25,000 bags of red chillies landed in Kalmana market | कळमना बाजारात लाल मिरचीची २५ हजार पोती उतरली

कळमना बाजारात लाल मिरचीची २५ हजार पोती उतरली

ठळक मुद्देआवक वाढल्याने भाव घसरण्याची शक्यता व्यापाऱ्यांची सुरू झाली लगबग

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या सोमवारी कळमना बाजारात लाल मिरचीची २५ हजार पोती उतरली आहे. मिरचीची खेप आणखीन उतरणार असल्याने मिरचीचे भावही घसरणार असल्याचे भाकीत व्यापारी वर्तवत आहेत. त्याच अनुषंगाने आतापासूनच व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या भिवापुरी लाल मिरची बाजारात उतरायला लागली आहे. यासोबतच अन्य उत्पादक क्षेत्रातूनही लाल मिरचीचे आगमन मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना येथील मिरची बाजारात व्हायला लागले आहे. सद्यस्थितीत ही आवक सामान्य मानली जात असून, डोमेस्टिक, एक्सपोर्टर्स व स्टॉकिस्ट्सकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने लाल मिरचीचे दर ५-७ रुपयांनी वाढले आहेत. मात्र, १५ मार्च नंतर लाल मिरचीची आवक वाढल्यावर हे दर कमी होतील, असे भाकीत ठोक व्यापाऱ्यांकडून होत आहे.

कळमना येथे प्रत्येक सोमवारी शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी केली जाते. त्याच अनुषंगाने सोमवारी कळमना येथे २५ हजार पोती लाल मिरचीचे उतरली. यात भिवापूरसह अन्य स्थानिक शेतकऱ्यांचे ७ हजार पोती, चिखली-बुलडाणा-राजुरा आदी महाराष्ट्रातील अन्य ठिकाणांवरून ७ हजार आणि आंध्रप्रदेश येथील गुंटूर, खम्ममचे १० ते १२ हजार लाल मिरचीच्या पोत्यांचा समावेश असल्याचे कळमना मिरची बाजारातील ठोक व्यापारी संजय वाधवानी यांनी सांगितले. यंदा लाल मिरचीचे उत्पादन उत्तम झाल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात आवक वाढणार असल्याचेही ते म्हणाले.

सद्यस्थितीत १२० ते १६० रुपये किलो

भिवापूर, मांढळ येथील रोशनी लाल मिरची होलसेलमध्ये १२० ते १४० रुपये, राजुरा येथील देवनूर डिलक्स लाल मिरची १३० ते १६० रुपये, एण्डो-५ लाल मिरची १३० ते १५० रुपये, ३४१ ग्रेड लाल मिरची १३० ते १६० रुपये,खम्मम/गुंटूर ची तेजा मिरची १४० ते १५५ रुपये, ३३४ ग्रेडची लाल मिरची १२० ते १२५ रुपये किलो दराने सद्य:स्थितीत विकली जात आहे. हे दर येत्या काळात आवक वाढल्यावर घसरण्याची शक्यता आहे.

ओरिजनल भिवापुरी मिरची महाग

ओरिजनल भिवापुरी लाल मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने, ही मिरची २०० रुपये किलो दराने विकली जात असल्याचे मिरची उत्पादक शेतकरी नारायण चौधरी यांनी सांगितले. भिवापुरी हायब्रिडचे दरही २०० रुपये किलो सुरू आहे. कमी उत्पादन क्षमता असल्याने शेतकरी ओरिजनल भिवापुरीऐवजी हायब्रिड लाल मिरचीचे पीक घेण्यावर भर देत आहेत. विशेष म्हणजे हिरवी भिवापुरी मिरची प्रारंभिक अवस्थेतच तोडून देशाच्या अन्य भागात विकली जात असल्याने, ओरिजनल भिवापुरी मिरचीचा तुटवडा निर्माण झाला आहे. ओरिजनलला जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) मिळाल्यावरही कृषी विद्यापीठाकडून या मिरचीचे उत्पादन वाढविण्याच्या अनुषंगाने अनुसंधान केले जात नसल्याने शेतकरी हायब्रिडकडे आकर्षित होत असल्याचे नारायण चौधरी म्हणाले.

Web Title: 25,000 bags of red chillies landed in Kalmana market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.