लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रेल्वेच्या रिझर्व्हेशन सिस्टीमला पोखरून प्रवाशांच्या हक्काचे कन्फर्म तिकिट गिळंकृत करण्यासाठी देशभरात तब्बल अडीच कोटी फेक आयडी (बोगस ओळखपत्र) चा वापर होत होता. हा खळबळजनक प्रकार उघड झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने 'दलाल-विभीषण युती'वर घाव घालून सर्व फेक आयडी ब्लॉक केले. शिवाय 'तत्काळ रिझर्व्हेशन'साठीही आता ओटीपीचे अस्त्र उपसण्यात आले आहे. आधी गणेशोत्सव, दिवाळी, दसरा यांसारख्या सणासुदीच्या काळात कन्फर्म तिकीट मिळविणे कठीण होते.
आता मात्र वर्षभर प्रवाशांना तिकीट मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. खिडकी उघडताच 'वेटिंग' सुरु, आणि दुसरीकडे दलालांकडे पैसे दिल्यास हवी तेवढी तिकिटे सहज मिळत होती. त्यामुळे कौंटर सुरू होताच लांबलचक 'वेटिंग' कसे येऊ शकते, असा सवाल संतप्त प्रवाशांकडून विचारला जात होता. अधिकाऱ्यांकडून 'गोलमोल' उत्तरे मिळत असल्याने 'रेल्वेतील विभिषण'च रिझर्वेशन सिस्टीमला सुरुंग लावत असल्याचा जोरदार आरोप केला जात होता. यासंबंधाने प्रामाणिक रेल्वे अधिकारीही 'सिस्टीम' दोषपूर्ण असल्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठवत होते.
देशभरातील दलालांत खळबळवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते सर्वाधिक घोळ तत्काळ रिझर्व्हेशनमध्ये होता. त्यामुळे आयआरसीटीसीने तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रियेला पारदर्शी करून प्रवाशाचे हित साधण्यासाठी आता तत्काळ तिकिटांसाठी आधार लिंक आणि ओटीपी बंधनकारक केला आहे. अर्थात जो व्यक्ती तत्काळमधून रिझर्व्हेशन करेल, त्याच्या मोबाईलवर लगेच ओटीपी येईल आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तिकीट कन्फर्म होईल. त्यामुळे देशभरातील दलालांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
रोज व्हायचे लाखोंचे वारेन्यारेसिस्टीममधील 'विभिषणांना' हाताशी धरून दलाल फेक आयडीच्या माध्यमातून तत्काळ बुकिंगमध्ये घुसखोरी करायचे. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नव्हते. परिणामी प्रवासी दलालाकडे जाऊन एका तिकीटामागे सुमारे ३०० ते ५०० रुपये जास्त देऊन कन्फर्म तिकीट मिळवायचे. त्यातून एकेक दलाल रोज लाखो रुपये कमवायचा. एखादवेळी दलालाला पकडले तर त्याचे नाव वृत्तपत्रात छापून येणार नाही, याची काळजी कारवाई करणारी मंडळी घेत होती, हे विशेष !
सुरू झाले 'डेटा अॅनालिसिस'रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर रिझर्व्हेशन सिस्टीमचे ऑपरेशन सुरू झाले. 'डेटा अॅनालिसिस' केल्यानंतर रेल्वे बोर्डाला हादरवणारा अहवाल पुढे आला. तब्बल अडीच कोटी फेक यूजर आयडीचा वापर करून रोजच्या रोज रेल्वे रिझर्व्हेशन सिस्टीमला सुरूंग लावण्यात येत असल्याचे उघड झाले. त्यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) या 'अडीच कोटी फेक यूजर आयडी ब्लॉक' केल्या.