दुचाकीच्या डिक्कीतून २.३० लाख उडविले, दिवसाढवळ्या ताजाबागमध्ये घडली घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 01:46 PM2021-11-19T13:46:14+5:302021-11-19T13:52:21+5:30

दुचाकीच्या डिक्कीतून चक्क २.३० लाख रुपये उडविल्याची घटना रघुजीनगरच्या छोटा ताजबागमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

2.30 lakh thef from the two-wheelers dickey | दुचाकीच्या डिक्कीतून २.३० लाख उडविले, दिवसाढवळ्या ताजाबागमध्ये घडली घटना

दुचाकीच्या डिक्कीतून २.३० लाख उडविले, दिवसाढवळ्या ताजाबागमध्ये घडली घटना

Next
ठळक मुद्देआरोपी सीसीटीव्हीत कैद

नागपूर : रघुजीनगरच्या छोटा ताजबागमध्ये दुचाकीच्या डिक्कीतून चक्क २.३० लाख रुपये उडविल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आराध्यानगर येथील रहिवासी रुचिता विशाल कराडे यांचे खरबी चौकात आर. के. असोसिएट्स आहे. त्या क्रेडिट कार्डचे काम करतात. रुचिताने घराच्या रजिस्ट्रीसाठी नातेवाईकांकडून पैसे उसणे घेतले होते. आज नातेवाईकांना पैसे परत करायचे होते. त्या आपला सहकारी श्रेयस जनार्दन सुखदेवे सोबत पैसे काढण्यासाठी सक्करदराच्या एचडीएफसी बँकेत पोहोचल्या. तेथे त्यांनी सकाळी ११.३० वाजता ३ लाख रुपये काढले व दुचाकीने रवाना झाल्या.

गुरुवार असल्यामुळे रुचिता दुचाकी पार्किंगमध्ये उभी करून छोटा ताजबागमध्ये दर्शन करण्यासाठी गेल्या. यावेळी, श्रेयसने रुचिताला छोटा ताजबागमध्ये गर्दी असल्यामुळे पैसे घेऊन आत न जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रुचिताने पैशांची बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. जवळपास २० मिनिटे दर्शन केल्यानंतर दोघेही दुचाकीजवळ आले. दुचाकीवर स्वार होऊन ते ताजबागमधून रवाना झाले. नातेवाईकांकडे पोहोचल्यानंतर रुचिताला डिक्कीत ३ लाखाऐवजी केवळ ७० हजार रुपये दिसले. २.३० लाख रुपये गायब झाले होते.

या प्रकाराने दोघेही गोंधळून गेले. रुचिताने सक्करदरा ठाण्यात पोहोचून तक्रार दिली. निरीक्षक धनंजय पाटील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात एक आरोपी डिक्की उघडून पैसे नेताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपी बँकेपासूनच रुचिताचा पाठलाग करीत असावा असा पोलिसांना संशय आहे. भाविकांची गर्दी असल्यामुळे घटनास्थळावर त्यांनी अधिक वेळ घालविला नाही. हाती लागलेले पैसे घेऊन आरोपी फरार झाला. पोलीस इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिलन्सच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: 2.30 lakh thef from the two-wheelers dickey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.