नऊ ते तेरा- धड ना लहान, धड ना मोठे; अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 06:05 IST2019-01-06T06:02:00+5:302019-01-06T06:05:07+5:30
मोबाइल जरा कुठे हातात घ्यावा, तर सारखा काय मोबाइल? खेळायला जा.. खेळायला जावं, तर अभ्यासाला बस.. अभ्यासाला बसावं, तर एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीचं टुमणं... काही डान्स-बिन्स शिकायला घ्यावा तर हल्लीच्या मुलांचं वाचनच शून्य! - अरेच्चा ! मुलांनी करायचं तरी काय?

नऊ ते तेरा- धड ना लहान, धड ना मोठे; अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’
- गौरी पटवर्धन
ईशा नऊ वर्षांची झाली आणि तिच्या आयुष्यात एक मोठाच प्रॉब्लेम सुरू झाला. तिचं कुठलंच वागणं तिच्या आईबाबांना पटेना. तिच्या सगळ्या गोष्टी आजी-आजोबांना चुकीच्या वाटायला लागल्या.
ती मोबाइल घेऊन बसली, तर मोठी माणसं म्हणतात की सारखा काय मोबाइल? खेळायला जा..
खेळायला गेली तर म्हणतात, अभ्यासाला बस..
अभ्यासाला बसली की म्हणतात, काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटी करत जा..
म्हणून मग तिने डान्सचा क्लास लावला तर आता म्हणताहेत, तुम्हा आजकालच्या मुलांना इतर सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे, पण वाचन मात्र शून्य!
- अरेच्चा! काहीही करा घरातल्या मोठ्या माणसांचं कशानंच समाधान कसं होत नाही? असं म्हणून ईशाही इरेला पेटली आणि म्हणाली, ‘द्या मग चांगलं पुस्तक वाचायला!’
आणि नेमकी इथेच ती फसली!
कारण तिच्या आईबाबांनी, आजी-आजोबांनी लग्गेच त्यांच्या त्यांच्या काळातली कुठलीतरी पुस्तकं आणून तिच्या समोर पुस्तकांचा ढीग केला. तिने उत्सुकतेने एक पुस्तक उघडलं तर त्यातला मुलगा एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी सायकल काढून कुठेतरी लांब जायचा. त्यापेक्षा पटकन मोबाइलवरून फोन का नाही करायचा, हे ईशाला कळेना.
मग तिने दुसरं पुस्तक उघडलं, तर त्यातला मुलगा नुसताच सगळ्या गोष्टींमुळे रडत होता. त्याच्या आयुष्यात फार प्रॉब्लेम्स होते खरे; पण तो नुसताच त्याबद्दल कुरकुर करत होता. आपले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी तो काही करेचना.
ते रडकं पुस्तक वाचायलाही तिला कंटाळा आला.
मग तिने एक डिटेक्टिव्ह गोष्टींचं पुस्तक उघडलं, तर त्या डिटेक्टिव्हला सारखं कोणीतरी तार करायचं. आता तार म्हणजे काय तेच ईशाला कळेना, तर तिला त्या पुस्तकात काय गंमत वाटणार?
शेवटी कंटाळून ईशाने ती सगळी पुस्तकं नापास करून ठेऊन दिली. आणि मग ईशा विरु द्ध तिचे आईबाबा आणि आजी-आजोबा अशी खरी वादावादी सुरू झाली. मोठी माणसं म्हणायची की तुला वाचनाचा कंटाळा आहे, तुला सारखा मोबाइल खेळून त्यातल्या फास्ट गोष्टींची सवय लागली आहे. आणि ईशा म्हणायची की ती पुस्तकंच बोअर आहेत त्याला मी काय करणार??? मला चांगलं काहीतरी वाचायला द्या, मी वाचते.
आता ईशाचं म्हणणं बरोबर होतं. जे पुस्तक वाचायला मजा वाटत नाही ते का वाचायचं? आणि आईबाबांचं म्हणणं होतं, की आम्हाला ही पुस्तकं वाचायला तुझ्याएवढं असताना मजा आली होती, तर तुला कशी येत नाही?
आता हा तिढा सोडवायचा कसा? कारण हे भांडण काही फक्त ईशाच्या घरी नसतं. साधारण नऊ ते तेरा वयाच्या बहुतेक सगळ्या मुलांच्या घरी हे असलंच भांडण चालू असतं. कारण आजी-आजोबा, आईबाबा यांचा काळ आणि आत्ताचा काळ यात खूप गोष्टी बदललेल्या आहेत.
आजी-आजोबा आणि आईबाबा बिनधास्त सायकलवर किंवा चालत मित्र-मैत्रिणींबरोबर शाळेत जायचे. पण आत्ताच्या ट्रॅफिकमध्ये आईबाबा मुलांना जाऊ देत नाहीत.
आईबाबांच्या लहानपणी टीव्हीसुद्धा नव्हता. आत्ताच्या मुलांना बालवाडीत असल्यापासून यूट्यूब माहिती आहे.
आजी-आजोबा आणि आईबाबा शाळेतून घरी आले की दप्तर टाकून द्यायचे. आत्ताच्या मुलांना घरी आल्यावर प्रोजेक्ट्स करावे लागतात, इंटरनेटवर माहिती सर्च करावी लागते, प्रिंटआउट्स काढाव्या लागतात. मग त्यांना अभ्यासाचे क्लास असतात, इतर अॅक्टिव्हिटीजचे क्लास असतात, सतत कुठल्या ना कुठल्या स्पर्धा असतात, परीक्षा असतात.
आणि त्यांना जे वाचायला मिळतं त्यात त्यांच्या जगातल्या या कुठल्याच गोष्टी नसतात. आठवीत आईच्या किंवा बाबांच्या मोबाइलवरून मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सअॅप ग्रुप्स बनवणाऱ्या मुलांना पत्राने संपर्कात राहाणाºया मुलांची गोष्ट आपलीशी कशी वाटेल, याचा विचारच कोणी करत नाही.
मुलांचं मात्र म्हणणं असतं की आम्हाला चांगलं वाचायला द्या, आम्हाला वाचायचं आहे. आणि असं चांगलं आणि मुख्य म्हणजे मुलांच्या जगात आत्ता जे चालू आहे त्याबद्दलच्या सगळं शेअर करण्यासाठी ही खास ‘स्पेस’ आम्ही या पानावर तयार करतोय.
- या जागेत आम्ही तर लिहूच, पण मुलांनीही लिहावं असा प्लैन आहे. मुलांनी काय लिहायचं?- याचं उत्तरही मुलांना आणि त्यांच्या आईबाबांना या ‘स्पेस’मध्येच मिळेल.
थोडी धडपडी, डोकं जरा ‘तिरकं’ चालणारी, सतत काहीतरी कीडे करायला उत्सुक असलेली मुलंमुली... कुचकट न बोलता अशा मुलांना ‘सपोर्ट’ करणारे प्रयोगशील शिक्षक आणि अशा वेड्या मुलांच्या पाठीत धपाटे न घालता त्यांच्या गळ्यात मैत्रीचा हात टाकणाऱ्या आई-बाबांची मिळून एक ‘कम्युनिटी’ बनवता येईल का,असा एक बेत आम्ही शिजत घातलाय.त्याविषयी सांगूच! तर भेटूया, येत्या रविवारी!
manthan@lokmat.com