झीनत अमान, सिंथॉल आणि रेगे सर

By Admin | Updated: March 1, 2015 15:03 IST2015-03-01T15:03:07+5:302015-03-01T15:03:07+5:30

झीनत अमानबद्दल परवा कुठल्यातरी वर्तमानपत्रात वाचलं, तेव्हा रेगे सरांची आठवण झाली. गजानन मंगेश रेगे.

Zeenat Aman, Cynthal and Reggie sir | झीनत अमान, सिंथॉल आणि रेगे सर

झीनत अमान, सिंथॉल आणि रेगे सर

>चंद्रमोहन कुलकर्णी
 
झीनत अमानबद्दल परवा कुठल्यातरी वर्तमानपत्रात वाचलं, तेव्हा रेगे सरांची आठवण झाली.
गजानन मंगेश रेगे.
कला विद्यालयात असताना शेवटच्या वर्षाला कलेच्या इतिहासाबरोबरच फाइन आर्ट्स म्हणजेच आमच्या भाषेत ड्रॉइंग अँण्ड पेंटिंगला सौंदर्यशास्त्न आणि अँप्लाईड आर्ट म्हणजे कर्मशियल आर्टला लेखी परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा विषय असायचा : अँडव्हर्टायझिंग!
त्यासाठी अभ्यासाला मोठं भारदस्त आणि लांबलचक नाव असलेलं पुस्तक होतं :
 
अँ ड व्ह र्टा य झिं ग : आ र्ट अँ ण्ड आ य डि या ज 
ऊर्फजाहिरात  : कला आणि कल्पना.
पुस्तकाचे लेखक : गजानन मंगेश रेगे.
कित्येक लोकांना आजही माहिती असतील.
 
शिकवायला स्वत: रेगे सरच येत. मुंबईहून. गोंधळेकर सरांसारखंच, वर्षातनं एक-दोनदाच पण सलग चार एक दिवस येऊन सगळा पोर्शन पूर्ण करत.
टीव्हीवरच्या सिरियल्स आणि नाटकातला अतुल परचुरे आहे ना, त्याला पाहिलं की रेगे सरांची हमखास आठवण होते.
काळे कुळकुळीत, थोडेसे कुरळे केस. मोठं कपाळ, गोल चेहरा, मुख्य म्हणजे सिगारेटी ओढून ओढून काळे-जांभळे झालेले ओठ. पांढरा झब्बा. हातात ब्रीफकेस.
 
दिवसभर लेक्चर. अस्सल मराठी शब्द वापरत शिकवताना. आवडता शब्द : विपणन! पण मस्त शिकवायचे. मस्त म्हणजे, ते शिकवत (तेव्हा त्यातल्या क्लिष्ट शब्दांमुळे कळायचं किती, हा भाग वेगळा; पण) ते आवडायचं फार! समोर बसलेल्या विद्यार्थीगणाकडे अजिबात न पाहता, नजरेला नजर न देता, टेबलावरच्या पुस्तकात मान घालून अखंड शिकवत. मधूनच अचानक उठून आमच्याकडे पाठ करून फळ्यावर बराच वेळ निरनिराळी चिन्हं काढून मुद्दा समजावून सांगत. 
लिहिता लिहिता मधून मधून शाब्दिक संवादही होत असे. पण मागे, मुलांकडे वळून न पाहता.. जणू फळ्याशीच बोलतायत! लेक्चर संपता संपता कसले कसले बाण, अँडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या कल्पना, ग्राफिक्स, त्या क्षेत्रातल्या भारी भारी जड इंग्रजी-मराठी शब्दांची भेंडोळी आणि त्याभोवती केलेले गोल, वंशावळ लिहिताना वापरतात तसे एकातून एक निघालेले हँगर-हँगर, छोटेमोठे चौकोन, त्रिकोण अशा अनेक अगम्य असंख्य गोष्टींनी अर्धा आडवा फळा भरून गेलेला असायचा!
 - वरचा अर्धा फळा रिकामा, कारण बटुमूर्ती!
 
