सरकारी रोख्यांमध्ये २.७० कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:57 AM2019-10-30T11:57:29+5:302019-10-30T11:58:04+5:30

नवोदय बँकेचे अध्यक्ष अशोक धवड आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा नियमबाह्य व्यवहार झाल्याचे लेखापरीक्षकाने अंकेक्षण अहवालात नमूद केले आहे. हा आर्थिक घोटाळा २.७० कोटींचा आहे.

1.5 crore scam in government bonds | सरकारी रोख्यांमध्ये २.७० कोटींचा घोटाळा

सरकारी रोख्यांमध्ये २.७० कोटींचा घोटाळा

Next
ठळक मुद्दे अध्यक्ष अशोक धवड यांच्यावर अंकेक्षण अहवालात ताशेरे

मोरेश्वर मानापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदय बँकेने खरेदी केलेल्या सरकारी रोख्यंची (गव्हर्नमेंट सिक्युरिटीज) रक्कम मॅच्युअर झाल्यानंतर आपल्या खात्यात वळती न करता पंजाब नॅशनल बँकेत नव्याने खाते उघडून जमा केली आणि ही रक्कम हेमंत झाम यांच्या खात्यात बँकेने धनादेश देऊन वळती केली. हा सर्व व्यवहार रिझर्व्ह बँकेने नवोदय बँकेवर ३५(ए)ची कारवाई केल्यानंतर करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष अशोक धवड आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा नियमबाह्य व्यवहार झाल्याचे लेखापरीक्षकाने अंकेक्षण अहवालात नमूद केले आहे. हा आर्थिक घोटाळा २.७० कोटींचा आहे. ही रक्कम हेमंत झाम यांच्याकडून व्याजासहित एकमुस्त वसुल करावी, असे अहवालात निर्देशित केले आहे.
नवोदय बँकेचे एचडीएफसी बँकेत एसजीएल खाते आहे. बँकेने सन २०१२ अणि २०१३ मध्ये तीन तारखांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये २.२५ कोटी गुंतविले. बँकेला या सिक्युरिटीजवर १६ आॅक्टोबर २०१६ ते १५ एप्रिल २०१७ पर्यंत एकूण ८,४२,५२५ रुपये व्याज मिळाले. त्यामुळे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची रक्कम २ कोटी ३३ लाख ४२ हजार ६२५ रुपये झाली. शिवाय या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये बँकेची ३८ लाख ७२ हजार ५७८ एवढी रक्कम शिल्लक होती. मॅच्युरिटीची रक्कम आणि शिल्लक रक्कम असे एकूण २.७२ कोटी रुपये बँकेच्या एसजीएल खात्यात जमा झाले होते.
ही रक्कम नवोदय बँकेच्या खात्यात वळती न करता अध्यक्ष अशोक धवड यांनी ९ जुलै २०१७ रोजी विशेष सभा बोलावून पंजाब नॅशनल बँक, किंग्जवे नागपूर येथे चालू खाते उघडण्याबाबत ठराव घेतला. या खात्यावर व्यवहार करण्याचे आणि धनादेशावर सही करण्याचे अधिकार बँकेचे अध्यक्ष अशोक धवड, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नाईक आणि व्यवस्थापक अशोक पिंपळघरे यांच्यापैकी कोणत्याही दोन सहीने राहतील, असे ठरविण्यात आले.
गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची रक्कम एसजीएल खात्यात जमा झाल्यानंतर या खात्यातून २३ मे २०१७ रोजी आरटीजीएसने २.७१ कोटी रुपये विड्रॉल करून नव्याने उघडलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात जमा करण्यात आले. ही रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष अशोक धवड व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नाईक यांनी ठेवीदार हेमंत झाम यांच्याशी आपसी संगनमत करून त्यांना चेक क्र. ३६५८७७ ने २.७० कोटी एवढी रक्कम दिली.
चेक क्लीअर झाल्यानंतर हेमंत झाम यांनी ३५(ए)नुसार आर्थिक निर्बंध लागल्यानंतरही २.७० कोटींची उचल केली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने कलम ३५ (ए)अन्वये नवोदय बँकेवर १५ डिसेंबर २०१६ पासून आर्थिक निर्बंध लावलेले असतानाही बँकेचे ठेवीदार हेमंत झाम यांना २.७० कोटींची ठेव परत करून आर्थिक घोटाळा केला आहे. बँकेवर निर्बंध असल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या ठेवी परत करता येत नाही. अटीमध्ये नमूद केल्यानुसार ठेवीदारांना केवळ एक हजार रुपयापर्यंतच्या ठेवी परत करण्याचा सूचना होत्या. त्यानंतरही नवोदय बँकेने हेमंत झाम यांना २.७० कोटींच्या ठेवी परत केल्या आहेत. यासंदर्भात संजय नाईक यांना खुलासा मागितला असता, त्यांनी तो दिला नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. आर्थिक निर्बंध असतानाही बँकेचे अध्यक्ष अशोक धवड, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नाईक आणि व्यवस्थापक अशोक पिंपळघरे यांनी आपल्या सहीने पंजाब नॅशनल बँकेत खाते उघडण्यास सहमती दर्शविल्याने या व्यवहारास अशोक धवड आणि अधिकारी हे संयुक्तरीत्या जबाबदार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: 1.5 crore scam in government bonds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक