बुस्टर डोजसाठी राज्यात आले ११ लाख ८७ हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:09+5:302021-02-14T04:09:09+5:30
नागपूर : कोरोना आटोक्यात येत आहे असे वाटत असताना विदर्भासह इतरही जिल्ह्यात रुग्ण वाढताना दिसून येत आहे. यामुळे पहिली ...

बुस्टर डोजसाठी राज्यात आले ११ लाख ८७ हजार डोस
नागपूर : कोरोना आटोक्यात येत आहे असे वाटत असताना विदर्भासह इतरही जिल्ह्यात रुग्ण वाढताना दिसून येत आहे. यामुळे पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोजचे महत्त्व आणखी वाढले आहे. राज्यात सोमवारपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला म्हणजे ‘बूस्टर’ डोजला सुरूवात होत आहे. यासाठी शनिवारी सीरम इन्स्टिट्युटची ‘कोविशील्ड’ लसीचे १० लाख ३५ हजार ५०० तर भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’लसीचे १ लाख ५२ हजार ६० असे एकूण ११ लाख ८७ हजार ५६० डोज आरोग्य विभागाला उपलब्ध झाले
राज्यात १६ जानेवारीपासून सर्वत्र लसीकरणाला सुरुवात झाली. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला त्यांना लस टोचल्याच्या २८ दिवसानंतर दुसरा बूस्टर डोस देण्याचा नियम आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोना आणीबाणीच्या काळात फ्रंटवर लढलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तर मागील काही दिवसांपासून पोलिसांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. सुरुवातीला राज्यभरात पहिल्या टप्प्यासाठी ९ लाख ७३ हजार लसीचे डोज उपलब्ध झाले होते. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘कोविशील्ड’ लसीचे आणखी ८ लाख ३९ हजार डोज मिळाले. आता पुन्हा डोज उपलब्ध झाले आहे. परंतु लसीकरणाला अपेक्षेप्रमाणे कमी प्रतिसाद मिळत असल्याने केंद्रावर मोठ्या प्रमाणात लसींचा साठा असल्याचे बोलले जात आहे.
-नागपूर विभागाला १ लाख २० हजार १०० डोज
शनिवारी मुंबईला कोविशील्डचे २ लाख ६६ हजार ६००, ठाणे विभागाला १ लाख ३२ हजार, नाशिक विभागाला ९९ हजार, पुणे विभागाला १लाख ८३ हजार ७००, कोल्हापूर विभागाला ६२ हजार ४००, अकोला विभागाला ६६ हजार ८००, औरंगाबाद विभागाला ५६ हजार ९००, लातुर विभागाला ४८ हजार तर नागपूर विभागाला १ लाख २० हजार १०० डोज मिळाले.