्षांपासून चर्चेत असलेल्या पावणेपाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी काही बिल्डर आणि सनदी लेखापाल (सीए) यांची प्रदीर्घ चौकशी केली. या घडामोडीमुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

नागपुरात पावणेपाच कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ११ वर्षांपासून चर्चेत असलेल्या पावणेपाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी काही बिल्डर आणि सनदी लेखापाल (सीए) यांची प्रदीर्घ चौकशी केली. या घडामोडीमुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
प्रकरण शंकरपूर तसेच तत्पूर्वी दाखविण्यात आलेल्या एका जमिनीच्या बनवाबनवीचे आहे. गजानन धाम सहकार नगर येथील रहिवासी सारंग राऊत यांनी गुन्हे शाखेकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना धंतोलीतील गणेश बिल्डर्स लि. चे संचालक नारायण चंडीराम डेमले (सीए), अतुल नारायण डेमले, पहलाज सच्यानी, विजय रामानी, ओम सच्यानी, गौरीशंकर सच्यानी, नानक सोनी आणि मनोज अनकंठवार आदींनी राऊत यांना एक जमीन दाखवली होती. ही जमीन पाच कोटी रुपयात विकत घेण्याचा सौदा राऊत यांनी केला होता. दीड कोटी रुपये अग्रीम दिल्यानंतर करारपत्र झाले. त्या करारपत्रात जमिनीची चतु:सिमा भलतीच दिसत असल्याने राऊत यांनी आक्षेप घेतला. हा सौदा वांद्यात आल्यानंतर गणेश बिल्डर्सचे संचालक पहलाज सच्यानी आणि अतुल डेमले तसेच त्यांच्या साथीदारांनी राऊत यांना कसेबसे शांत करून शंकरपूरला मोक्याची जागा देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर राऊत यांना २ कोटी, १० लाख रुपये मागितले. २० आॅगस्ट २००८ ला नव्याने करारपत्र झाले. त्यानंतर या जमिनीचा सौदाही वादग्रस्त असल्याचे राऊत यांच्या लक्षात आले. सच्यानी आणि डेमलेने तोपर्यंत राऊत यांच्याकडून एकूण ४ कोटी, ८० लाख रुपये घेतले होते. सौदा वादग्रस्त असल्यामुळे राऊत यांनी आपली रक्कम परत मागितली. मात्र, त्यांनी रक्कम परत देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर राऊत यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे वाद वाढला. परिणामी राऊत यांनी गणेश बिल्डर्स लि.चे संचालक नारायण डेमले, अतुल नारायण डेमले, पहलाज सच्यानी, विजय रामानी, ओम सच्यानी, गौरीशंकर सच्यानी, नानक सोनी आणि मनोज अनकंठवार यांच्याविरोधात गुन्हेशाखेकडे तक्रार नोंदवली.
या प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन घडामोडीमुळे पोलीस स्वस्थ होते. नुकतीच या प्रकरणाशी संबंधित गैरअर्जदाराची अटकपूर्व जामीन याचिका रद्द झाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने राऊत यांच्या तक्रारीची दखल घेत सनदी लेखापाल नारायण डेमले, बिल्डर पहलाज सच्यानी आणि त्यांच्या काही साथीदारांना शुक्रवारी दुपारी गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यांची प्रदीर्घ चौकशी झाल्याने शहरातील सनदी लेखापाल तसेच बिल्डर लॉबीत एकच खळबळ उडाली.
चौकशी सुरू आहे...
या प्रकरणात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता प्रकरण कोट्यवधीच्या फसवणुकीचे आहे. त्यामुळे सखोल चौकशी सुरू आहे. सीए आणि बिल्डरांना आम्ही चौकशीसाठी बोलविले. लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली.