विभागातील ११0७ डॉक्टर कामावर परतले
By Admin | Updated: June 5, 2014 01:03 IST2014-06-05T01:03:18+5:302014-06-05T01:03:18+5:30
राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेतील डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी १ जूनपासून संप पुकारला होता. यामुळे शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती.

विभागातील ११0७ डॉक्टर कामावर परतले
नागपूर : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेतील डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी १ जूनपासून संप पुकारला होता. यामुळे शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. उपचार न मिळाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी आहेत.
बुधवारी महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ(मॅग्मो) च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेतून संपावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे विभागातील ११0७ डॉक्टर कामावर परतल्याची माहिती मॅग्मो चे सरचिटणीस डॉ. प्रमोद रक्षमवार यांनी दिली.
डॉक्टरांच्या मागण्या १0 दिवसात मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे. आश्वासनानुसार १0 दिवसासाठी संप मागे घेण्यात आला आहे. या कालावधीत मागण्या मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही रक्षमवार यांनी दिला आहे. दरम्यान संपामुळे रुग्णांची गैरसोय झाल्याबाबत संघटनेने दिलगिरी व्यक्त केली आहे. संप मागे घेतल्याने रुग्णांची गैरसोय दूर होईल, असा विश्वासही रक्षमवार यांनी व्यक्त केला.
संपामुळे शासकीय रुग्णालये, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली होती. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी विविध उपायोजना हाती घेतल्या होत्या. काही डॉक्टर कामावर परतले होते. त्यामुळे संपाचा फारसा परिणाम झाला नाही. संप मागे घेतल्याने ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुरळीत होईल, असा विश्वास जि.प.चे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)