व्याजाचे आमिष दाखवत गुंतवणूकदाराची १० लाखांनी फसवणूक; अजनी पोलिसात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Updated: September 6, 2022 17:19 IST2022-09-06T17:14:20+5:302022-09-06T17:19:51+5:30
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुमसरे यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

व्याजाचे आमिष दाखवत गुंतवणूकदाराची १० लाखांनी फसवणूक; अजनी पोलिसात गुन्हा दाखल
नागपूर : १३ टक्के व्याजाचे आमिष दाखवत गुंतवणूकदाराची १० लाखांनी फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी शुभाशीष महिला अर्बन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला आहे.
मानेवाडा बेसा येथील अंबानगर येथे राहणारे गुणवंत वामनराव तुमसरे (५६) यांना शुभाशीष महिला अर्बन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत काशीराम कनेरे (६०, हुडकेश्वर), रितेश प्रभाकर होले (महाल) तसेच अध्यक्ष सीमा प्रभाकर होले (महेश नगर) व उपाध्यक्ष राखी प्रकाश आसटकर यांनी २०१७ मध्ये संपर्क साधला. सोसायटीत पैसे गुंतविले तर १३ टक्के व्याजाने परतावा मिळेल अशी त्यांनी बतावणी केली. त्यांच्यावर विश्वास ठेवत तुमसरे यांनी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली.
गुंतवणूक करून अनेक दिवस झाल्यावरदेखील व्याजाच्या परताव्याबाबत कुणीच शब्द काढत नसल्याने तुमसरे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र सोसायटीतून त्यांना व्याजाचे पैसे तसेच मुद्दल परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुमसरे यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली व त्यानंतर चारही आरोपी अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.