संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये १.९० लाखाचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 21:52 IST2018-06-20T21:51:59+5:302018-06-20T21:52:21+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये १.९० लाख किमतीचा १९ किलो गांजा जप्त करून भोपाळ लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्त केला आहे.

संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये १.९० लाखाचा गांजा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये १.९० लाख किमतीचा १९ किलो गांजा जप्त करून भोपाळ लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्त केला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक पी. टी. खैरमारे, शशिकांत कुमरे, एस. आर. राजुरकर, अर्जुन गजभिये हे रेल्वेगाडी क्रमांक १२६४९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होते. त्यांना रात्री १०.४५ वाजता गाडीच्या एस-५ कोचमध्ये ३७, ३८ क्रमांकाच्या बर्थवर तीन बेवारस बॅग आढळल्या. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता त्या बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यात मादक पदार्थ असल्याची शंका आल्यामुळे गस्त घालणाऱ्या पथकाने याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दिली. त्यांच्या आदेशावरून ही पाकिटे भोपाळ रेल्वेस्थानकावर उतरवून भोपाळ लोहमार्ग पोलिसांना सूचना देण्यात आली. रात्री ११ वाजता ही पाकिटे भोपाळ लोहमार्ग पोलिसांच्या सुर्पूत करण्यात आली. भोपाळ लोहमार्ग पोलिसांनी पाकिट तपासले असता त्यात गांजाची १९ किलो वजनाची ९ पाकिटे होती. पुढील तपास भोपाळ लोहमार्ग पोलीस करीत आहेत.