१५ जलसंपदा उपअभियंत्यांची पुन्हा मुदतवाढीसाठी मोर्चेबांधणी
By Admin | Updated: July 20, 2014 01:10 IST2014-07-20T01:10:35+5:302014-07-20T01:10:35+5:30
जलसंपदेचा ‘अर्थ’ कळणारे अधिकारी जागेवरून हलायला तयार नाहीत. अशाच ‘अर्थ’कारणातून राज्यात जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडले आहे.

१५ जलसंपदा उपअभियंत्यांची पुन्हा मुदतवाढीसाठी मोर्चेबांधणी
राजकीय वरदहस्तातून पाठराखण : एकाच मंडळात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ
सतीश येटरे - यवतमाळ
जलसंपदेचा ‘अर्थ’ कळणारे अधिकारी जागेवरून हलायला तयार नाहीत. अशाच ‘अर्थ’कारणातून राज्यात जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडले आहे. राजकीय वरदहस्तातून मुक्कामी अधिकाऱ्यांची पाठराखण केली जात आहे. यवतमाळ पाटबंधारे विभागही त्याला अपवाद नाही.
राज्याच्या जलसंपदा विभागाने २०१३ मध्ये स्थापत्य संवर्गातील ३१ उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्या केल्या. शासनाच्या नागरी सेवा नियमाच्या बदली धोरणानुसार एका ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कोणताही अधिकारी कार्यरत राहू शकत नाही. मात्र हा नियम मोडीत काढून बदली आदेश प्राप्त होऊनही १५ अभियंत्यांनी मुदतवाढ मिळविली. त्यासाठी राजकीय वरदहस्त, कंत्राटदारांची वशिलेबाजी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मैत्रीपूर्ण संंबंध कारणीभूत ठरले. गतवर्षी निर्धारित कालावधीसाठी बदलीला स्थगनादेश मिळविला. तसेच त्याचठिकाणी कार्यरत राहण्यासाठी एक ते चार महिन्यांपर्यंत मुदतवाढ मिळविली. या मुदतवाढीच्या जोरावर त्यांनी वर्षभराचा कालावधी त्याच ठिकाणी काढला. आता मुदत संपल्यानंतर कुणीही गॉडफादर नसलेल्या अभियंत्यांनी त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडावे, यासाठी कंबर कसली आहे.
मुदतवाढ घेणाऱ्या अभियंत्यांमध्ये उपविभागीय अभियंता अनिल सोनेवार, नियंत पाठक, चंदूसिंग राठोड, देवीदास राठोड, काशिनाथ शिवपूजे, नंदकुमार महाडीक, राजेंद्र पवार, चंद्रकांत मगदूम, साहेबराव जाधव, रमेश खलाटे, नंदकुमार शेटे, प्रमोद सोनार, रोहिदास सोमवंशी, ज्ञानेश्वर अच्युत, दिलीप गंजेवार आदींचा समावेश आहे.
यातील बहुतांश अभियंते आजही मुदतवाढ मिळवून त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. या प्रकाराने पुन्हा एकदा जलसंपदा विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. एवढेच नव्हे तर स्वच्छ प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही वापर या गंभीर प्रकारात होत असल्याचे पुढे आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाचा हस्तक्षेप
यवतमाळ पाटबंधारे मंडळात गेल्या दहा वर्षांपासून उपविभागीय अभियंता अनिल सोनेवार कार्यरत आहे. ३१ मे २०१३ ला त्यांची चंद्रपूर येथे बदली झाली. मात्र मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता अ.प. सुरोशे यांना हाताशी धरून त्यांनी चार महिन्यांची मुदत मिळविली. त्यानंतर स्थानिक आमदाराच्या मदतीने पुन्हा मुदतवाढ मिळविली. यावर्षी तर थेट मुख्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजित खोरपडे यांचे वजन वापरले. त्यांनी त्यासाठी जलसंपदा विभागाचे अमरावती येथील सहायक मुख्य अभियंता सं. दि. पांडे यांना दूरध्वनी केला. तसेच सोनेवार यांना मुदतवाढ देण्यात यावी, असे फर्मान सोडले. सोनेवार यांना मुदतवाढ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खासगी स्वीय्य सहायकाच्या दूरध्वनीचा संदर्भ देत काढण्यात आलेल्या आदेशात तसा हवालाही देण्यात आला आहे.