अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतले अन् नफ्याच्या नावाखाली ४२.५५ लाख लुबाडले
By योगेश पांडे | Updated: September 1, 2023 16:47 IST2023-09-01T16:46:33+5:302023-09-01T16:47:40+5:30
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतले अन् नफ्याच्या नावाखाली ४२.५५ लाख लुबाडले
नागपूर : अनोखळी व्यक्तीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतल्यावर नफ्याच्या नावाखाली गुंतवणूक करायला लावली आणि ४२.५५ लाखांचा चुना लावला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रफुल्ल रगराव गोंडेकर (३०, आटे ले आऊट, खडगाव रोड) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २० जून रोजी त्यांना ६३७६५११४८८९ या फोनक्रमांक धारकाने ‘एलवाय ऑनलाईन ट्रेडिंग डी १०१’ या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट केले. अनोळखी व्यक्तीने ग्रुपमध्ये समाविष्ट केल्याने त्याची शहानिशा न करता तेथून एक्झिट न होणे गोंडेकर यांना महागात पडले. त्या ग्रुपमध्ये ३५ जण होते व तो गुंतवणुकीबाबत माहिती शेअर करत होता. काही लोकांनी गुंतवणूकीमुळे बंपर फायदा झाल्याचे मॅसेजेस ग्रुपवर टाकले होते. त्यामुळे गोंडेकर यांना गुंतवणूकीवर होणाऱ्या नफ्याबाबत विश्वास बसला.
आरोपीने त्यांना एक लिंक पाठवून संकेतस्थळावर नोंदणी करायला लावली. त्यानंतर त्याने थोडा नफादेखील दिला. त्यानंतर जास्त नफा मिळवून देण्याचे आश्वासन दाखवत आणखी रक्कम गुंतवण्यास लावली. गोंडेकर यांनी तब्बल ४२.५५ लाख रुपये गुंतवले. मात्र आरोपीने त्यांना नंतर कुठलाही नफा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोंडेकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.