पर्यावरणपूरक 'दहीहंडी'त मराठी तारे-तारकांचा झगमगाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:36 IST2025-08-16T09:36:15+5:302025-08-16T09:36:49+5:30
ठाण्यात 'शोले'च्या थीमद्वारे कलाकारांना देणार मानवंदना

पर्यावरणपूरक 'दहीहंडी'त मराठी तारे-तारकांचा झगमगाट
मुंबई : मागील काही वर्षांपासून मुंबई-ठाण्यासह पुण्यातील दहीहंडी उत्सवांना उपस्थित राहून कलाकार गोविंदांचा उत्साह वाढवत असतात. त्यामुळे कोणते कलाकार हे कोणत्या दहीहंडीला उपस्थित राहतात याची उत्सुकता असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक दहीहंडीला कलाकार हजेरी लावणार आहेत. तर, ठाण्यातील वर्तकनगर येथील प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीची थीम 'शोले' चित्रपटाची आहे. या चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दहीहंडीद्वारे चित्रपटातील कलाकारांना मानवंदना दिली जाणार आहे.
दादर येथील आयडियल बुक कंपनीने श्री साई दत्त मित्र मंडळ आणि बाबूशेठ पवार मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. यात महिला दहीहंडी, सेलिब्रिटी दहीहंडी आणि देखावा सादरीकरण केले जाणार आहे. महिला व पुरुष गोविंदा पथकांच्या विशेष सलामीने उत्सवाची सुरुवात होईल. यावेळी रोहन कदम, मिस्टर एशिया सुहास खामकर, अभिनेता भूषण घाडी आदी कलाकार उपस्थित असतील.
ऐतिहासिक देखावा
दिव्यांग व नेत्रहिन गोविंदा पथकेही थरावर थर रचून, 'बोल बजरंग बली की जय'ची आरोळी देत दहीहंडी फोडण्यासाठी पुढे सरसावणार आहेत. कोकणातील शेकडो वर्षापासूनच्या लोकप्रिय व पारंपरिक नाट्यप्रकार असलेल्या लोककलेवरील 'दशावतार' या आगामी चित्रपटातील अभिनय बेर्डे, सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी इंदलकर या कलाकारांची विशेष उपस्थिती या दहीहंडीला लाभणार आहे. शिवसागर गोविंदा पथकाकडून यंदा तीन थर रचून चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा ऐतिहासिक देखावा सादर केला जाणार आहे.
संतोषचा मुंबई-पुणे दौरा...
'छावा' चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या संतोष जुवेकरचा घाटकोपरमधील असल्फा, कल्याण आणि पुणे येथे बाणेर असा मोठा दौरा आहे. घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांनी मुंबई पोलिसांसाठी दहीहंडीचे आयोजन केले आहे.
सईची उणीव भासणार...
मराठीसह हिंदीतही काम करणारी रसिकांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या परदेशात असल्याने मुंबई-पुण्यातील गोपाळकाला उत्सवात तिच्या ग्लॅमरचा जलवा पाहायला मिळणार नाही.
कुर्त्यात 'दगडू'चा जल्लोष
प्रेक्षकांमध्ये दगडू या नावाने लोकप्रिय असलेला प्रथमेश परब हा मंगेश कुडाळकर कुर्ला येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात गोविंदाचा उत्साह वाढविण्यास पोहोचणार आहे.