विद्यार्थ्यांबरोबरच चहा प्यायला बाहेर पडत. मुंबईच्या सरांबरोबर चहा प्यायला हॉटेलात (तेच ते सुप्रसिद्ध हॉटेल  विश्‍व) जायचं यात आम्हालाही एक थ्रिल वाटायचं. 
त्यात हे असे आपल्यातलेच एक वाटावेत असे. साधा पांढरा झब्बा आणि साधीशी पँट घालणारे, मुख्य म्हणजे बिनदिक्कत, सभ्यतेला नि संकेतांना फाट्यावर मारून भरपूर स्मोकिंग करणारे मुंबईचे सर!
हॉटेलमधेसुद्धा आत खासगी जागेत न बसता बाहेरच्या लोखंडी खुच्र्या टेबलं असत, तिथं मोकळ्या मनानं ओपनली बसत. 
गेल्या गेल्या असतील नसतील तेवढय़ा सगळ्यांसाठी चहा सांगत आणि टेबलावर त्यांची ती ब्रीफकेस ठेवत. त्यांच्या खास स्टाईलनं ब्रीफकेसचे दोन्ही बाजूचे खटके विशिष्ट पद्धतीनं दाबले, की खट्टाक असा आवाज होऊन ब्रीफकेस आ वासून उघडली जायची आणि आतमधे दिसायचं ते फिकट ऑरेंज रंगाचं मुखपृष्ठ असलेलं, पुठ्ठा बायंडिंग असलेलं  ‘जाहिरात : कला आणि कल्पना’ नावाचं पुस्तक 
- आणि सिगारेटची पाकिटंच्या पाकिटं!
कूल सिगारेट! मेंथॉलवाली!!
दोन ओळीत दहा-दहा सिगारेट्स ठेवलेल्या असल्यानं वीस सिगारेट असलेल्या पाकिटाची जाडी दहा सिगारेट असलेल्या पाकिटापेक्षा अर्थातच दुपटीनं जाड असते. रुंदी, उंचीत बदल होत नाही त्यामुळे या अशा वीस सिगारेट असलेल्या पाकिटाचा आकार मोहक दिसतो. शिवाय त्याची ती वरची विशेष पद्धतीनं उघडली जाणारी फ्लॅप, आतला चांदीचा एक बाजू पांढरी असलेला कागद! व्हाइट आणि थंडगार ग्रीनच्या कॉम्बिनेशनचं रॅपर! धूम्रपानाचं आकर्षण निर्माण व्हायला त्या वयात इतक्या गोष्टी पुरेश्या असतात!
आम्ही एरवी दोन चहा आणि एक सिगारेट चौघात मारणारे. सर असले, की फुल्ल चहा. वर सरांच्या नकळत त्या पाकिटातली ढापलेली कूल कडेला जाऊन फुंकायची! विश्रांतीनंतर पुन्हा लेक्चर सुरू.
अक्षरश: दांडगा अभ्यास. अँडव्हर्टायझिंगवर ग्रंथ लिहिणारा माणूस! (त्यांच्या पुस्तकाचा ब्लर्ब विशेष उल्लेखनीय!) 
एखाद्या माणसाचा त्याच्या विषयाचा अभ्यासच इतका असतो की त्याचे विद्यार्थी त्या विषयात आपोआपच रस घेऊ लागतात! रेगे सर काही नुसते बुकवर्म नव्हते, मुंबईतल्या जाहिरात क्षेत्नात, प्रत्यक्ष काम करणारा माणूस होता तो! मोठमोठय़ा अँड एजन्सीजशी जवळून प्रत्यक्ष संबंध होते त्यांचे. त्यांच्या त्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना मोठाच फायदा असायचा. 
शिकवताना प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचा अंतर्भाव असे. जाहिरात क्षेत्रातले आर्ट डिरेक्टर्स. ग्राफिक डिझायनर्स, फोटो-टायपोग्राफर्स, कॅलिग्राफर्स, मोठमोठे फोटोग्राफर्स, इलस्ट्रेटर्स, दिग्गज कॉपीरायटर्स या सगळ्या लोकांशी त्यांचा किती जवळचा संबंध होता हे लक्षात येत असे.
माहिती, किस्से, गमतीजमती, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असलेली भरगच्च लेक्चर्स अखंड तीन-चार दिवस चालत. 
भविष्यात आपण जगातल्या एका महत्त्वाच्या क्षेत्रात काम करणार आहोत आणि त्या जगाच्या उंबरठय़ावर उभा राहून हा आपला महान शिक्षक आपल्याला त्या इंद्रधनुषी जगाची ओळख करून देत आहे असं काहीसं भारलेलं वातावरण आठवलं की अंगावर आजही रोमांच उभे राहतात!
सिन्थॉल साबणाच्या जाहिरातींच्या कॅम्पेनमधे रेगे सरांचा मोठा सहभाग होता. आणि त्या अँडमधे मॉडेल होती- झीनत अमान!
ते म्हणत, ‘देवानंदनं आणली असेल हिला सिनेमात पहिल्यांदा; पण मॉडेल म्हणून हे आमच्या एजन्सीचं फाइंड!!’
- त्यामुळेच झीनत अमानबद्दल परवा कुठेतरी वाचलं आणि तिचा फोटो पाहिला तेव्हा आपोआपच नाव आठवलं , कृतज्ञतेनं मन भरून आलं.
गजानन मंगेश रेगे!
आदरणीय रेगे सर!!
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)

Web Title: Zeenat Aman, Cynthal and Reggie sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.