सायकल रायडिंगला गेला, कारच्या धडकेत मृत्यू झाला, नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
By योगेश पांडे | Updated: October 25, 2023 18:11 IST2023-10-25T18:10:30+5:302023-10-25T18:11:04+5:30
दसऱ्याच्या दिवशी १५ वर्षीय चित्रांश श्रीवास्तवचा मृत्यू

सायकल रायडिंगला गेला, कारच्या धडकेत मृत्यू झाला, नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मित्रासह पहाटे सायकल रायडिंगला गेलेल्या नववीतील एका विद्यार्थ्याचा अज्ञात कारच्या धडकेत मृत्यू झाला. ऐन दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
चित्रांश संतोषकुमार श्रीवास्तव (१५, पारधीनगर, हिंगणा मार्ग) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो यशोदा हायस्कूलमध्ये नवव्या इयत्तेत शिकत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडिल व लहान बहीण आहेत. तो त्याचा शाळेतील मित्र मनिष खंडारेसोबत सुटीच्या दिवशी सायकल रायडिंगला जायचा. मंगळवारीदेखील तो सकाळी सहा वाजता मनिषसोबत फिरायला गेला. दोघेही वेगवेगळ्या सायकलने जात होते. वासुदेवनगर मेट्रो स्थानकाजवळून रस्ता ओलांडत असताना नागपुरहून हिंगण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने चित्रांशला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचे डोके, हात व पायांना मार लागला होता. त्याला मनिष व घटनास्थळावरील लोकांनी इस्पितळात दाखल केले. तेथून त्याला मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याची आई प्रिया यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.