१० वी पास ठगबाजाने घातली ३ हजार लोकांना टोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 10:39 AM2020-11-17T10:39:44+5:302020-11-17T10:40:09+5:30

Nagpur News Crime नागपुरात ठगबाजांनी त्यांच्या चिटिंग कंपनीत चार महिन्यात चक्क ३ ते ४ हजार गुंतवणूकदार जोडले अन् त्यांचे ५० ते ६० कोटी रुपये (किमान) गिळंकृत केले.

10th pass cheater cheated on 3,000 people | १० वी पास ठगबाजाने घातली ३ हजार लोकांना टोपी

१० वी पास ठगबाजाने घातली ३ हजार लोकांना टोपी

Next
ठळक मुद्देस्वत: बांधले बंगले - गुंतवणूकदारांना केले कंगाल

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे देशभर हाहाकार उडाला असतानाच्या काळात एक दहावी पास ठगबाज नागपुरात रिअलट्रेड कंपनी सुरू करतो... माणूस माणसाकडे जायला तयार नसतानाच्या या कालावधीत या कंपनीचा मास्टरमाईंड प्रमोटर रोज शेकडो गुंतवणूकदारांना कंपनीचे सभासद बनवितो अन् एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला तर तिसरा चाैथ्याला अशा प्रकारे तब्बल तीन ते चार हजार लोकांना फसवून त्यांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केले जाते... एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही फसवणुकीची मालिका उघड झाल्यानंतर तपास अधिकारीही चक्रावतात. प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय ठगबाज चार्ल्स शोभराज यांच्या बनवाबनवीची आठवण करून देणारे अन् या ठगबाजाचे नाव आहे विजय रामदास गुरनुले.

हिंगणा भागात राहणारा गुरनुले केवळ दहावी पास असला तरी चांगलाच गुरुघंटाल आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघत असताना आणि मोठमोठे उद्योग व्यवसाय कोलमडले असताना गुरुघंटाल गुरनुलेने त्याचा आयटी एक्सपर्ट मावसभाऊ अविनाश महादुलेच्या मदतीने एप्रिल महिन्यात ऑनलाईन ट्रेडिंग कंपनी सुरू केली. मेट्रो रिजन अन् रिअल ट्रेडच्या नावाखाली त्यांनी चेनमार्केर्टिंग सुरू केली. ठगबाज गुरनुले आणि सरकारी नोकरीत असलेला महादुले झुम मीटिंग घेऊन गुंतवणूकदारांना नोटांचे झाड कसे लावायचे, त्याबाबत माहिती देत होते. एकाने ६९ हजार रुपये जमा करणारे ४ जण कंपनीशी जोडायचे. कंपनी प्रत्येक आठवड्याला ५५०० रुपये कमिशन देईल. पती-पत्नीने ४ लाख रुपये जमा करणारे चार मेंबर जोडल्यास आठवड्याला २० हजार रुपये कमिशन मिळेल, असे सांगितले जात होते. अशा प्रकारे या ठगबाजांनी त्यांच्या चिटिंग कंपनीत चार महिन्यात चक्क ३ ते ४ हजार गुंतवणूकदार जोडले अन् त्यांचे ५० ते ६० कोटी रुपये (किमान) गिळंकृत केले. यातून गुरनुले आणि साथीदारांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये मालमत्ता विकत घेतली. बंगले उभारले. त्यांच्या घशात आपली आयुष्याची पुंजी ओतणारे मात्र अक्षरश: कंगाल झाले आहेत.

आता पोलिसांकडे गर्दी

आतापावेतो गुरनुलेच्या कंपनीत गर्दी करणाऱ्यांनी आता त्याची बनवेगिरी उघड झाल्याने तक्रारी देण्यासाठी पोलिसांकडे गर्दी चालवली आहे. काहींच्या तक्रारी सोमवारी पोलिसांनी ऐकून घेतल्या असून, काहींना मंगळवारी बोलविण्यात आले आहे.

मृगजळ दाखवणारा कोठडीत

झूम मीटिंग घेऊन गुंतवणूकदारांना मृगजळ दाखवणारा आरोपी अविनाश महादुले आता पोलीस कोठडीत पोहचला आहे. नॅशनल प्रमोटर म्हणवून घेणारा महादुले आता मात्र आपला या कंपनीशी संबंध नसल्याचा कांगावा करीत आहे.

 

Web Title: 10th pass cheater cheated on 3,000 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.