नागपुरात १.१३ लाख पालकांनी उघडली 'सुकन्या समृद्धी' खाती; कोण उघडू शकते खाते ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:54 IST2025-03-03T15:13:44+5:302025-03-03T18:54:37+5:30
Nagpur : विदर्भात डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण ६ लाख ३९ हजार ६१५ सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आली

1.13 lakh parents open 'Sukanya Samriddhi' accounts in Nagpur; Who can open an account?
सैयद मोबीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलींचे उच्च शिक्षण आणि लग्न खर्चाच्या नियोजनाकडे पालक विशेष लक्ष्य देत आहेत. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेला नागपूर शहरासह जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गत दहा वर्षात नागपूर शहरात ६१ हजार ७४३ पालकांनी सुकन्या समृद्धी खाती उघडली आहेत. नागपूर ग्रामीण मधील पालकही यामध्ये मागे नाही. येथे आतापर्यंत ५१ हजार २९३ खाती उघडली गेली आहेत. विदर्भात डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण ६ लाख ३९ हजार ६१५ सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आलेली आहेत.
कोण खाते उघडू शकते ?
- मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक खाते उघडू शकतात.
- मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असावे.
खाते कसे उघडावे?
१० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत उघडले जाऊ शकते. यासाठी, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, आई किंवा वडील किंवा पालकांचे ओळखपत्र (आधार, पॅन कार्ड) आणि पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे. यासह, खाते कमीतकमी २५० रुपये देऊन उघडले जाऊ शकते.
पैसे कधी काढू शकता?
मुलगी १८ वर्षांची असताना उच्च शिक्षणासाठी खात्यातून ५० टक्के रक्कम कढता येते. शैक्षणिक संस्थेत प्रवेशाचा पुरावा द्यावा लागतो. मुलीचा मृत्यू किंवा गंभीर आरोग्य समस्येदरम्यान खाते बंद केले जाऊ शकते.
हे माहीत असणे आवश्यक
- कालावधी : खाते उघडल्यानंतर २१ वर्षापर्यंत किंवा मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर, तसेच लग्नाच्या वेळी खाते बंद केले जाऊ शकते. पैसे जमा करण्याची मर्यादा : दर वर्षी किमान २५० रुपये आणि दर वर्षी जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.
- व्याज दर : सरकार प्रत्येक तिमाहीत व्याज दर ठरवते. व्याज वार्षिक कंपाऊंड अंतर्गत दिले जाते. २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत व्याज दर ८.२० टक्के निश्चित केला गेला आहे.
- कर सूट : आयकर कलम ८० सी अंतर्गत कर सूट प्राप्त होते. मिळवलेली व्याज आणि परिपक्वता रक्कम करमुक्त आहे.
काय आहे सुकन्या समृद्धी योजना ?
बेटी बाचाओ, बेटी पढाओ' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने मुलीच्या उच्च शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने २२ जानेवारी २०१५ रोजी सुकन्या आहेद्धी योजना सुरू केली आहे.
उच्च शिक्षण आणि मुलींच्या लग्नाच्या खर्चाचे नियोजन
नागपूर शहरात उघडली ६१,७४३ खाती
नागपूर ग्रामीणमध्ये ५१,२९४ खाती
विदर्भात उघडली ६,३९,६१५ खाती
"मुलींच्या उच्च शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाच्या नियोजनासाठी सुकन्या समृद्धी योजना चांगली आहेत. त्याचा व्याज दर इतर निश्चित ठेव योजनांपेक्षा देखील जास्त आहे. म्हणूनच, अधिकाधिक पालकांनी आणि पालकांनी १० वर्षांखालील त्यांच्या मुलींचे सुकन्या समृद्धी खाते उघडले पाहिजे."
- श्रीनिवास राव, वरिष्ठ अधीक्षक (पोस्ट ऑफिस), नागपूर ग्रामीण