समृद्धी महामार्गावर २०१ दिवसांत १२८७ अपघात; ९५ जणांनी गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2023 07:00 IST2023-07-02T07:00:00+5:302023-07-02T07:00:07+5:30
Nagpur News ११ डिसेंबर ते १ जुलै या २०१ दिवसांत रोज सहापेक्षा जास्त अपघात झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या एकूण १,२८७ अपघातात ९५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

समृद्धी महामार्गावर २०१ दिवसांत १२८७ अपघात; ९५ जणांनी गमावले प्राण
सुमेध वाघमारे
नागपूर : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सरकार सांगत असले तरी अपघात थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ११ डिसेंबर ते १ जुलै या २०१ दिवसांत रोज सहापेक्षा जास्त अपघात झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या एकूण १,२८७ अपघातात ९५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा येथे शनिवारी पहाटे १:३२ वाजण्याच्या सुमारास खासगी बसच्या भीषण अपघातात २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील अपघात चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून नावारूपास येत असलेला हा मार्ग अपघातासाठी कुप्रसिद्ध होत आहे. ७०० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी चालकांचे समुपदेशन, टायर तपासणी, जनजागृतीचे फलक, रिफ्लेक्टर तपासणीचे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात येते. परंतु, ते कागदोपत्री असल्याने की काय, अपघात वाढतच चालले आहे. हा महामार्ग सुरू होऊन आतापर्यंत झालेल्या २०१ दिवसांत एकूण १,२८७ अपघात झाले. त्यानुसार रोज सहापेक्षा अधिक अपघात होत आहेत. यात ७० प्राणांतिक, ८३७ गंभीर, तर ३८० किरकोळ स्वरूपातील अपघात आहेत.
-एकट्या सिंदखेडराजा मार्गावर ३५ मृत्यू
समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मार्गावर सर्वाधिक प्राणांतिक अपघात झाले. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत १० अपघात झाले असून, आतापर्यंत ३५ जणांचे जीव गेले आहेत. याच जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील दुसरबीड येथे नऊ, जालना निढोना येथे आठ, बुलढाणा मेहकर येथे सहा, वर्धा येळखेळी व कारंजा लाड, औरंगाबाद सावंगी व वर्धा येथील येळखेळी महामार्गावर प्रत्येकी पाच अपघात झाले. औरंगाबाद वैजपूर व अमरावती धामनगाव येथे प्रत्येकी चार, वाशिम मालेगाव जहांगीर, औरंगाबाद मालीवाडा, अमरावती शिवनी येथे प्रत्येकी तीन, कोकामथान येथे दोन, तर वाशिम सेलू बाजार, नागपूर वायफळ व नाशिक गोंडे येथे प्रत्येकी एक प्राणांतिक अपघात झाले.