नागपुरात ‘मणप्पुरम गोल्ड’मधून ३१ किलो सोने लुटले
By Admin | Updated: September 29, 2016 02:06 IST2016-09-29T02:06:15+5:302016-09-29T02:06:15+5:30
उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरात दिवसाढवळ्या शस्त्रांनी सज्ज असलेल्या दरोडेखोरांनी मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडा

नागपुरात ‘मणप्पुरम गोल्ड’मधून ३१ किलो सोने लुटले
५.६० कोटीचे दागिने, ३ लाख रोख : ६ दरोडेखोरांचा समावेश
नागपूर : उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरात दिवसाढवळ्या शस्त्रांनी सज्ज असलेल्या दरोडेखोरांनी मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडा घालून ३१ किलो सोन्याचे दागिने लुटून नेले. या दागिन्याची एकूण किंमत ५ कोटी ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. (आजच्या बाजारभावानुसार सोने व दागिन्यांची एकूण किंमत ९ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपये इतकी होईल) नागपूर शहराच्या अलीकडच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पोलीसही हादरले आहेत. दरोडेखोरांच्या शोधार्थ उपराजधानीत सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.
जरीपटका मुख्य मार्गावरील भीम चौकात कुकरेजा कॉम्प्लेक्स आहे. या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर मणप्पुरम गोल्डचे कार्यालय आहे. येथे नागरिकांना दागिने गहाण ठेवून कर्ज दिले जाते. बुधवारी दुपारी ४.१५ वाजता कार्यालयात तीन कर्मचारी व सहा ग्राहक हजर होते. कार्यालयाचे चॅनल गेट नेहमी लागलेले असते. ग्राहकांनी बेल वाजवल्यानंतरच ते उघडले जाते. एका युवकाने बेल वाजवताच महिला कर्मचाऱ्याने गेट उघडण्यापूर्वी त्याला तोंडावरील रुमाल हटवण्यास सांगितले. रुमाल हटवताच महिलेने गेट उघडले. त्याच्या मागेच त्याचा दुसरा साथीदारही आला. महिला कर्मचारी काही समजण्यापूर्वीच एकूण सहा दरोडेखोर आत घुसले. त्यापैकी तीन-चार जणांनी पिस्तुल काढले. त्यांनी कर्मचारी व ग्राहकांना पिस्तुल दाखवून एका भिंतीच्या आडोशाला खाली बसण्यास फर्मावले. मान खाली करण्यास सांगितले. मान वर केल्यास गोळी घालू, अशी धमकी दिली. पिस्तुलाच्या धाकामुळे कर्मचारी व ग्राहक घाबरले. ते दरोडेखोर जे सांगतील, त्याप्रमाणे करू लागले. दरोडेखोरांपैकी दोघेजण कर्मचारी व ग्राहकांवर पाळत ठेवून होते. इतर दरोडेखोर लॉकर रुममध्ये शिरले होते. त्यांनी लॉकरमधून ३१ किलो सोन्याचे दागिने आणि ३ लाख रुपये रोख गुंडाळून घेतले.
लॉकर रूममधून निघाल्यानंतर दरोडेखोरांनी ग्राहक व कर्मचाऱ्यांना धमकावत लॉकर रूममध्ये चालण्यास सांगितले. सर्वांकडून मोबाईल हिसकण्यात आले होते. आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकीही ते देत होते. लॉकर रूम बाहेरून बंद करून २० ते २५ मिनिटात सर्वच दरोडेखोर पसार झाले. या घटनेमुळे ग्राहक व कर्मचारी घाबरले होते. काही वेळाने ग्राहकांनी जोरजोरात दार ठोठावले. दरम्यान कर्मचाऱ्यांनी लॉकरची तार कापून सायरन वाजविला. या कार्यालयात बऱ्याचदा अकारण सायरन वाजलेला आहे. त्यामुळे सुरुवातीला परिसरातील नागरिकांनी सायरनच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान एक ग्राहक दागिने सोडविण्यासाठी तेथे पोहचला. चॅनेल गेट उघडे असल्यामुळे ग्राहक आतमध्ये आला. त्याला आतून आवाज येत असल्यामुळे त्याने बंद असलेले दार उघडले असता त्याला आतमध्ये घाबरलेले ग्राहक व कर्मचारी दिसले व त्यानंतर या ठिकाणी मोठा दरोडा पडल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर कार्यालयातून लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त संतोष रास्तोगी, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अभिनाश कुमार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस आयुक्तांनी तात्काळ संपूर्ण नागपुरात नाकाबंदीचे आदेश दिले होते. परंतु तूर्त कोणताही दरोडेखोर गवसला नाही.
ग्राहकांनी केली गर्दी
- दरोड्याची माहिती होताच कार्यालयात ग्राहकांनी एकच गर्दी केली. यात महिलाही मोठ्या संख्येने होत्या. या महिलांनी दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले होते व कर्जाची पावती घेऊन त्या दागिने सोडविण्यासाठी आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना कार्यालयाबाहेरच रोखले.
चोरी गेलेल्या सोन्याचा विमा
जरीपटका शाखेतून चोरी गेलेल्या सोन्याचा विमा होता. त्यामुळे ग्राहकांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी माहिती मणप्पुरम फायनान्स लि.च्या व्यवस्थापनाने दिली आहे.
सुरक्षेची उपाययोजना नाही
मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयात मौल्यवान दागिने व रोख रक्कम ठेवली जात असतानाही येथे सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना नव्हती. कार्यालयात सुरक्षेच्या नावावर फक्त सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. आठ महिन्यांपासून चौकीदारही नाही. यावरून या कार्यालयाने सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. ग्राहकांची विचारपूस करून प्रवेश दिला जात होता. अशात आता सहा दरोडेखोरांनी सहजपणे प्रवेश केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.