नागपुरात दोन दिवसात १२४५ रुग्ण, ३९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 07:00 IST2020-08-17T07:00:00+5:302020-08-17T07:00:20+5:30
गेल्या दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात १२४५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३९ रुग्णांचे जीव गेले. यात शनिवारी ७३३ रुग्ण व १४ मृत्यू तर रविवारी ५१२ रुग्ण व २५ मृत्यू होते.

नागपुरात दोन दिवसात १२४५ रुग्ण, ३९ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात १२४५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३९ रुग्णांचे जीव गेले. यात शनिवारी ७३३ रुग्ण व १४ मृत्यू तर रविवारी ५१२ रुग्ण व २५ मृत्यू होते. रुग्णांची एकूण संख्या १३९९० झाली असून मृतांची संख्या ४८८ वर पोहचली आहे. यात ग्रामीण भागातील ३८१८, शहरातील १०१७२ तर जिल्ह्याबाहेरील २४३ रुग्ण आहेत. या दोन दिवसातील मृतांमध्ये १४ वर्षीय मुलगा २१ वर्षीय तरुण, ३० वर्षीय बाळंतीण व १०० वर्षीय पुरुष रुग्ण आहे. नागपूर जिल्ह्यात सोमवारनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या ५०० वर आली. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात हजारावर रुग्ण संख्या गेली असताना आज रुग्ण अर्ध्यावर आल्याने आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला. मात्र शनिवारच्या तुलनेत रविवारी मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण कायम आहे.
मेयोमध्ये शनिवारी चार रुग्णांचे मृत्यू झाले. यात महेंद्रनगर येथील ३० वर्षीय बाळंतणीचा समावेश आहे. या मातेचा प्रसुतीनंतर चार दिवसानी मृत्यू झाला. महिलेला निमोनीआसह इतरही आजार होते. आराधना कॉलनी नारा रोड येथील १०० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मेयोमध्ये मृत्यू झाला. आतापर्यंतच्या मृतांमध्ये सर्वाधिक वयाचा हा रुग्ण होता. मेडिकलमध्ये आज १२ मृत्यूची नोंद झाली.
अॅन्टिजन चाचणीत २४७ पॉझिटिव्ह
रॅपिड अॅन्टिजन चाचणीत आज २४७ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. आरटीपीसीआर चाचणीत मेडिकलमधून ८२, मेयोच्या प्रयोगशाळेतून १००, एम्सच्या प्रयोगशाळेतून दोन, खासगी लॅबमधून ७९ असे एकूण ५१२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात ग्रामीणमधील १३९ तर शहरातील ३७३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये तीन ग्रामीणमधील, २० शहरातील तर दोन जिल्ह्याबाहेरील आहेत. आज २३९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६५३९ रुग्ण बरे झाले आहेत. २५५५ रुग्ण उपचार घेत आहेत.
मेडिकलच्या खाटा होत आहे फुल्ल
मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या खाटा फुल्ल होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. ६०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये रविवारी ४५१ खाटांवर रुग्ण होते तर मेयोच्या ६०० खाटांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ३१९ रुग्ण उपचार घेत होते. जिल्ह्यात या दोनच हॉस्पिटलमध्ये अतिगंभीर रुग्णांवर उपचार होत आहेत. येथील खाटा फुल्ल झाल्यास, गरीब व सामान्यांवर कुठे उपचार होतील, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.