'केरळमधला भयानक महापूर ही सर्वांच्या डोक्यावर लटकती आपत्ती आहे’ आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह असं का म्हणताहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 03:00 IST2018-08-26T03:00:00+5:302018-08-26T03:00:00+5:30

जागोजागी नद्यांवर अतिक्रमण होतं आहे, त्यांचे प्रवाह रोखले गेले आहेत. पाहावं तिकडे रस्ते, रेल्वेलाइन्सचं जाळं, झाडं, जंगलांची कत्तल- विकासा’च्या या वाटेवर आपण नद्यांच्या वाटा बंद केल्या. त्यांना वाहायला जागाच ठेवली नाही. कोंडलेल्या या नद्या कधी ना कधी माणसाच्या जिवावर उठतातच!

Why Kerala floods is the danger looming over everyone explains "Water Man" Dr Rajendra Singh | 'केरळमधला भयानक महापूर ही सर्वांच्या डोक्यावर लटकती आपत्ती आहे’ आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह असं का म्हणताहेत?

'केरळमधला भयानक महापूर ही सर्वांच्या डोक्यावर लटकती आपत्ती आहे’ आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह असं का म्हणताहेत?


-डॉ. राजेंद्रसिंह

निसर्ग नेहमी समतोलावर आणि समंजसपणावर चालतो. हा समंजस समतोल राखण्याचं भान ठेवणं हे आपलं काम. निसर्गत:च प्रत्येकाचं स्थान ठरलेलं असतं आणि प्रत्येकाचे हक्कही सुनिश्चित असतात. या हक्कांवर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न केला, दुस-याचा गळा घोटून स्वत: सर्मथ होण्याचा प्रयत्न केला, की परिस्थिती बिघडते. निसर्गाच्या प्रकोपाला मग सामोरं जावं लागतं. आज आपल्यासमोर आहे ते केवळ केरळ; पण असे प्रकोप आपण यापूर्वीही वेळोवेळी पाहिले आहेत, अनुभवले आहेत. त्याचं कारण आहे निरंकुश बेबंदशाही. या बेमुर्वतखोरीला निसर्गही मग त्याच्या पद्धतीनं उत्तर देतो.

नद्या जीवनवाहिनी आहेत. माणसाचे जसे हक्क आहेत, तसेच नद्यांचेही हक्क आहेत आणि हे हक्क आपण मान्य केलेच पाहिजेत.

नद्यांचा पहिला हक्क म्हणजे नद्यांची जमीन त्यांच्यासाठीच सुरक्षित असली पाहिजे. ही सुरक्षित जमीनच मग सगळ्यांना सुरक्षित ठेवते. आज भारतात कुठेच असं होताना दिसत नाही.

नद्यांचा दुसरा हक्क म्हणजे त्यांचे प्रवाह अबाधित राहिले पाहिजेत, त्यांच्या पर्यावरणीय प्रवाहात कोणतीही बाधा आणता कामा नये आणि त्यासाठीची सुनिश्चित व्यवस्थाही आपण जाणीवपूर्वक केली पाहिजे. यातल्या कोणत्याही गोष्टींचं बंधन आपण पाळत नाही आणि त्यामुळेच पूर, महापुरासाख्या घटना वारंवार घडतात.

नद्यांचा तिसरा आणि महत्त्वाचा हक्क म्हणजे नद्या स्वस्थ, निरोगी आणि आरोग्यदायी असल्या पाहिजेत. नद्या जर निरोगी असतील, तरच माणसांचं आरोग्यही चांगलं राहील.

पण आपण रोजच्या रोज नद्या संकुचित करतो आहोत, कारखान्यांचं सांडपाणी, रसायनं, शहरांचं दूषित पाणी त्यात सोडून नद्या प्रदूषित करतो आहोत, नद्यांची पोटं खणून वाळूच्या रूपानं त्यांची आतडी खरवडून काढतो आहोत.
नद्यांचे हक्क आपण हिरावून घेतल्याची परिणिती आपण अनुभवतो आहोत. केरळ हे त्याचंच सध्याचं एक रूप आहे.
44 नद्यांच्या पाण्यानं समृद्ध असलेलं केरळ हे एक राज्य, मात्र यातल्या एकाही नदीचं आरोग्य चांगलं नाही. यातल्या काही नद्या राज्यांतल्या राज्यात वाहणार्‍या आहेत, तर काही नद्या आंतरराज्यीय. काही तामिळनाडूतून येतात, काही कर्नाटकातून. आणि पुढेही वाहत जातात.

राज्यातल्या राज्यात वाहणा-या  छोट्या नद्यांवर राज्य सरकारचा अधिकार असला तरी ज्या मोठय़ा नद्या, एकापेक्षा जास्त राज्यांतून वाहतात, त्यावर केंद्र सरकारचा अधिकार आणि त्यांच्याच अखत्यारीत या नद्या येतात. या दृष्टीनं नद्यांचं आरोग्य चांगलं राखण्याची महत्त्वाची जबाबदारी येते ती केंद्र सरकारवर. पण त्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही.
आज जागोजागी नद्यांवर अतिक्रमण होतं आहे, त्या प्रदूषित करण्याचं काम अहोरात्र सुरू आहे, त्यांचे प्रवाह रोखले गेले आहेत. सर्वत्र रस्ते बांधले गेलेत, रेल्वेलाइन्सचं जाळं विणलं गेलं, झाडांची, जंगलांची कत्तल केली गेली, ‘विकासा’च्या वाटेवर वाहत जाताना नद्यांचं वाहतं पाणी बाहेर पडण्यासाठी ज्या वाटा ठेवायला हव्या होत्या, त्याचा काहीच, कधीच, कुठेच विचार झाला नाही.

डोंगर, झाडं, जंगलांची अनिर्बंध तोड झाल्यामुळे डोंगर, पहाडही सुरक्षित राहिलेले नाहीत. नद्यांच्या, पावसाच्या पाण्यामुळे आता डोंगरही ‘वाहून’ जायला लागले आहेत. त्यांची माती नद्यांच्या पाण्यात जाऊ लागली. त्यामुळे नद्यांचे तळही वर आले. एकीकडे वृक्षकटाई, नद्यांच्या जमिनीवर आक्रमण आणि दुसरीकडे डोंगरांची नदीत मिसळली जाणारी माती. या तिहेरी आघातामुळे नद्यांना वाहायला जागाच उरली नाही. अशावेळी नदीचं पाणी नदीतूनच कसं वाहील? जागा मिळेल तिकडे ते पसरतं, सुसाट पळतं. लोकांच्या घरादारात घुसतं. आपल्याला वाटतं, पूर, महापूर आला. पण हा सगळा आपल्या स्वार्थाचा आणि फक्त स्वत:पुरतं, स्वत:साठी पाहण्याचा परिणाम आहे.

केरळमध्येही आज जे काही घडतं आहे, घडलं ते यामुळेच. 
अशा आपत्तींना जोड मिळते ती मनुष्यस्वभावाची. माणूस शिकतो, शिक्षित होतो, आणखी, आणखी शिकत जातो; पण तो खरंच ज्ञानी होतो का, हा प्रश्न आहे.
पारंपरिक शिक्षणाचं आणि ज्ञान, समंजस शहाणपणाचं नातं व्यस्तच होत गेल्याचं दिसतं. जे अंगभूत समंजस शहाणपण ग्रामीण, खेडूत माणसामध्ये दिसून येतं, तितकं ते शहरी, शिकलेल्या माणसात दिसून येत नाही. आपल्या सुखा-समाधानाची शिक्षित लोकांना जेवढी काळजी असते, तेवढी समाजाच्या भविष्याची चिंता त्यांच्यामध्ये दिसत नाही.

शहरी भागातील बहुतांश लोकांची घरं पाहा. नदी, नाले किंवा पाण्याच्या कुठल्यातरी प्रवाहक्षेत्रात त्यांनी घरं बांधलेली असतात. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह असा चारही बाजूंनी रोखला गेल्यावर पूर येणार नाही तर दुसरं काय होणार? त्यासाठी नद्यांना मुक्त वाहू देणं हा सर्वोत्तम उपाय आहे. नद्यांच्या जमिनीची जागा त्यासाठी कायम आरक्षित राहायला हवी.

प्रत्येक नदीचा स्वभाव वेगळा असतो. सर्व नद्यांना वाचवण्याचा एकच एक उपाय असू शकत नाही. माणसानं नद्यांच्या आधारानं आपलं जीवन सुरू केलं, माणसाच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणण्यासाठी नद्यांनीही आपलं आयुष्य सर्मपित केलं; पण माणसानं आपल्या हव्यासापोटी पूर आणणार्‍या प्रलयंकारी नद्यांमध्ये त्यांचं परिवर्तन केलं आणि आपल्याच हातानं आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.

फार उशीर होण्याआधीच ही चूक आपण सुधारायला हवी, नद्यांना त्यांचं स्वातंत्र्य बहाल करायला हवं.
नद्यांना आपल्या र्मजीप्रमाणे वाहण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अन्यथा नद्यांवर स्वार होण्याच्या प्रयत्नात कदाचित तीच आपल्याला मगरमिठीत घेईल.. 

(  रेमन मॅगसेसे आणि स्टॉकहोम वॉटर पुरस्कारप्राप्त लेखक आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ आहेत.)
शब्दांकन : समीर मराठे

Web Title: Why Kerala floods is the danger looming over everyone explains "Water Man" Dr Rajendra Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.