विदर्भात २८ कोटींच्या ३,४७० वीजचोऱ्या उघडकीस; भरारी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:30 IST2025-04-16T15:29:46+5:302025-04-16T15:30:16+5:30
Nagpur : अकोला परिमंडलात सर्वाधिक वीजचोऱ्या

3,470 electricity thefts worth Rs 28 crores exposed in Vidarbha
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या अंतर्गत नागपूर प्रादेशिक विभागातील भरारी पथकांनी एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षात विदर्भातील ११,१०२ ग्राहकांच्या वीजजोडण्यांची तपासणी केली. यात २८ कोटी ४४ लाख रुपये मूल्याच्या तब्बल ३,४७० वीजचोऱ्या उघड झाल्या.
या भरारी पथकांनी वीजचोरी करणाऱ्या विदर्भातील या ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ (सुधारित २००७) च्या कलम १३५ अन्वये कारवाई केली. विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ अन्वये व इतर १,७८८ प्रकरणांमध्ये १७ कोटी ७९ लाख रुपयांची अनियमितता आढळली. या कालावधीत वीजचोरी आणि अनियमिततेपोटी एकूण ४६ कोटी २४ लाख रुपये रकमेचे निर्धारण करण्यात आले आणि त्यापैकी ३९ कोटी ८९ लाख रुपये संबंधित ग्राहकांकडून वसूल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, वीजचोरीची रक्कम न भरलेल्या ग्राहकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये २८८ वीज ग्राहकांवर वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अकोला परिमंडलात सर्वाधिक वीजचोऱ्या
- अकोला परिमंडलात सर्वाधिक १५.८१ कोटी रुपयांच्या १,०२४ वीजचोऱ्या, ६ अनियमितता आणि ४७२ इतर प्रकरणे उघडकीस आली.
- नागपूर परिमंडलात १४.१४ कोटी रुपयांच्या ८१५ वीजचोऱ्या, ४१ अनियमितता आणि १६१ इतर प्रकरणे उघडकीस आली.
- अमरावती परिमंडलात ८.७७ कोटींच्या ६७५ वीजचोऱ्या, ७ अनियमितता आणि ५०५ इतर प्रकरणे उघडकीस आली.
- चंद्रपूर परिमंडलात ४.५२ कोटींच्या ४८९ वीजचोऱ्या, ८ अनियमितता आणि १०७इतर प्रकरणे उघडकीस आली.
- गोंदीया परिमंडलात १.९७ कोटींच्या ४६७ वीजचोऱ्या, ६ अनियमितता व १६५ इतर प्रकरणे उघडकीस आली.