नागपूर : एंजेल जॉन या दहावीत शिकत असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा खून करण्यात आला. ज्याने खून केला तो अल्पवयीन आरोपी आणि मुलगी रिलेशनमध्ये होते. त्यातून दोघांमध्ये बिनसले आणि खून करून अल्पवयीन आरोपी फरार झाला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुन्हे शाखेच्या युनिट ४ने आरोपीला कपिलनगर परिसरातून मध्यरात्री अटक केली. चौकशीत आरोपीने एंजेलच्या खुनाचा कट आठ दिवसांपूर्वीच रचला, त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागविल्याची माहिती पुढे आली आहे. खुनानंतर आरोपी रक्ताने माखलेले कपडे आणि मोबाईल लपवून फरार झाला होता.
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बदामी कॉलनी परिसरात असलेल्या शाळेसमोर शुक्रवार, २९ ऑगस्टला भरदुपारी अल्पवयीन प्रियकराने १५ वर्षाच्या अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने हल्ला करीत तिचा खून केला होता. अल्पवयीन विद्यार्थिनीचा खून झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.
नागपूर पोलिसांनी एंजेलची हत्या करणाऱ्याला कसे पकडले?
खुनानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आरोपीला गंगाबाई घाट परिसरात सोडल्याची माहिती दिली होती. परंतु, पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीच्या साथीदाराने त्याला कपिलनगरातील त्याच्या नातेवाइकाकडे सोडल्याची माहिती दिली.
या माहितीवरून गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने कपिलनगर परिसरात शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी आरोपीने खुनात वापरलेला चाकू ऑनलाईन मागविल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला बाल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची एक दिवसाची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.
विद्यार्थिनी आणि आरोपी होते रिलेशनमध्ये
अल्पवयीन आरोपी रामबागमध्ये आई, भाऊ आणि बहिणीसह राहतो. मृत एंजेलची आईही रुग्णालयात केअरटेकर म्हणून काम करीत असल्याची माहिती आहे. प्रेमसंबंध असताना मागील तीन महिन्यांपासून एंजेलने त्याला भेटण्यास टाळाटाळ केल्यामुळे आरोपीने तिचा खून केल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केअरटेकर म्हणून काम करतो. त्याचे वडीलही कुख्यात गुन्हेगार आहेत. त्याच्या वडिलांवर चेन स्नॅचिंग, खून आणि हत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
नातेवाइकांनी केला मर्क्युरीचे गेट तोडण्याचा प्रयत्न
एंजेलचा खून झाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह मेडिकलमध्ये पाठविला. तेथे डॉक्टरांनी एंजेलला तपासून मृत घोषित केल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मर्क्युरीत पाठविला.
या घटनाक्रमात एंजेलच्या नातेवाइकांना तिचा मृतदेहदेखील पाहावयास मिळाला नाही. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी मध्यरात्री मेडिकलच्या मर्क्युरीचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान शनिवारी २.३० वाजता एंजेलचा मृतदेह ताब्यात घेताना तिच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने मेडिकलच्या शवागार परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.