आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलाचे अपहरण; ओळखीच्या लोकांनीच खंडणीसाठी घेतला जीव
By योगेश पांडे | Updated: April 6, 2026 17:35 IST2026-04-06T17:34:07+5:302026-04-06T17:35:17+5:30
अथर्व नानोरे हत्याकांड : तीन आरोपींच्या आवळल्या मुसक्या , सीसीटीव्हीमुळे आरोपी ताब्यात

14-year-old boy kidnapped on the pretext of buying ice cream; Acquaintances took his life for ransom
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण शहराला हादरविणाऱ्या अथर्व नानोरे हत्याप्रकरणात पोलिसांना अखेर यश हाती आले आहे. या प्रकरणात अथर्वच्या घराजवळ राहणारा भाजीविक्रेताच मुख्य आरोपी निघाला. त्याने दोन साथीदारांसोबत मिळून क्रूरपणे त्याची हत्या केली. आरोपींनी खंडणी उकळण्यासाठी त्याचे अपहरण केले होते, मात्र त्यांच्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका मालवाहक वाहनावर संशय आल्यानंतर पोलिसांना या प्रकरणात पुढील ‘लिंक’ मिळाली. गिट्टीखदान व गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
जयराम गाेपाल यादव (१९, आयबीएमराेड, गिट्टीखदान), केतन उर्फ कुणाल रमेश साहू (२२, कुतुबशाह मशिदीजवळ, गिट्टीखदान) आणि आयुष माेहन साहू (१९, शिवशंकर मंदिरासमाेर, मानकापूर) अशी आरोपींची नावे आहेत. जयराम हा मुख्य सूत्रधार आहे. २ एप्रिल रोजी गिट्टीखदान परिसरात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान, १४ वर्षीय अथर्व दिलीप नानोरे याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. शनिवारी सायंकाळी अथर्वचा मृतदेह कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा पुलाजवळ आढळून आल्यानंतर, या हत्येचे प्रकरण उघडकीस आले. २ एप्रिलच्या रात्री १०:५४ वाजता, हल्दीराम रेस्टॉरंटजवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अथर्व अखेरचा दिसून आला होता.
रात्री १०:५४ वाजल्यापासून अथर्वचा कोणताही मागमूस लागला नव्हता. या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. या मार्गावर कोणत्याही टप्प्यावर अथर्व दुचाकीवर दिसून आला नव्हता. त्यामुळे आरोपींनी त्याला चारचाकी वाहनातून भरतवाड्यापर्यंत नेले असावे, असा पोलिसांचा अंदाज होता. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये टाटा एस वाहन संशयास्पदरित्या कळमेश्वरकडे जात असल्याचे दिसले. वाहनक्रमांकावरुन आयुषला ताब्यात घेतल्यानंतर आरोपींची पोलखोल झाली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले व त्यांनी हत्येची कबुली दिली. घटनास्थळी सापडलेल्या पोत्यावरील ट्रेडमार्क हादेखील तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरला.
पैशांसाठीच रचला कट
दिलीप नानाेरे हे भाजीपाल्याचे व्यापारी आहेत. त्यांनी घराच्या नूतनीकरणासाठी पैसा जुळविला होता. याची जयरामला माहिती होती. झटपट पैसा मिळविण्यासाठी त्याने अथर्वच्या अपहरणाचा कट रचला. त्याने आयुष व केतन या भाजीविक्रेत्यांना कटात सहभागी करून घेतले. अथर्वचे अपहरण करून टाटा एस गाडीने त्याला दूर न्यायचे व ४० ते ५० लाखांची खंडणी उकळण्याचे आरोपींनी ठरविले.
परिचित असल्यामुळे सोबत गेला अथर्व
हनुमान जयंतीची शाेभायात्रा सुरू असताना जयराम यादवने अथर्वला आईस्क्रीम घेऊन देण्याच्या बहाण्याने शाेभायात्रेतून बाहेर नेले. जयरामने त्याला ’टाटा एस’ गाडीजवळ नेले. जिथे तिघांनी अथर्वला बळजबरीने गाडीत काेंबले आणि अथर्वने आरडाओरडा करू नये म्हणून त्याच्या ताेंडात कापडाचा बोळा काेंबला. आराेपींनी गाडी गाेरेवाड्याच्या दिशेने नेली. अथर्वचे अपहरण करुन जंगलात नेल्यानंतर जयराम, आयूष आणि केतन यांनी खंडणीच्या पैशाबाबत चर्चा केली. दरम्यान, गिट्टीखदानमध्ये नागरिक संतप्त झाल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यांनी अथर्वला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर दुपट्ट्याने गळा आवळून अथर्वची हत्या करण्यात आली.