नागपुरात स्वाइन फ्लूचे २० रुग्ण; रुग्णालयात आठ जण भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 15:28 IST2022-07-28T15:28:06+5:302022-07-28T15:28:19+5:30
आजाराचा जिवाला होऊ शकतो धोका

नागपुरात स्वाइन फ्लूचे २० रुग्ण; रुग्णालयात आठ जण भरती
नागपूर : कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात स्वाइन फ्लू या आजाराचे एकूण २० रुग्ण आढळून आलेले आहेत. यांपैकी १६ रुग्ण नागपूर महानगरपालिका हद्दीतील असून चार रुग्ण शहराबाहेरील आहेत. महानगरपालिका साथरोग विभागाकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील वेगवेगळ्या भागांत निवासी असलेल्या या रुग्णांचा सकारात्मक अहवाल प्रयोगशाळा तपासणीत आढळून आला.
स्वाइन फ्लू हा तसा सौम्य आजार असला तरी जोखमीच्या गटातील जसे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा प्रतिकारशक्ती क्षीण असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे जिवाला धोकासुद्धा होऊ शकतो. विशेष म्हणजे, स्वाइन फ्लूवर खात्रीशीर औषधोपचार उपलब्ध आहेत. लवकर व वेळीच निदान झाल्यास वेळेवर औषधोपचार सुरू करता येतात. सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारकी फ्लूसदृश लक्षणे असल्यास कोरोनासोबतच सोबत स्वाईन फ्लूचीही तपासणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासनाने केले आहे. नागपूर महानगरपालिकेची रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ही तपासणी मोफत केली जात आहे. सद्य:स्थितीत शहरात २० रुग्णांबाबत माहिती मिळाली असून, त्यांपैकी आठ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. १२ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत.
महापालिकेतर्फे विशेष हेल्पलाईन
स्वाइन फ्लू, मंकीपॉक्स आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे विशेष हेल्पलाईन क्रमांक ९१७५४१५४३५५ जारी करण्यात आला आहे, असे डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले.
- स्वाइन फ्लू टाळण्याकरिता
१) हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.
२) गर्दीमध्ये जाणे टाळा.
३) स्वाइन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा.
४) खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा.
५) भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी.
६) पौष्टिक आहार घ्यावा.
७) हस्तांदोलन अथवा आलिंगन देऊ नका.
८) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
९) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.