बोलाझ- अभिजात भारतीय संगीतासाठी  जीव वेचणार्‍या  परदेशी साधकांच्या दुनियेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 06:01 AM2020-07-26T06:01:00+5:302020-07-26T06:05:01+5:30

युरोपियन संगीताच्या संगतीत मी वाढलो; पण मला ओढ होती अभिजात संगीताची. त्याच्या शोधात इराणपासून सुरू केलेला प्रवास भारतात येऊन थांबला. भारतीय संगीत मन:पूत ऐकलं. त्याचवेळी पखवाजचा दमदार आवाज आत्म्याला  स्पर्श करून गेला आणि मनाने कौल दिला, हेच माझे वाद्य! मी भारतात जेमतेम चार महिने मुक्काम केला; पण  आजवरचे सगळे ‘शहाणपण’ या काळाने पुसून टाकले.  शिस्त, ध्यास, निस्सीम प्रेम. मी इथे काय नाही शिकलो?  या घडणीत मी आरपार बदलत गेलो..! 

In the world of foreign seekers who sell their lives for classical Indian music.. The memories of Hungarian Pakhawaj Player Balázs Virágh.. | बोलाझ- अभिजात भारतीय संगीतासाठी  जीव वेचणार्‍या  परदेशी साधकांच्या दुनियेत

बोलाझ- अभिजात भारतीय संगीतासाठी  जीव वेचणार्‍या  परदेशी साधकांच्या दुनियेत

Next
ठळक मुद्देअभिजात भारतीय संगीतासाठी  जीव वेचणार्‍या  परदेशी साधकांच्या दुनियेत

- बोलाझ

बुडापेस्ट, हंगेरीम्धील एका ‘एन्व्हायर्नमेण्टल ऑप्टिक्स’ प्रयोगशाळेत संशोधक म्हणून काम करणारा बायोफिजिक्सचा विद्यार्थी आणि गुरु पंडित मोहन श्याम शर्मासारख्या एका निर्मोही गुरुकडे पखवाज शिकणारा विद्यार्थी, कलाकार. एकाच व्यक्तीमधील हे दोन अवकाश. परस्परांपासून अगदी भिन्न असलेले, की परस्परांशी एका वेगळ्याच बंधाने जोडलेले? माझ्याकडे बाहेरून बघत असलेल्या माझ्या मित्रांना, गुरुबंधूना कित्येकदा असे प्रश्न पडत असतात तेव्हा मला मात्र माझ्यामध्ये असणार्‍या या दोन अवकाशामध्ये असलेले वेगळ्या पातळीवरील नाते दिसत असते. 
आणि फिजिक्स-बायालॉजीसारखे विज्ञानाचे विषय हे फक्त प्रयोगशाळेत आणि भौतिक प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते उपयोगाचे असतात असे म्हणत आपण त्याभोवती घातलेल्या कुंपणाचे दु:खही होत असते. प्रत्येक गोष्टीमागील, नियमामागील तर्क  जाणून घेण्याची गरज कलेत नसते? - ती तशी नसती तर केवढे अराजक माजले असते! भारतीय राग गायनातील आखीव अशा चौकटी आणि त्यातील स्वरांच्या ये-जा करण्याबाबत असलेल्या, परंपरेने सिद्ध केलेल्या नियमांमध्ये काहीच शास्र नाही? - उत्स्फूर्त दिसणार्‍या लयकारीमध्येसुद्धा मात्रांचे सूक्ष्म हिशोब असतात आणि तालामध्येही चोख गणित आहे म्हणून त्यात थरार आहे हे विसरून कसे चालेल? हे सगळे मी गेल्या दहा वर्षांपासून अनुभवतो आहे, बघतो आहे. 
या अर्थाने मी भारतीय संगीताच्या प्रांतात अगदीच नवखा. जन्मानंतर कितीतरी काळाने, जवळ जवळ 18-19व्या वर्षी आले ते माझ्या आयुष्यात. तोपयर्ंत युरोपियन संगीत ऐकत आणि गिटार-ड्रम याच्या संगतीत वाढत होतो मी. अभिजात कलांविषयी आतून मनस्वी ओढ होती म्हणून वाटले, युरोपच्या पलीकडे असलेल्या जगाचे संगीतसुद्धा ऐकले पाहिजे. आणि सुरुवात केली ती आशियापासून. इराणपासून सुरू झालेला हा प्रवास भारतापयर्ंत येणे अपरिहार्य होते. किंवा खर सांगायचं तर इराणी संगीताने भारतीय संगीताबद्दलचे माझे कुतूहल जागे केले. इराणी संगीत ऐकताना या दोन देशांमधील संगीताची कित्येक शतके जुनी देवाण-घेवाण, परस्परांवरील प्रभाव स्पष्ट दिसत होता. पण भारतीय संगीत ऐकू लागल्यावर त्यातील खोलवर रुजलेले विचारांचे, निसर्गाशी असलेल्या त्याच्या साहचर्याचे सदाबहार बीज दिसले आणि या संगीताचे वेगळेपण जाणवले. मग ऐकत गेलो, पंडित निखिल बॅनर्जी, विलायतखां साहेब, उस्ताद शाहीद परवेझ आणि अर्थात पंडित रविशंकर. एकच वाद्य वेगवेगळ्या शैलीत वाजवणारे कलाकार. हे ऐकता-ऐकता संगीत माझ्या आयुष्यात किती अपरिहार्य आहे हे समजत गेले. त्यातही मला ओढ वाटत होती ती भारतीय नाद, र्‍िहदम आणि त्यातील संगीत, लालित्य याची. पण हे नाते असे माझ्या बाजूने, एकतर्फी राहून चालणार नव्हते मग ठरवले, याच्याशी दोस्ती करीत याला अधिक समजून घ्यायचे. त्यासाठी मार्ग होता तो अर्थात शिक्षणाचा!


मी माझ्याच देशात तबल्याचे शिक्षण देणारा गुरु मिळवला खरा; पण लवकरच मला कळून चुकले, हे शिक्षण मला समाधान देत नव्हते. एखाद्या दुर्मीळ वाटणार्‍या गोष्टीचा स्पर्श बोटाला होताच भ्रमनिरास व्हावा अशी काहीशी भावना होती त्या शिक्षणात. मला हवे होते ते यापेक्षा वेगळे होते. या काळात, इतर सर्व संगीताला माझ्या मनाचे (आणि अर्थात कानाचेसुद्धा) दरवाजे बंद करून फक्त भारतीय संगीतच ऐकण्याचे कठोर व्रत घेतले होते. 
माझ्यासारख्या परक्या भूमीत वाढलेल्या आणि वेगळ्याच संगीतावर जोपासना झालेल्या माणसासाठी भारतीय संगीत समजून घेण्यासाठी घेतलेले ते व्रत होते. माझ्यावर झालेले सगळे आधीचे संस्कार मागे ठेवून अगदी मोकळ्या नजरेने त्याच्याकडे आणि त्यातील आग्रहांकडे बघता यावे यासाठी हे व्रत आवश्यक होते. या संगीतातील धृपद ऐकत असताना स्वरांच्या साथीने कानावर येणारा पखवाजचा दमदार आवाज फक्त मनाला नाही, आत्म्याला स्पर्श करतोय असे वाटले, मनाने कौल दिला, हे नक्की माझे वाद्य..!  
गुरुंसमोर सुरू असलेल्या मैफलीत मला दिसत होते. अनेक मान्यवर कलाकारांना साथ करीत असलेले पंडित मोहन श्याम शर्मा. आमची पहिली भेट झाली ती स्काइपच्या पडद्यावर. मोठी अजब होती ती भेट. गुरुकडे वाद्य होते आणि ज्याला ते वाद्य शिकायचे होते तो शिष्य मात्र रिकाम्या हाताने बसला होता. पखवाजचा इतिहास ऐकत होता. त्यात ऐकायला मिळणार्‍या अनेक गोष्टींचे संदर्भ समजत नसल्याने गोंधळला होता. राक्षसांचे रक्त आणि त्वचा घेऊन कसे निर्माण होते वाद्य? ब्रrाने म्हणे ते निर्माण केले, शंकराच्या तांडवनृत्यात गणपतीने ते वाजवले. आणि त्यामुळे त्यानंतर उपासना करणार्‍या साधूंनी देवस्तुती करणारे श्लोक-ऋचा म्हणण्यासाठी ते वाद्य आपलेसे केले. कोणत्याही देशाचे संगीत शिकण्यासाठी गुरू मिळणे पुरेसे नसते, त्या देशाच्या र्शद्धा, परंपरा, संस्कृती आणि जगण्यात रुजलेल्या रूढी समजून घ्याव्या लागतात हे शिक्षणाच्या या प्रयोगाने मला जणू ठणकावून सांगितले. एका परीने, वेगळ्या भाषेत, माझ्यासाठी गुरुच्या देशाला भेट देण्याचा तो आदेशच होता. गुरुचा सल्ला न घेता माझ्या वयाला साजेसा उतावळेपणा करीत मी मागवलेले वाद्य जेव्हा हातात आले तेव्हा तर मला माझ्या भारतभेटीची निकड स्पष्टपणे जाणवली. भरमसाठ किंमत मोजून मी एक अगदी सुमार वाद्य गळ्यात बांधून घेतले होते..!
भारतात येणारा प्रत्येक अनुभव माझ्यासाठी जगण्याचे धडे देणारा होता. जगणे जेव्हा साधे, किमान गरजांचे असते तेव्हा आपल्या ध्यासावर आपल्याला लक्ष केंद्रित करता येते हे मला या देशाने आणि माझ्या गुरुंनी शिकवले.
साधेसे घर, त्यातील अगदी किमान सोयी, महागड्या ब्रॅण्डचे लेबल नसलेले कपडे आणि खाद्यपदार्थ यातील कोणतीच गोष्ट आनंदासाठी आवश्यक नसते हे सत्य विशीच्या उंबरठय़ावर उभ्या माझ्यासाठी फारच धक्कादायक वगैरे होते. आणि त्यापेक्षा आश्चर्यकारक होता तो माझ्या गुरुंचा कमालीचा निरपेक्षपणा. ते मला मनापासून शिकवत होते, माझ्याकडे काहीही न मागता! फक्त देवाणघेवाणीची भाषा चलनात असलेल्या जगात हे निर्मोहीपण मला चकित करीत होते. 
मी भारतात जेमतेम चार महिने मुक्काम केला; पण आजवरच्या अनुभवाने शिकवलेले (आणि मला वाटत असलेले!) सगळे शहाणपण या चार महिन्यांनी पार पुसून टाकले. मी गुरुजींकडे शिस्त शिकलो, एखाद्या विषयाला वाहून घेणे कसे असते ते बघितले आणि आपल्या ध्यासावर स्वत:ला उधळून देत केलेले निस्सीम प्रेम अनुभवले. आणि हे सगळे घडत असताना एक व्यक्ती म्हणून मी आरपार बदलत गेलो..! 
भारतीय संगीत 15-20 विद्यार्थ्यांच्या ताफ्यात का शिकता येत नाही आणि गुरुच्या सहवासातच ते का शिकावे लागते ते मला गुरुंबरोबर राहून समजले. इथल्या कलाकारांनी गायचे/वाजवायचे राग भले तेच असतील; पण त्या रागाला ओळखण्याचा, आपलेसे करण्याचा आणि आपल्याला समजलेल्या भाषेत मांडण्याचा प्रवास मात्र प्रत्येकाचा वैयक्तिक असतो. त्यावर गुरुच्या संस्कारांची अदृश्य मुद्रा असते. राहण्या-वावरण्यातील सुख सोयींचा अभाव हे मग माझ्यासाठी फार अवघड उरले नाही. 
माझी परीक्षा बघितली ती बोलभाषेने. पखवाज हे देवता स्तुतीसाठी प्राधान्याने वापरले जाणारे वाद्य, त्यामुळे त्याच्या वादनात अनेक स्तोत्रांचे पठण केले जाते. हे पठण करताना माझी अनेकदा तारांबळ उडते. अशा वेळी मला संस्कृत येत नाही याचे कमालीचे दु:ख होते. भारतीय तत्त्वज्ञानाचे आणि मूल्यांचे आधार असलेले वेद आणि उपनिषदे मी वाचू शकत नाही याचीसुद्धा मला अनेकदा शरम वाटते..! माझ्या शिक्षणाचे पुढील लक्ष्य हे भाषा शिक्षण आणि त्यानंतर या ग्रंथांचे पठण हे आहे.
माझ्या गुरुंनी मला फार लवकर रंगमंचाची ओळख करून दिली. ज्यांचे धृपद ऐकत मी संगीताची ओळख करून दिली त्यांना पखवाजाची साथ करण्याची संधी मला मिळाली. मैफलीतील रागाचा मूड कसा ओळखायचा आणि सांभाळायचा ते गुरुजींचे वादन बघताना समजत गेले. हे सगळे मी जेव्हा सांगतो तेव्हा या क्षेत्रातील माझी जागा आणि समज याची नेमकी ओळख मला आहे ही माझ्यासाठी सर्वात भाग्याची ओळख..! हे शिक्षण मी शिकलेल्या विज्ञानाने दिले मला. गणितात एखादे शून्य कोणत्या स्थानी आहे त्यावरून त्याची किंमत ठरत असते ना! माझे मूल्य वाढत जावे हा माझा ध्यास नाही, झाडांच्या मुळाप्रमाणे या संगीताबद्दलची माझी समज अधिक खोलवर जात राहावी  हा ध्यास मात्र नक्कीच आहे..! 

बोलाझ
बोलाझ हा हंगेरीमधील तरुण पखवाजवादक. पखवाज या सर्व तालवाद्यांचा जनक समजल्या जाणार्‍या प्राचीन वाद्याकडे वळणारे जे मोजके कलाकार आहेत त्यापैकी एक. सध्या तो हंगेरीमध्ये भारतीय संगीत शिकवणारे पहिले स्कूल काढण्याच्या प्रक्रियेत आहे. जगभर होणार्‍या धृपद संमेलनांमधून त्याने अनेक मान्यवर धृपद गायकांना साथ केली आहे.

मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे 
vratre@gmail.com
(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)

Web Title: In the world of foreign seekers who sell their lives for classical Indian music.. The memories of Hungarian Pakhawaj Player Balázs Virágh..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app