महावितरणकडून २० हजार ३३० मे.वॅ. चा वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 20:50 IST2018-09-17T20:49:31+5:302018-09-17T20:50:27+5:30
महावितरणने गेल्या शनिवारी २० हजार ३३० मे.वॅ. अखंडित विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला आहे. ही वीजमागणी आजपर्यंत नोंद झालेल्या विक्रमी कमाल वीजमागणीच्या जवळपास आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०१८ रोजी २० हजार ३४० मे.वॅ. एवढ्या कमाल वीज मागणीची नोंद करण्यात आली होती. सदर मागणी ही मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या कमाल मागणीच्या तुलनेत जवळपास ३ हजार ५०० मे.वॅ. (२२ टक्के) इतकी जास्त आहे.

महावितरणकडून २० हजार ३३० मे.वॅ. चा वीजपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणने गेल्या शनिवारी २० हजार ३३० मे.वॅ. अखंडित विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला आहे. ही वीजमागणी आजपर्यंत नोंद झालेल्या विक्रमी कमाल वीजमागणीच्या जवळपास आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०१८ रोजी २० हजार ३४० मे.वॅ. एवढ्या कमाल वीज मागणीची नोंद करण्यात आली होती. सदर मागणी ही मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या कमाल मागणीच्या तुलनेत जवळपास ३ हजार ५०० मे.वॅ. (२२ टक्के) इतकी जास्त आहे. वातावरणातील बदलामुळे कृषीपंपाकरिता लागणाऱ्या विजेच्या मागणीतील वाढीमुळे एकूण विजेच्या मागणीत वाढ झालेली आहे.
विद्यमान परिस्थितीतील कोळशाच्या तुटवड्यामुळे महावितरण कंपनीशी दीर्घकालीन वीज करार झालेल्या कंपन्यांकडून कमी वीजपुरवठा होत असूनही महावितरणने यशस्वीपणे सदरील मागणीची पूर्तता केलेली आहे. दीर्घकालीन वीज खरेदी करार असलेल्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून एकूण करारीत २९ हजार ८४० मे.वॅ. क्षमतेपैकी साधारणपणे १४ हजार ३५४ मे.वॅ. इतकी विजेची उपलब्धता होती. महानिर्मिती कंपनीकडून एकूण करारीत १० हजार ८४२ मे.वॅ. क्षमतेपैकी ५ हजार ११६ मे.वॅ. तसेच एनटीपीसी कंपनीकडून एकूण करारीत ४ हजार ८६२ मे.वॅ. क्षमतेपैकी ३ हजार ५३६ मे.वॅ. व अणु वीज प्रकल्पाकडून (एनपीसीआयएल) एकूण करारीत ७५७ मे.वॅ. क्षमतेपैकी ४६१ मे.वॅ. इतक्या विजेची उपलब्धता झाली. तसेच अदानी पॉवरकडून एकूण करारीत ३ हजार ८५ मे.वॅ. क्षमतेपैकी २ हजार ३९४ मे.वॅ. व रतन इंडियाकडून करारीत क्षमतेएवढी म्हणजे १ हजार २०० मे.वॅ. वीज उपलब्ध झाली. या व्यतिरिक्त सीजीपीएलकडून ५८८ मे.वॅ., जेएसडब्ल्यूकडून २८० मे.वॅ. व एम्कोकडून ८७ मे.वॅ. एवढी वीज उपलब्ध झाली आहे.
नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्रोतापैकी सौर ऊर्जेवर आधारित प्रकल्पांमधून एकूण करारीत १ हजार ४२ मे.वॅ. क्षमतेपैकी ६२८ मे.वॅ. इतकी वीज मिळाली. परंतुु गेल्या सात-आठ दिवसांपासून पवन ऊर्जेवर आधारित प्रकल्पांमधून निर्माण होणाºया विजेमध्ये अचानक कमतरता आल्याने या प्रकल्पांमधून ३ हजार ७६५ मे.वॅ. इतक्या करारीत क्षमतेपैकी फक्त ११५ मे.वॅ. वीज उपलब्ध झाली आहे.
वीज मागणीच्या वाढीतील अपेक्षित वाढ व दीर्घकालीन करारातील वीज निर्मिती कंपन्यांकडून उपलब्ध होणारी कमी वीज लक्षात घेता महावितरणने विजेच्या मागणीतील तफावत भरून काढण्यासाठी द्विपक्षीय लघु निविदेद्वारे व इंडियन एनर्जी एक्चेंजद्वारे वीज खरेदी करण्याची सोय केली होती. १५ सप्टेंबर २०१८ रोजी महावितरणने साधारणत: ५ हजार २०० मे.वॅ. इतक्या विजेच्या तफावतीपैकी २७५ मे.वॅ. वीज द्विपक्षीय लघु निविदेद्वारे व ३ हजार २०० मे.वॅ. इंडियन एनर्जी एक्सेंजद्वारे वीज खरेदी करून उर्वरित १ हजार ६७५ मे.वॅ. कोयना जल विद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती करून निर्माण झालेली विजेची तूट भरून काढली आहे.
अशाप्रकारे महावितरणने अचानक वाढलेल्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी उपलब्ध सर्व स्रोतांचा प्रभावीपणे वापर करून महावितरणच्या वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला आहे.