विशाखापट्टणमहून आणला १२८ मीटर पंचशील ध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 20:07 IST2019-10-09T20:05:58+5:302019-10-09T20:07:51+5:30
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या चेन्नई आणि विशाखापट्टणमच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन अर्पण केले. डॉ. बाबासाहेबांच्या १२८ व्या जयंतीला सलाम करीत १२८ मीटर लांब पंचशील ध्वज विशाखापट्टणमवरून आणण्यात आला व या कार्यकर्त्यांनी या विशाल पंचशील ध्वजाने दीक्षाभूमीला अभिवादन केले.

विशाखापट्टणमहून आणला १२८ मीटर पंचशील ध्वज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या चेन्नई आणि विशाखापट्टणमच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन अर्पण केले. डॉ. बाबासाहेबांच्या १२८ व्या जयंतीला सलाम करीत १२८ मीटर लांब पंचशील ध्वज विशाखापट्टणमवरून आणण्यात आला व या कार्यकर्त्यांनी या विशाल पंचशील ध्वजाने दीक्षाभूमीला अभिवादन केले.
विशाल पंचशील ध्वजासह अभिवादन रॅलीचे नेतृत्व एम. राजू हे करीत होते. विशाखापट्टणमचे ६८ आणि चेन्नईच्या २०० कार्यकर्त्यांनी जून महिन्यापासूनच याची तयारी सुरू केली होती. जूनमध्ये रेल्वेचे आरक्षण करण्यात आले. विशाखापट्टणममध्ये हा विशाल ध्वज तयार करण्यात आला. त्यांनी सांगितले, डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीपासून हे अभियान सुरू करण्यात आले. प्रत्येक जयंतीला ध्वजाची एक मीटरने वाढ करण्यात आली आणि दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यावेळी ते दीक्षाभूमीवर आणण्यात येते. यावर्षीही हे अभिवादन अभियान आयोजिले गेले. संविधान चौकातून हा विशाल ध्वज खांद्यावर घेऊन रॅली काढण्यात आली. यामध्ये समता सैनिक दलाचेही शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. डॉ. आंबेडकर व तथागत बुद्धांचा जयघोष करीत ही रॅली दीक्षाभूमीवर पोहचली. यानंतर समता सैनिक दलाद्वारे परेड मार्च करीत सलामी देण्यात आली. १२८ मीटर ध्वजासह परेडद्वारे अभिवादनाचा हा सोहळा हजारो लोकांनी अनुभवला. सर्वत्र धम्मचक्राचा एकच जयघोष निनादला. बुद्धिस्ट सोसायटीचे के. सत्यनारायणा, अॅड. एम. गौतमी, के. व्यंकटेश्वरी लक्ष्मी, उमा माहेश्वरी आदींनी या अभिवादन अभियानाचे नेतृत्व केले. विशाखापट्टणमच्या टीममध्ये २५ महिलांचाही समावेश होता. अनुयायांसाठी हा पंचशील ध्वज परेड सोहळा डोळ्यांना सुखावणारा ठरला. डॉ. बाबासाहेब यांच्या १५० जयंतीपर्यंत याचप्रकारे ध्वज अभिवादन करण्यात येणार असल्याचे एम. राजू यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.