सोनेगाव पोलीस : हर्षवर्धन जाधवांना द्यायची आहेत उत्तरेनागपूर : विशेष सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांची पोलिसांनी आज दुपारी चौकशी केली. त्यांना २५ प्रश्नांची यादी पोलिसांनी दिली. सोमवारी दुपारी २ पर्यंत अर्थात २४ तासात या प्रश्नांची उत्तरे आ. जाधव यांच्याकडून मागण्यात आल्याचे सोनेगाव पोलिसांनी सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी बुधवारी सायंकाळी आ. जाधव हॉटेल प्राईडमध्ये आले होते. त्यांना ठाकरे यांना भेटता आले नाही. त्यामुळे संतापलेल्या आ. जाधव यांनी गोंधळ घातला आणि तेथे ठाकरे यांच्या सुरक्षेचा बंदोबस्त सांभाळणारे विशेष सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, आ. जाधव यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे पोलीस त्यांना अटक करू शकले नाही. तथापि, आ. जाधव यांची पोलीस चौकशी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, शनिवारी दुपारी आ. जाधव यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात आपले बयाण नोंदवले. त्यानंतर पोलिसांनी क्रॉस व्हेरिफिकेशनकरिता आ. जाधव यांना आज ठाण्यात येण्याची सूचना दिली होती. त्यानुसार, आज दुपारी १२ च्या सुमारास जाधव पुन्हा ठाण्यात आले. त्यांना आम्ही २५ प्रश्नांची यादी सोपवली. २४ तासात त्या प्रश्नांची उत्तरे द्या, असेही त्यांना कळविल्याचे ठाणेदार प्रकाश शहा यांनी ‘लोकमत‘ला सांगितले. आ. जाधव यांच्याकडून मिळालेल्या उत्तरानंतर तपासाची दिशा पुढे नेण्यात येईल, असेही शहा यांनी सांगितले. आ. जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई करताना कोणत्याही प्रकारचा पेच निर्माण होऊ नये, याची पोलीस दक्षता घेत आहेत. (प्रतिनिधी)
२४ तास २५ प्रश्न
By admin | Updated: December 22, 2014 00:36 IST