नागपुरात आयसीयू बेडअभावी तब्बल ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 03:01 IST2021-05-03T03:01:15+5:302021-05-03T03:01:41+5:30
नागपूरमधील वास्तव

नागपुरात आयसीयू बेडअभावी तब्बल ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरूच आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीनंतरही कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले नाही. एकट्या एप्रिल महिन्यात आयसीयू बेडअभावी ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सप्टेंबर २०१९ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ऑक्सिजनच्या ४०० खाटा वाढवून १००० होणार होत्या. परंतु कोणीही गांभीर्याने घेतले नाही. सध्या मेडिकलमध्ये २४५, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ९० तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत सुमारे १५ आयसीयू बेड आहेत. शासकीय रुग्णालयात केवळ ३५० आयसीयू बेडची व्यवस्था आहे. परिणामी, १ ते २७ एप्रिलदरम्यान ‘एचडीयू’ वॉर्डात ३६५ कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत.
कॅज्युअल्टीमधील मृत्यूला जबाबदार कोण?
मेडिकलमध्ये एप्रिल महिन्याच्या २७ तारखेपर्यंत ९८७ बाधितांचे मृत्यू झाले. यातील आयसीयूमध्ये ४८५ रुग्णांचे जीव गेले. धक्कादायक म्हणजे, उपचारासाठी आलेल्या १२८ रुग्णांचा मृत्यू कॅज्युअल्टीमध्ये झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धक्कादायक आकडेवारी
विभाग मृत्यू टक्केवारी
आयसीयू ४८५ ३९.५९%
कॅज्युअल्टी १२८ १०.४५%
प्रिसम्पटिव्ह ०९ ०.७३%
एचडीयू ३६५ २९.८०%
ब्रॉट डेड २३८ १९.४३%