शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

सागरतळातील अद्भुत दुनिया...

By admin | Published: May 06, 2017 5:12 PM

समुद्राच्या तळाशी कोणता आणि किती खजिना दडलेला आहे ते केवळ निसर्गालाच माहीत. तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या माध्यमातून या खजिन्याच्या काही भागाचं दर्शन मात्र घेता येऊ शकतं..

महेश सरनाईक
 
सागराच्या पोटात काय काय खजिना दडलेला आहे हे सागराच्या पोटात शिरल्याशिवाय कळणार नाही. अगणित असा हा खजिना शोधणं हे माणसाच्या आवाक्याबाहेरचं काम आहे असंही म्हटलं जातं. तरीही जो काही ज्ञात खजिना सागराच्या पोटात आहे, त्याच्या नुसत्या दर्शनानंही माणसानं अचंबित व्हावं अशी स्थिती आहे.
पर्यटनाचं सर्वोत्तम ठिकाण म्हणून तर सागरांची महती आहेच, पण सागरात ठिकठिकाणी दडलेल्या अनमोल खजिन्याच्या दर्शनासाठी स्कुबा डायव्हिंगसारखे उपक्रमही अत्यंत महत्त्वाचे आहेत. 
पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. जेवढे जीव-जंतू जमिनीवर आहेत, त्याहीपेक्षा जास्त पाण्यात आहेत. जितके सौंदर्य जमिनीवर आहे, त्याच्या कैकपटीने ते पाण्यात आहे. या सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्रात सिंधुदुर्गासारखं ठिकाण नाही. इथलंच एक महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजे तारकर्ली. पर्यटकांना जागतिक दर्जाचे सागरी पर्यटन व स्कुबा डायव्हिंगच्या प्रशिक्षणासाठी या ठिकाणाची ख्याती आहे. 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भारत सरकारच्या पर्यटन वित्त पुरवठ्याने तारकर्ली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भारतीय गोताखोरी व जलक्रीडा संस्थान (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ स्कुबा डायव्हिंग अँड अ‍ॅक्वाटीक स्पोटर््स) ची २०१५ साली निर्मिती केली आहे. या केंद्राचे मुख्य प्रशिक्षक आणि महाव्यवस्थापक म्हणून डॉ. सारंग कुलकर्णी काम पाहतात. ते सागरी संशोधकही आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूला पाण्याखाली असलेल्या प्रवाळांचा शोध लावला आणि येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवा खजिना खुला झाला. यामुळे सिंधुदुर्गातील सागरी पर्यटन वैविध्यपूर्ण झाले आहे.
२०१५ पासून ही संस्था कार्यरत झाली आहे. या संस्थेकडे असणाऱ्या पायाभूत सुविधा राज्यातील कुठल्याही सरकारी संस्थेकडे नाहीत. त्यामुळे या संस्थेला पर्यटकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भारतातील किनारपट्टीवरील पर्यटनवाढीसाठीही ते गरजेचे आहे. सध्या तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरमधून स्कुबा डायव्हर्स घडवण्याचे काम तर होत आहेच, पण जैवविविधता आणि सागरी जीवसृष्टीचे संरक्षण करण्याचे कामही त्या माध्यमातून होत आहे. 
डायव्हिंगचं प्रशिक्षण
तारकर्ली येथील भारतीय गोताखोरी व जलक्रीडा संस्थेची निर्मिती २०१५ साली झाली. ही स्कुबा डायव्हिंगबाबतची भारतातील एकमेव शासनमान्य शाखा आहे. अमेरिकेतील पॅडी (प्रोफेशनल असोसिएशन डायव्हिंग एन्स्ट्रक्टर) या कंपनीच्या जगभरात चार शाखा आहेत. पॅडी अमेरिका, पॅडी कॅनडा, पॅडी युरोप, पॅडी आॅस्ट्रेलिया. पॅडी-आॅस्ट्रेलिया अंतर्गत एशिया पॅसेफिक अशी शाखा असून, त्यात तारकर्ली येते. त्यामुळे पॅडीच्या आॅस्ट्रेलिया शाखेतून तारकर्ली येथील संस्थेचा सर्व कारभार चालतो. येथील संस्थेत स्कुबा डायव्हिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सर्व डाटा आॅस्ट्रेलियाकडे पाठविला जातो आणि याबाबतचे प्रमाणपत्र आॅस्ट्रेलियाकडून उपलब्ध होते.
यू.एन.डी.पी. मार्फत आखले जाणारे कार्यक्रम राबविण्याचे काम या संस्थेत केले जाते. नवीन पिढीला स्कुबा डायव्हिंगमध्ये आणण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून हे केंद्र विकसित करण्यात आले आहे. मालवण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर स्कुबा डायव्हिंग चालते. त्यामुळे स्कुबा डायव्हरला या ठिकाणी ट्रेनिंग दिले जाते. एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत संस्थेने २० स्कुबा डायव्हर्स (प्रशिक्षक) निर्माण केले. त्यातील बहुतांशी सध्या मालवण किनारपट्टीवर स्वत:चा व्यवसाय करत आहेत. त्यांना या सेंटरचा मोठा फायदा झाला आहे. 
मुख्यमंत्र्यांनी या संस्थेचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर वर्षभरातच दोन कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे. भविष्यात १०० कोटींपर्यंत जाण्यासाठीचा अ‍ॅक्शन प्लॅनही तयार करण्यात आला आहे. 
 
