नागपूर विभागात वर्षभरात शेतकऱ्यांची २५१ आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:10 IST2020-01-25T00:08:39+5:302020-01-25T00:10:19+5:30
नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

नागपूर विभागात वर्षभरात शेतकऱ्यांची २५१ आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा घटत असून २०१९ मध्ये वर्षभरात २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. यापैकी ४१ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकारांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यासंदर्भात विचारणा केली होती. वर्ष २०१५ ते २०१९ या कालावधीत नागपूर विभागात किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ १०५ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली तर तब्बल २९.०८ टक्के म्हणजेच ७३ प्रकरणे अपात्र ठरली. तर तेवढीच प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र कुटुंबीयांना एकूण १ कोटी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली.
२०१५ मध्ये सर्वाधिक आत्महत्या
प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१५ ते २०१९ या ५ वर्षांच्या कालावधीत नागपूर विभागात तब्बल १ हजार ५९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ९०१ म्हणजेच ५६.६० टक्के प्रकरणे मदतीसाठी प्राप्त ठरली तर ६१७ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले. तर ७४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
सप्टेंबर, जून महिन्यात सर्वाधिक आत्महत्या
२०१९ साली झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक ३० आत्महत्या या सप्टेंबर महिन्यात झाल्या. तर त्याखालोखाल जून महिन्यात २८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. ऑगस्ट व नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी २४ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.