राज्यातील मोठ्या कर्जदारांकडे २७ हजार कोटी थकीत !
By Admin | Updated: July 20, 2014 01:21 IST2014-07-20T01:21:33+5:302014-07-20T01:21:33+5:30
संपूर्ण देशात सरकारी, खासगी आणि वित्तीय संस्थांचे ४०८५ मोठ्या कर्जदार उद्योजकांकडे ७०,३६७ कोटींचे कर्ज थकीत आहे. थकीत कर्जदारांवर फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी,

राज्यातील मोठ्या कर्जदारांकडे २७ हजार कोटी थकीत !
नागपूर : संपूर्ण देशात सरकारी, खासगी आणि वित्तीय संस्थांचे ४०८५ मोठ्या कर्जदार उद्योजकांकडे ७०,३६७ कोटींचे कर्ज थकीत आहे. थकीत कर्जदारांवर फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव बी. एन. जगदीश शर्मा यांनी लोकमतशी बोलताना केली. बँकिंग विकासासाठी सरकारने गावागावांमध्ये शाखा सुरू कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
५० कोटीं लोकांचे
बँकेत खाते नाही
शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ जुलै १९६९ रोजी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. गेल्या ४५ वर्षांची तुलना केल्यास १९६९ मध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या ८२६८ शाखा होत्या. २०१४ मध्ये ८५ हजार शाखा आहेत. ठेवी ८० लाख कोटी तर कर्जे ६२ लाख कोटींवर गेली आहे. सध्या बँकांचे ६० कोटी ग्राहक आहेत तर ५० कोटी लोकांचे बँकेत खाते नाही. ठेवींमध्ये ७५ टक्के रक्कम मध्यमवर्गीयांची आहे. त्यांची रक्कम बुडवायला निघालेल्या उद्योजकांची संपत्ती ताब्यात घेऊन त्यांना अटक करणे हाच एकमेव मार्ग आहे. पण त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याची सरकारकडे इच्छाशक्ती नाही. महत्त्वपूर्ण पावले अजूनही उचललेली नाहीत. सरकार कॉर्पोरेट क्षेत्राला परवानगी देत आहेत. बँकिंग इंडस्ट्रीमध्ये लूट सुरू आहे. सामान्यांचा पैसा मोठे उद्योजक घशात टाकत असून सरकार देशातील बँकिंग क्षेत्रच उद्ध्वस्त करायला निघाल्याची टीका शर्मा यांनी केली.
आणखी कर्ज वसुली लवाद हवे
शर्मा यांनी सांगितले की, केंद्र सरकारने आणखी सहा कर्ज वसुली लवाद सुरू करण्याची घोषणा केली. एवढे पुरेसे नसून आणखी लवाद सुरू करण्याची गरज आहे. थकीत कर्जदारांची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. बँकांना ही कर्जे वसूल करणे शक्य नाही. न्यायालयात ८ लाख ४० हजार ६९१ प्रकरणे तर कर्ज वसुली लवादाकडे १३,४०८ प्रकरणे प्रलंबित आहेत. असोसिएशनने २०१३ मध्ये ५० मोठ्या थकबाकीदारांची यादी प्रकाशित केली होती. त्यांच्याकडे जवळपास ४० हजार कोटींची थकीत कर्जे होती. मे २०१४ मध्ये प्रकाशित केलेल्या यादीत ४०० मोठ्या थकबाकीदारांकडे ७० हजार कोटींचे कर्ज थकीत होते.(प्रतिनिधी)
नोंद नसलेली कर्जे ५ लाख कोटींच्या घरात
एकूण थकबाकीदारांपैकी महाराष्ट्रात १०७६ कर्जदारांनी २६,९२० कोटींचे कर्ज चुकते केलेले नाही. अर्थात देशातील थकीत खातेदारांपैकी एकूण २५ टक्के खातेदार महाराष्ट्रात असून एकूण कर्जापैकी ३० ते ३३ टक्के रक्कम त्यांनी बुडविली आहे. अशांविरोधात बँकांनी दावे दाखल केले आहे. जाणीवपूर्वक कर्ज थकविणाऱ्या खातेदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने बँकांसमोर संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार शहरातील शाखांमध्ये सर्वाधिक थकीत कर्जे आहेत. देशातील कर्जदारांची तर कागदोपत्री नोंद आहे. पण नोंद नसलेल्यांकडे ५ लाख कोटींच्या घरात कर्जे असल्याची माहिती आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, २ लाख कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत.