कापसाच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट; दरवाढीची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2023 08:00 IST2023-02-17T08:00:00+5:302023-02-17T08:00:07+5:30

Nagpur News कापसाचे दर प्रति क्विंटल आठ हजार रुपयांच्या आसपास घुटमळत असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी अतिशय संथगतीने कापूस विक्री करीत आहेत.

35 to 40 percent reduction in cotton production; Still waiting for price hike | कापसाच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट; दरवाढीची प्रतीक्षा कायम

कापसाच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट; दरवाढीची प्रतीक्षा कायम

ठळक मुद्देउत्पादन ३७५ ऐवजी २९० लाख गाठींवर येणार

सुनील चरपे

नागपूर : देशातील कापसाचे पेरणीक्षेत्र वाढले असले तरी प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन किमान ३५ ते ४० टक्क्यांनी घटले आहे. ‘सीएआय’ने यावर्षी देशात ३७५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा तसेच त्यांचा हा आकडा कमी हाेत असला तरी उत्पादन २९० ते ३०० लाख गाठींवर स्थिरावणार आहे, अशी माहिती बाजारतज्ज्ञांनी दिली. कापसाचे दर प्रति क्विंटल आठ हजार रुपयांच्या आसपास घुटमळत असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी अतिशय संथगतीने कापूस विक्री करीत आहेत.

देशभरात मागील वर्षीच्या तुलनेत सन २०२२-२३ च्या हंगामात कापसाचे पेरणीक्षेत्र १० लाख हेक्टरने वाढल्याने कापसाच्या उत्पादनात वाढ हाेणार असल्याचा टेक्सटाईल व गारमेंट इंडस्ट्रीजकडून केला जात आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक या माेठ्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये प्रतिकूल हवामान व अतिमुसळधार पावसामुळे तर पंजाब, हरयाणा, राजस्थान या छाेट्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बाेंडअळीमुळे कापसाचे किमान ३५ ते ४० टक्के नुकसान झाले आहे. गुजरात, तामिळनाडू व ओडिशा या राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन समाधानकारक असून, उत्पादकतेत वाढ झाल्याने तेथील शेतकरी व बाजार तज्ज्ञांनी सांगितले.

‘सीएआय’चा अंदाज

‘काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया’(सीएआय)ने सन २०२२-२३ या कापूस वर्षात देशभरात ३७५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. बाजारपेठेतील कापसाची घटती आवक लक्षात घेत ‘सीएआय’ने त्यांचा कापूस उत्पादनाचा अंदाज ३७५ वरून ३६५, ३६५ वरून ३४४, ३४४ वरून ३३९ आणि १३ फेब्रुवारी राेजी ३२१.५० लाख गाठींवर आणला आहे. येत्या सहा महिन्यांत ‘सीएआय’चा आकडा आणखी खाली येणार आहे.

आवक २५.६५ टक्क्यांनी घटली

सन २०२१-२२ च्या तुलनेत सन २०२२-२३ मध्ये पहिल्या चार महिन्यांत बाजारपेठेतील कापसाची आवक २५.६५ टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १ ऑक्टाेबर ते २२ नाेव्हेंबर २०२२ या काळात कापसाची आवक १०.१५ टक्क्यांनी घटली हाेती. २ जाने. २०२३ पर्यंत १९.५८ टक्के, ३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत २४.९० टक्के आणि १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत २५.६५ टक्क्यांनी घटली आहे.

२४.३० लाख गाठी कापूस आयात

सन २०२१-२२ मध्ये कापसाचे उत्पादन ३०७.६० लाख तर वापर ३१८ लाख गाठींचा हाेता. या काळात ४३ लाख गाठी कापसाची निर्यात तर १४ लाख गाठी कापूस आयात करण्यात आला हाेता. सन २०२२-२३ मध्ये कापसाची मागणी व वापर किमान ३०० लाख गाठींचा असेल. ऑक्टाेबर २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात ३० लाख गाठी कापसाची निर्यात तर १२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याची माहिती ‘सीएआय’ने दिली. वास्तवात, १ ऑक्टाेबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ या काळात २४.३० लाख गाठी कापूस तसेच याव्यतिरिक्त माेठ्या प्रमाणात सुताची आयात करण्यात आल्याने कापसाचे दर कायम दबावात आहेत.

Web Title: 35 to 40 percent reduction in cotton production; Still waiting for price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस