ध्यान कशासाठी करायचं? मोक्षासाठी की जगण्यासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:00 IST2018-07-29T03:00:00+5:302018-07-29T03:00:00+5:30
ध्यान हे केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी शिकायचे नसते. ध्यान हे शरीर मनाच्या आरोग्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, मजेत जगण्यासाठी देखील उपयोगी आहे हे भारतीय माणसाने अजून मान्य केलेले नाही.

ध्यान कशासाठी करायचं? मोक्षासाठी की जगण्यासाठी?
थायलंडमध्ये गुहेत अडकलेले तरूण खेळाडू ध्यानाच्या अभ्यासामुळे त्या कठीण परिस्थितीत तग धरू शकले अशा बातम्या आल्यानंतर भारतात तरूणांमध्ये ध्यानाविषयी उत्सुकता थोडीशी वाढली आहे. सजगतेचा, ध्यानाचा शोध आपल्या पूर्वजांनी लावला. पतंजली ऋ षींनी योगाच्या आठ पायर्या त्यांच्या ‘योगसूत्र ’ या ग्रंथात सांगितल्या. गौतम बुध्द यांनी ध्यानाचे, मनाच्या अभ्यासाचे आणि प्रज्ञे चे अंतिम टोक गाठले. भारतात विविध उपासना पद्धतीमध्ये विविध ध्यान पद्धती विकसित झाल्या. स्वामी विवेकानंद यांनी ध्यानाची ओळख पाश्चात्य जगाला सर्वात प्रथम करून दिली. असे असून देखील सध्या भारतातले किती तरूण ध्यानासाठी वेळ देतात असा प्रश्न विचारला तर अमेरिका, युरोप आणि पूर्व आशियातील तरूणांपेक्षा हे प्रमाण खूप कमी आहे असे दिसून येईल.
याचे एक कारण ध्यान हा आपल्या धार्मिक किंवा अध्यात्मिक परंपरेचा भाग आहे. सध्या भारतात ध्यान शिकवणारे सर्वजण- म्हणजे विपश्यना, आर्ट ऑफ लिव्हिंग, सिद्ध समाधी योग, ब्रम्हविद्या, क्रि यायोग, प्रजापती ब्रम्हकुमारी, सहज मार्ग, ओशो, जीवन विद्या मिशन हे सर्वजण - आध्यात्मिक उन्नतीसाठी ध्यान शिकवत असतात. त्यामुळे ध्यान हे शरीर मनाच्या आरोग्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, मजेत जगण्यासाठी देखील उपयोगी आहे हे भारतीय माणसाने अजून मान्य केलेले नाही. एखादा माणूस ध्यान करू लागला म्हणजे संसारातून विरक्त झाला, अध्यात्माला लागला असा समज आपल्याकडे आहे. तो बदलणे आवश्यक आहे. सजगता ध्यान हे शारीरिक व्यायामाप्रमाणेच निरोगी, उत्साही, यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे हे आपण समजून घ्यायला हवे.
ध्यान म्हणजे एखादा विशेष अनुभव, ट्रान्स अवस्था असे भारतातील अनेक जणांना वाटत असते. तसा अनुभव आला नाही म्हणजे ध्यान लागले नाही असे वाटते. अध्यात्मिक गुरु ची कृपा झाली तरच ध्यान जमते असाही गैरसमज येथे आहे. पण ध्यान म्हणजे ट्रान्स स्थिती नव्हे. मनाची ट्रान्स स्थिती ही हिप्नोटाईझ स्थिती, संमोहित अवस्था असते, ते ध्यान नव्हे. बरीच माणसे त्या अवस्थेला ध्यान समजतात आणि ती अवस्था आली नाही की ध्यान लागले नाही असे समजतात.
सजगता ध्यान म्हणजे श्वासाचा स्पर्श पाहणे, शरीरावरील संवेदना पाहणे, मनातील विचार आणि भावना पाहणे आणि त्यांचा स्वीकार करणे होय. असे ध्यान करण्यासाठी कुणाचीही दीक्षा घ्यावी लागत नाही. युट्यूब वरील व्हिडीओ पाहून किंवा मोबाईल अॅपमधून सूचना ऐकूनही हे ध्यान शिकून घेता येते. अशा ध्यानामुळे मेंदूला काही काळ विश्रांती मिळते आणि त्यामुळे माणसाची निर्णयक्षमता वाढते, प्रतिकूल परिस्थितीत देखील त्याचा भावनिक तोल ढळत नाही, कामाचा उत्साह कायम राहातो हे प्रत्यक्ष अनुभवल्याने युरोप अमेरिकेतील अनेक प्रथितयश उद्योगपती, नेते, सैन्याधिकारी, खेळाडू आपल्या व्यग्र आयुष्यात ध्यानासाठी वेळ काढत आहेत.
ध्यानाच्या अभ्यासाने कार्यक्षमता वाढते, मानसिक तणाव कमी होतो, मन शांत होते हे पटल्याने आणि अनुभवल्याने अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे डायरेक्टर आणि सीईओ ध्यान करू लागले आहेत. शरीर मन निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे त्याच प्रमाणे ध्यान देखील आवश्यक आहे,व्यायामाप्रमाणेच ध्यान ही ऐहिक क्रिया आहे. हे या श्रीमंत बुद्धिमान माणसांनी जाणले आहे. त्यामुळे सूट घातलेले आणि बिझनेस क्लासने जगभर फिरणारे, डोळे बंद करून दहा मिनिटे ध्यानाला बसले आहेत असे चित्न आता सहज दिसू शकते.
लिंक्ड इन चा सीईओ जेफ विनर , होल फूडचा सीईओ जोन माके, ट्विटर कंपनीचा सह निर्माता इवान विल्यम्स आणि जगातील सर्वात मोठ्या हेज फंडचा निर्माता रे डलिओ यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे. आपल्या अतिशय व्यस्त आयुष्यात देखील ते ध्यानासाठी वेळ काढतात. सिस्को कंपनीच्या पद्मश्री वारीअर देखील रोज रात्नी ध्यानासाठी वेळ काढतात.
फोर्ड मोटारचे चेअरमन बिल फोर्ड हे ही ध्यानाचे प्रसारक आहेत. कंपनी कठीण परिस्थितीत असताना रोज सकाळी सर्व कर्मचार्यांनी एकत्न बसून करूणा ध्यान करण्याचा परिपाठ त्यांनी सुरु केला आणि त्याचा उत्तम परिणाम दिसू लागला. ते म्हणतात की या ध्यानामुळे सर्व कर्मचार्यांमध्ये संघभावना वाढलीच पण मला स्वतर्ला माझ्याबद्दल प्रेम वाटू लागले, मी स्वतर्ला माझ्या गुणदोषांसह स्वीकारले.
कंपनीमध्ये ध्यानासाठी वेळ देणारी फोर्ड मोटार ही एकच कंपनी नाही. गुगल, फेसबुक, अॅपल कॉम्प्यूटर, आयबीएम अशा अनेक कंपन्यांनी ध्यानासाठी कंपनीतच खास जागा ठेवली आहे.
इबे या ऑनलाईन मार्केटिंग करणार्या कंपनीने सुंदर फुलांनी सजवलेला ध्यान कक्ष निर्माण केला आहे. ट्विटरचा निर्माता इवान विल्यम्स यांनी ‘ऑबिव्हिअस कॉर्पोरेशन’ नावाची नवीन कंपनी सुरु केली असून त्यामधील सर्व कर्मचारी नियमितपणे ध्यान करतात.
सजगता म्हणजे माइंडफुलनेसच्या सरावाने आपली कार्यक्षमता वाढते आणि आनंद अनुभवता येतो. सजगता ध्यानाच्या अभ्यासाने आपल्या सर्व कृती अधिक अचूक आणि परिणामकारक होऊ लागतात. मानसिक तणावाचे दुष्परिणाम होऊ न देता ऐहिक आयुष्यात यश मिळवायचे असेल तर शारीरिक व्यायाम आणि सजगता ध्यान रोज करायला हवे हे भारतीय तरूणदेखील समजून घेतील अशी आशा करूया.
डीजिटल डिटॉक्स
सिस्को कंपनीच्या पद्मश्री वारीअर रोज रात्नी ध्यानासाठी वेळ काढतात. त्या या कंपनीत तंत्नज्ञान प्रमुख आहेत आणि बावीस हजार कर्मचारी त्यांच्या हाताखाली काम करतात.
न्यू यॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या सांगतात,
‘ कॉम्प्यूटर जसा रीबूट करावा लागतो तसाच आपला मेंदू देखील रीबूट करण्याची आवश्यकता असते. ध्यानाने ते होते त्यामुळेच मी हा कारभार कोणत्याही तणावाला बळी न पडता सांभाळू शकते. प्रत्येक शनिवार मी डिजिटल डीटॉक्स करण्यासाठी राखून ठेवते. त्यादिवशी सर्व डिजिटल उपकरणे दूर ठेवून अधिकाधिक वेळ ध्यानासाठी देते.’