Nagpur: रेल्वे स्थानकावर २५ सेकंदाचा थरार, रेल्वेच्या धाडसी निरीक्षकांनी काळाला परतवले
By नरेश डोंगरे | Updated: December 21, 2024 22:48 IST2024-12-21T22:47:58+5:302024-12-21T22:48:22+5:30
Nagpur News: बराच वेळ फलाटावर रेंगाळल्यानंतर अचानक तो धावत सुटला. त्याला पाहून मृत्यूने जबडा उघडला अन् तो प्रवासी त्यात अडकला. मात्र, देवदुताने धाव घेतली. त्याला मृत्यूच्या जबड्यातून ओढून काढले.

Nagpur: रेल्वे स्थानकावर २५ सेकंदाचा थरार, रेल्वेच्या धाडसी निरीक्षकांनी काळाला परतवले
- नरेश डोंगरे
नागपूर - बराच वेळ फलाटावर रेंगाळल्यानंतर अचानक तो धावत सुटला. त्याला पाहून मृत्यूने जबडा उघडला अन् तो प्रवासी त्यात अडकला. मात्र, देवदुताने धाव घेतली. त्याला मृत्यूच्या जबड्यातून ओढून काढले. आज सकाळी सव्वासातच्या सुमारास येथील रेल्वे स्थानकावर घडलेल्या २५ सेकंदाच्या या थराराने अनेक जण शहारले.
नेहमीप्रमाणे गाडी क्रमांक ११०४५ दीक्षाभूमी एक्सप्रेस सकाळी सव्वासातच्या सुमारास नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर येऊन थांबली. काही प्रवासी गाडीतून खाली उतरले आणि अनेक प्रवासी गाडीत शिरले. दरम्यान, गाडीचा नियोजित वेळ पूर्ण झाल्यानंतर सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी आणि १४ सेकंदानी गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. तोपर्यंत अनेक जण फलाटावर रेंगाळत होते. काही जण गप्पा मारत होते. गाडी सुटल्यानंतर अनेकांनी दाराकडे धाव घेतली. दोघे पुढून धावत आले. त्यातील एक जण कसा बसा आत शिरला. दुसऱ्या जाडजूड व्यक्तीला दारातून आत जाणे शक्य होत नव्हते. तशात मागून एक तिसरा प्रवासी आला. त्यानेही दाराचा हॅण्डल पकडून धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीत चढताना त्याचा पाय घसरला अन् तो गाडी तसेच फलाटाच्या मध्ये चाचपडत सरपटत जाऊ लागला. काय होऊ शकते, त्याची कल्पना आल्याने अनेकांनी श्वास रोखला. दरम्यान, त्या व्यक्तीच्या अगोदर गाडीत चढण्याचे प्रयत्न करणाऱ्या 'त्या' दुसऱ्या व्यक्तीने त्याला फलाटावर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ते शक्य झाले नाही. उलट तोच व्यक्ती फलाटावर खाली पडला.
नेमक्या वेळी देवदूत बणून वाणिज्य विभागाचे मुख्य निरीक्षक महेश वाघमारे जिवाची पर्वा न करता धावत आले. त्यांनी खाली पडलेल्या व्यक्तीला चुकवत फलाट आणि गाडीच्या गॅपमध्ये अडकलेल्या प्रवाशाला खेचून काढले. ते आणि तो प्रवासी दोघेही फलाटावर पडले. तोपर्यंत गाडीने वेग पकडला होता. ती धडधडत पुढे निघून गेली. ईकडे ७ वाजून १६ मिनिटांनी आणि १९ सेकंदांनी सुरू झालेला आणि अनेकांच्या शरिरावर काटा उभा करणारा हा थरार २५ सेकंदानंतर थांबला. फलाटावरच्या अनेक प्रवाशांनी तिकडे धाव घेतली. तो प्रवासी सुखरूप होता मात्र काळाच्या जबड्यातून परतल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याचे अवसान गळाल्यामुळे तो सून्न झाला होता. तिकडे देवदूत बणून आलेल्या महेश वाघमारे यांनाही कसल्याच प्रकारची दुखापत झाली नव्हती.
अनेकांकडून काैतूक
थेट काळालाच परतवून लावणाऱ्या वाघमारे यांचे धाडस बघून रेल्वे स्थानकावरच्या अनेक प्रवाशांनी त्यांचे काैतुक केले. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही घटना माहित झाल्यानंतर त्यांनीही वाघमारेंना शाबासकीची थाप देऊन त्यांची प्रशंसा केली.