आरपीएफची छापामार कारवाई : १८१ गुन्हे दाखल
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन अंतर्गत नागपूरसह बिलासपूर आणि रायपूरमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकीट आणि काैंटर तिकीटच्या दलालांविरुद्ध सन २०२० मध्ये अभियान राबवून १८१ गुन्हे दाखल करत १९४ तिकीट दलालांना अटक केली आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महानिरीक्षक सहप्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार नागपूर, बिलासपूर, रायपूर विभाग आणि झोन मुख्यालय स्तरांवर विविध टीम तयार करून नागपूर, गोंदिया, राजनांदगाव, भिलाई, बालोदा बाजार, दुर्ग, रायपूर, जांजगीर चांपा, मनेंद्रगड, अंबिकापूर, कोरबा, अनुपपूर, रायगढ आदी शहरात जाळे टाकून तिकीट दलालांवर कारवाई करण्यात आली. यावेळी नागपूर विभागात ४३ प्रकरणांत ४३ तिकीट दलाल, बिलासपूर विभागात ७२ प्रकरणात ७७ तिकीट दलाल, रायपूर विभागात ६६ प्रकरणात ६६ तिकीट दलालांसह १८१ प्रकरणात १९४ तिकीट दलालांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४ हजार ई तिकीट आणि ३२ काैंटर तिकिटांसह ४०३२ तिकीट (किंमत ६१.७६ रुपये) जप्त करण्यात आले. यात भविष्यातील प्रवासाच्या तिकिटांची किंमत ६.६१ लाख रुपये होती. ही तिकीट आयआरसीटीसीद्वारा ब्लॉक करण्यात आली. ११ आणि १२ फेब्रुवारी २०२० रोजी दपूम रेल्वे झोन क्षेत्रात २६ तिकीट दलालांना अटक करून त्यांच्याकडून ६५३ ई तिकीट जप्त करण्यात आले. वर्ष २०२० मध्ये अटक झालेल्या दलालात ६६ आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटचा समावेश होता. या तिकिट दलालांनी तिकीट बनविण्यासाठी ५७८ पर्सनल आयडीचा उपयोग केला होता. हे आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. सध्या तिकीट दलालांविरुद्ध कारवाई सुरू आहे. आरपीएफने प्रवाशांना अनधिकृत तिकीट एजंटांकडून तिकीट घेणे टाळावे, असे आवाहन केले आहे.
...........