राजेश शेगोकारनागपूर : साठच्या दशकाच्या उत्तरार्धात नक्षलबारी या छोट्याशा गावातून पेटलेली ठिणगी महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा अशा राज्यांत भडकत गेली. महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा घनदाट जंगलांमुळे नक्षल्यांसाठी सुरक्षित किल्ला मानला गेला अन् गेल्या चार दशकांपासून नक्षलवादाने येथील सामान्य नागरिक, आदिवासी कुटुंबे आणि विकासाची स्वप्ने सगळेच या संघर्षात भरडले गेले.
नक्षलवाद ही मध्य भारताला अशांत करणारी मोठी समस्या असल्याने तिचा बीमोड करण्यासाठी सरकारने बंदुकीसोबतच विकासाचे सूत्र हाती घेतले. गेल्या साडेतीन वर्षांत नव्या नक्षली भरतीचा अभाव हीच त्या प्रयत्नांची पावती आहे. सुरक्षा यंत्रणांच्या अंदाजानुसार देशात आता केवळ ३०० च्या आसपास सशस्त्र नक्षलवादी उरले आहेत.
गडचिरोलीत तर जेमतेम सहा. प्रभाकरच्या खात्म्यानंतर तेही छत्तीसगडमध्ये पळाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही आकडेवारीच नक्षलवादाच्या उतरत्या कळसाची साक्ष देते असून ३१ मार्चपर्यंत नक्षलमुक्त गडचिरोलीच्या दिशेने दमदार प्रवास सुरू असल्याचे प्रत्यंतरही देत आहे.
माओवादी चळवळीत भरकटलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २२ पुनर्वसन योजना राबवल्या जात आहेत. बंदुकीऐवजी नांगर, औजार आणि रोजगाराची साधने त्यांच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावोगावी रस्ते, पूल, शाळा, आरोग्य केंद्रे उभी राहत आहेत; उद्योगधंद्यांची चाके फिरू लागली आहेत. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य पोलिसांना आधुनिक शस्त्रसज्जता, तांत्रिक बळ आणि प्रभावी समन्वय दिल्याने कारवाया अधिक अचूक ठरत आहेत. गेल्या १५ महिन्यांत ४००हून अधिक नक्षलवादी ठार, याच कालावधीत ताराक्का, भूपतीसारख्या हार्डकोअर नक्षल्यांसह १५०हून अधिक नक्षल्यांनी केलेले आत्मसमर्पण अन् त्यानंतरची त्यांची बदललेली भूमिका या चळवळीलाच वास्तवाचे भान आले आहे याचे दर्शन घडविते.
नक्षलवादाविरोधात सुरू असलेली ही लढाई केवळ बंदुकीची नाही; ती विकास, विश्वास आणि वैचारिक प्रबोधनाचीही आहे. रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांच्या माध्यमातून जेव्हा राज्य लोकांच्या दारी पोहोचते, तेव्हा बंदुकीची भाषा आपोआपच क्षीण होते. पुढील ४० दिवस निर्णायक आहेत. गडचिरोली 'नक्षलमुक्त' झाले, तर तो केवळ सुरक्षा यंत्रणा व प्रशासनाचाच विजय नसेल तो लोकशाहीवरील विश्वासाचा पुनर्जन्म ठरेल.
शेवटचे दोन बुरूज
आता देशाच्या सुरक्षा यंत्रणांचे संपूर्ण लक्ष दोन नावांवर केंद्रित झाले आहे. पहिले नाव म्हणजे चळवळीचा मुपाल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती आणि दुसरे म्हणजे मिशीर बेसरा ऊर्फ सागर. हे दोन नेते म्हणजे नक्षलवादाचे शेवटचे बुरूज मानले जात आहेत.
मुपाल्ला लक्ष्मण राव ऊर्फ 'गणपती'
तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील बिरपूर हे गणपतीचे मूळ गाव. गणपती हा एकेकाळी शाळेत शिक्षक होता. ७० च्या दशकात तो 'पीपल्स वॉर ग्रुप'मध्ये सामील झाला. २००४ मध्ये जेव्हा पीपल्स वॉर ग्रुपचे विलीनीकरण होऊन 'भाकपा (माओवादी)' संघटना स्थापन झाली, तेव्हा तो या संघटनेचा पहिला सरचिटणीस बनला. त्याच्यावर ३ कोटी रुपयांचे बक्षीस आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, सध्या पंचाहत्तरीत असलेला गणपती छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर किंवा अबुझमाडच्या अतिदुर्गम जंगलात असल्याची शक्यता आहे.
मिशीर बेसरा ऊर्फ सागर ऊर्फ श्यामल
झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील मिशीर बेसरा हा नक्षलवाद्यांच्या सर्वात शक्तिशाली 'पॉलीट ब्युरो'चा सदस्य आहे. संघटनेच्या 'सेंट्रल मिलिटरी कमिशन'वर त्याचे वर्चस्व आहे. तो तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत मानला जातो. बेसरावर झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मिळून सुमारे १ कोटी रुपयांचे बक्षीस आहे. बेसरा हा प्रामुख्याने झारखंड-छत्तीसगड सीमेवरील 'बूढा पहाड' किंवा सारंडाच्या जंगलात वावरत असतो. सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन ऑक्टोपस' राबवून त्याचे अनेक गड उद्ध्वस्त केले आहेत, तरीही तो अतिशय सावधगिरीने आपले स्थान बदलत असतो. तो गनिमीकाव्याचा तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते.
Web Summary : Gadchiroli aims to be Naxal-free by March 31st, with development initiatives and surrenders weakening the insurgency. Security forces target remaining leaders, Ganpati and Besra.
Web Summary : गढ़चिरोली का लक्ष्य 31 मार्च तक नक्सल मुक्त होना है, विकास पहल और आत्मसमर्पण से विद्रोह कमजोर हो रहा है। सुरक्षा बल शेष नेता, गणपति और बेसरा को निशाना बना रहे हैं।