वर्षभरात नागपूर जिल्ह्यात २७६ बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:05 IST2019-06-26T00:01:00+5:302019-06-26T00:05:02+5:30
कुपोषणासह बालमृत्यूची समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचा राज्य सरकारचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात गेल्या वर्षभरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील २७६ बालमृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

वर्षभरात नागपूर जिल्ह्यात २७६ बालमृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुपोषणासह बालमृत्यूची समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचा राज्य सरकारचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात गेल्या वर्षभरात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील २७६ बालमृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
मे महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात १४३ बालके अतितीव्र तर ७०२ बालके मध्यम तीव्र कुपोषित आढळून आली. अशाप्रकारे ८४८ बालके कुपोषित आढळून आली. नागपूर शहरातील झोपडपट्ट्यातील कुपोषित बालकांची संख्या विचारात घेता हा आकडा १५०० हून अधिक आहे.मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे याची माहिती मिळाली नाही. तसेच महिला व बालकल्याण विभागाकडे याबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचे महिला व बाल कल्याण विभागाच्या उपायुक्त रंजना लाडे यांनी सांगितले.
राज्यातील आदिवासी तसेच दुर्गम भागातील नवजात तसेच लहान मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी शासनाने अंगणवाड्या सुरू केल्या होत्या. या अंगणवाड्यामध्ये एकात्मिक बाल विकास योजनेच्या माध्यमातून नवजात तसेच कुपोषित बालकांची निगा राखली जाते. त्यांचे कुपोषण दूर करण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना करून अशा मुुलांना पोषण आहार दिला जातो. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर आहे.
जिल्ह्यात दोन हजारावर अंगणवाड्या कार्यरत आहेत. गेल्या मे महिन्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये तीव्र कुपोषित बालकांच्या श्रेणीत १४३ तर मध्यम कुपोषितच्या श्रेणीत ७०५ बालके आढळून आली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही आकडेवाडी कमी असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने केला आहे. महिला व बाल कल्याण आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. अतितीव्र कुपोषित बालकांवर ग्राम बाल विकास केंद्रात उपचार होत आहे. शासनातर्फेअंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यात आले असून, केंद्राच्या माध्यमातून आठवड्याला अंगणवाडीतील सर्व बालकांचे वजन आणि उंची नोंदविण्यात येते. त्यात अतितीव्र व मध्यम कुपोषित बालकांचे वर्गीकरण करण्यात येते. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक यांच्याकडून दोन्ही वर्गवारीतील बालकांची तपासणी होते. यातील अतितीव्र कुपोषण श्रेणीत असलेल्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश दिला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली.
तालुकानिहाय कुपोषित बालके
तालुका अतितीव्र कुपोषित मध्यम कुपोषित
रामटेक १४ ५८
सावनेर १५ ११७
उमरेड ०९ १०
हिंगणा ३४ १२०
कुही १३ ३६
नागपूर ०७ १०२
काटोल ०८ १८
पारशिवनी ०८ ५६
कळमेश्वर १३ ५८
भिवापूर ०४ १४
मौदा ०० १४
नरखेड ०२ ०८
कामठी ०८ ६४
एकूण - १४३ ७०५
कुपोषित बालकांची संख्या घटली
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अतितीव्र व मध्यम तीव्र कुपोषित बालकांची संख्या निम्म्याने घटली आहे. एनर्जी डेन्स न्यूट्रेशन फूड हा अतितीव्र कुपोषित बालकांसाठी उपयोगी ठरत आहे. तसेच विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
भागवत तांबे, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद
झोपडपट्ट्यात कुपोषित बालकांची समस्या गंभीर
सर्वेक्षणानंतर शहरी भागात दर १० हजार मुलांमागे तीव्र कुपोषणाचे प्रमाण ४ ते ५ टक्के आणि मध्यम कुपोषणाचे प्रमाण ८ ते १० टक्के असल्याचे उघडकीस आले आहे. नागपूर शहरात ४४६ झोपडपट्ट्या आहेत. तेथील स्थिती विदारक आहे. कामानिमित्त ग्रामीण भागातून शहरी भागात येणारा लोंढा वाढतच आहे. हा कामगारवर्ग झोपडपट्ट्यांमध्येच वास्तव्यास असतो. त्या ठिकाणची लोकसंख्या वाढत आहे. मात्र सोयीसुविधांचा अभाव असल्याने या ठिकाणचे कुपोषण वाढत आहे. या झोपडपट्ट्यांमधील ९० ते ९५ टक्के महिलांची प्रसूती डागा रुग्णालयात होत असली तरीही कुपोषणामुळे नवजात अर्भकांच्या मृत्यूंचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. तसेच महिन्याला ० ते १ महिना वयोगटातील ३५ ते ४० बालके कुपोषित आढळून येतात. परंतु कुपोषित बालकांची निगा करणारी सक्षम यंत्रणा राबविण्याची गरज आहे.