जीवसृष्टीचे संरक्षण 
समुद्रात मासेमारी करताना अनेकवेळा मच्छिमारांची जाळी खडकाला अडकून तुटतात. त्यातील काही भाग त्या खडकात तसाच राहतो. त्या अडकलेल्या जाळ्यात मासे अडकून मृत पावतात आणि जैवविविधतेचे नुकसान होते. स्कुबा डायव्हिंग सेंटरमधील डायव्हर समुद्रातील अशा प्रकारची जाळी शोधून काढून सागरी जीवसृष्टीचे संरक्षणदेखील करत आहेत. ही संस्था स्थापन झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत १०० पेक्षा जास्त स्कुबा डायव्हर्सनी येथे अनुभव घेतला आहे. यातून २० जण ‘डायमास्टर’ या महत्त्वाच्या पदापर्यंत प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. त्यातील काही जण मालवण किनारपट्टीवर सध्या खासगीदृष्ट्या व्यवसायदेखील करत आहेत.
 
तरुण घेणार सागरतळाचा शोध
मालवण, तारकर्लीची किनारपट्टी वगळता जिल्ह्यातील बहुतांशी भागातील किनारपट्टीवर स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पर्यटनापासून वंचित गावांना शोधून व त्यांना तेथे प्रशिक्षण देऊन पर्यटन व्यवसायात गुंतविण्याचा कार्यक्रम तारकर्ली येथील केंद्राच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. देवगड, विजयदुर्ग, वेंगुर्ले, शिरोडा येथील किनारपट्टीनजीकचा भाग स्कुबा डायव्हिंगसाठी पोषक आहे. या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. सध्या या ठिकाणी १४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 
 
‘ओपन वॉटर’ ते ‘डायमास्टर’
तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये प्रमुख पाच कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. १- ओपन वॉटर, २- अ‍ॅडव्हान्स ओपन वॉटर, ३- ईएफआर (इमर्जन्सी फर्स्ट रिस्पॉन्स), ४- रेस्क्यू ओपन वॉटर आणि पाचवा कोर्स आहे डायमास्टर. प्रत्येक कोर्सप्रमाणे त्याचा कालावधी वाढत जातो. डायमास्टर हा सर्वात महत्त्वाचा अभ्यासक्रम असून, त्याच्या प्रशिक्षणासाठी कमीत कमी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. जून, जुलै आणि आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रशिक्षण बंद असते. 
 
सागरी प्रवाळ (कोरल्स)
समुद्रात अद्भुत रंगाच्या प्रवाळांची विलक्षण दुनिया आहे. प्रवाळ म्हणजे सागरी जिवांची वसाहत. हे जीव वाढत असताना, त्यांची पैदास होताना कॅल्शिअम कार्बोनेटची निर्मिती होते. यामुळेच प्रवाळांना नानाविध आकार निर्माण होतात. यांच्या सान्निध्यात किंवा वसाहतीत इतर अनेक जलचर आश्रय घेतात. उष्ण कटिबंधातील भागात भरपूर सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी प्रवाळांची उत्तम पैदास होते. 
आॅस्ट्रेलियात मैलोन्मैल लांबीचे प्रवाळांचे पट्टे आहेत. असे पट्टे तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. हे कोरल्स अत्यंत संवेदनशील असतात. बदलत्या वातावरणाचा किंवा पर्यावरणाचा त्यांच्या वाढीवर चटकन परिणाम होतो. समुद्रामध्ये सूर्याची किरणे ज्या भागापर्यंत थेट पोहोचतात आणि जेथील पाणी जास्त उथळ नसते, त्याठिकाणी सागरी प्रवाळाची निर्मिती होते. सागरी प्रवाळांमध्ये दरवर्षी एक सेंटिमीटरने वाढ होते.
 
स्नॉर्कलिंग
डोके पाण्याखाली ठेवायचे आणि नळीद्वारे श्वासोच्छ्वास करून पाण्याखालची अद्भुत दुनिया मनसोक्त पाहणे म्हणजे स्नॉर्कलिंग. स्नॉर्कलिंगमुळे मालवणच्या पर्यटनाला नवीन दिशा मिळाली आहे. यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. स्नॉर्कलिंगचा आनंद ८ ते ६० वर्षांपर्यंतच्या पर्यटकांना घेता येऊ शकतो. यासाठी पोहता येण्याची गरज नाही. कमरेत लाइफ सेव्हिंग ट्यूब अडकवली की झाले.
 
सर्वाधिक खोलीचा स्विमिंग पूल
तारकर्ली येथील प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणासाठी बनविण्यात आलेला स्विमिंग पूल भारतातील सर्वाधिक खोलीचा आहे. १८ गुणिले ७ मीटर लांब असलेल्या या स्विमिंग पुलाची खोली ७.८ मीटर आहे. स्कुबा डायव्हरला सर्वप्रथम या स्विमिंग पूलमध्ये प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष समुद्रात ३० मीटरपर्यंत प्रशिक्षण दिले जाते.
 
(लेखक ‘लोकमत’च्या सिंधुदुर्ग आवृत्तीचे प्रमुख आहेत)