वाठोड्यात होणार ३४५ बेडचे 'मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल', जागा देण्यास नासुप्रची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 14:04 IST2023-07-15T14:03:26+5:302023-07-15T14:04:08+5:30
विस्तृत प्रकल्प अहवाल तयार

वाठोड्यात होणार ३४५ बेडचे 'मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल', जागा देण्यास नासुप्रची मंजुरी
नागपूर : वाठोडा येथील खसरा नं १५७ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर ३४५ बेडचे मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल उभारण्यात येणार आहे. या हॉस्पिटलसाठी संबंधित जागा देण्यास शुक्रवारी नागपूर सुधार प्रन्सास विश्वस्त मंडळाच्या बैठकीत संमती देण्यात आली.
या प्रकल्पासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी नासुप्रवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार बैठकीत डीपीआर सादर करण्यात आला. या डीपीआरनुसार प्रकल्पाची किंमत १८७.७१ कोटी ७१ रुपये आहे. हे काम महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत समाविष्ट करून प्रकल्पास शासन स्तरावर मान्यता प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रधान सचिव नगरविकास विभाग-२ यांना विनंती करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी राज्य सरकारकडून स्थगनादेश असून, ही स्थगिती उठविण्याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
लेंड्रा येथील कृषी विद्यापीठाच्या जागेवर साकारणार ‘शिवसृष्टी’
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टी निर्माण करण्याचे निर्देश नागपूर सुधार प्रन्यासला दिले होते. त्यानुसार नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने प्रस्ताव सादर केला होता. महाराष्ट्र गौरव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग दर्शविणारा शिवसृष्टी प्रकल्प पुणे शहरात उभारण्यात आला आहे. त्याच धर्तीवर नागपुरात लेंड्रा येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पाच एकर जागेवर शिवसृष्टी साकारण्यात येणार आहे. येथे कृषी विद्यापीठाची पाच एकर जागा आहे. या अंतर्गत येथे शिवरायांच्या १४ किल्ल्यांची प्रतिकृती, लाइट व साउंड शो, महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग, छायाचित्रे व स्थलचित्रे राहतील. या प्रकल्पासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्याचे अधिकार नासुप्र सभापतींना देण्यात आले.
सोमलवाडा येथे गरिबांसाठी रोगनिदान केंद्र
- मौजा सोमलवाडा, थापर ले-आउट येथील सार्वजनिक उपयोगाच्या १३५४ चौरस मीटर जागेवर नासुप्रतर्फे २५२ चौरस मीटरवर बहुद्देशीय हाॅलचे बांधकाम खासदार निधी अंतर्गत करण्यात आले आहे. उपरोक्त नमूद जागेचा लिलाव करण्याकरिता जाहीर सूचना आमंत्रित करण्यात आली. मात्र, यास नागरिकांचा प्रतिसाद प्राप्त झाले नाही. यामुळे सदर जागेवरील नागपूर सुधार प्रन्यासद्वारे गरीब व गरजू नागरिकांकरिता रोगनिदान व तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.