Veteran scientist Anil Kakodkar's speech at international conference organised by 'Anis' in Mumbai | अस्थिरतेच्या कड्यावर..

अस्थिरतेच्या कड्यावर..

ठळक मुद्देएक समाज म्हणून आपले भविष्य घडविण्याचे पुढारपण आपण आपल्या हाती घेतले पाहिजे.

- डॉ. अनिल काकोडकर

आपण सध्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात जगत आहोत. ही स्पर्धा बर्‍याच कारणांमुळे संथ; पण निश्चितपणे उग्र रूप धारण करीत आहे. प्राण्यांची तगून राहण्याची, संसाधने बळकावण्याची व आपल्या खास हक्काच्या फायद्याची जागा निर्माण करून ती राखून ठेवण्याची मूलभूत नैसर्गिक प्रवृत्ती आणि तत्सम गोष्टी यास कारणीभूत आहेत. गेल्या हजारो वर्षांत मानव प्राणी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन करण्यास शिकला, निसर्गात उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या उपयुक्तेत भर टाकण्यास शिकला आणि आपल्या स्व-संरक्षणाची व आरामदायी जगण्याची साधने निर्माण करणेही शिकला.
या प्रक्रियेत मानवाने सृष्टीतील इतर प्राणिमात्नांना व निसर्गालाच नव्हे तर आपल्यातल्या कमकुवत वर्गालाही अपरिमित हानी पोहोचवली आहे. 
अर्थात विवेकी माणसांचे विचारी मन याच्या समांतर रेषेत विकसित झाले. त्यांनी निसर्गाप्रति व सह-बांधवांप्रति अधिक सर्वसमावेशक व अधिक संवेदनशील होईल अशा मानवतावादी समाजास आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या जवळचे दुसर्‍यांना वाटून देण्याची प्रवृत्ती स्वत:च्या कुटुंबापर्यंतच र्मयादित न ठेवता ती मोठय़ा क्षेत्नात विस्तारली. यातून मानवी संस्कृती निर्माण झाल्या व उच्च मानवी मूल्ये जन्माला आली. भारतात आपल्या वैभवशाली परंपरेतील ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘विश्वस्त वृत्ती’, ‘शांततामय सहजीवन’ व अशाच उच्च संकल्पनांचा आपल्याला अभिमान वाटतो.
नाकर्त्या प्रस्थापितांना विवेकी व प्रागतिक विचारसरणीचे लोक नेहमीच धोकादायक वाटत आले आहेत. यामुळेच हे प्रस्थापित आपला सवतासुभा व आपले प्रभावक्षेत्न सुरक्षित राखण्यासाठी बरेच उपाय योजतात. माझ्या मते अंधर्शद्धांची निर्मिती व त्यांचा बाजारू प्रसार हा याच धूर्तपणाचा भाग असून, त्याला अज्ञ व भोळे लोक बळी पडतात.
एकीकडे मानवाच्या ठायी असलेली उच्च बुद्धिमत्ता व सभोवतालच्या परिस्थितीचे वाढते ज्ञान यामुळे मानवास बलाढय़ बनविले आहे, तर दुसरीकडे आपल्या सध्याच्या समजापलीकडे अनाकलनीय असे बरेच काही आहे याचा विश्वास आपल्याला अहंमन्य होण्यापासून वाचवतो व आपणास इतरांप्रति विनम्र व संवेदनशील ठेवतो. अशा अनेकांतले हे एक महत्त्वाचे मूल्य आपण जोपासले व राखले आहे. मात्न आंधळ्या विश्वासामुळे भोळे लोक धूर्त लोकांच्या अंधर्शद्धा पसरविण्याच्या कारस्थानांना सहज बळी पडतात. या घटना समाजात आम असल्या व त्या समाजास हानिकारक असल्या तरी त्यांचा सर्वात घातक परिणाम समाजातील दुर्बळ व वंचित घटकांवर झालेला दिसतो. ‘महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती’चे सातत्यपूर्ण कार्य या संदर्भात निर्णायक महत्त्वाचे ठरते. अंधर्शद्धांच्या उपद्रवाचा सामना करण्यासाठी उच्च पातळीचे प्रबोधन करणे महत्त्वाचे आहेच; परंतु या उपद्रवापासून समाजातील दुर्बळ व वंचित घटकांचे संरक्षण करणे त्याहून महत्त्वाचे आहे.
येथे मळलेली वाट सोडून अभूतपूर्व कार्य करणार्‍या हुतात्मा नरेंद्र दाभोलकर व त्यांनी तयार केलेल्या धाडसी चमूप्रति मी आदर व्यक्त करतो. संपूर्ण समाजाने महाराष्ट्र अंनिसने चालविलेल्या कार्यास उचलून धरले पाहिजे व त्यांच्या कार्यात त्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे. असे करणे म्हणजेच नरेंद्र दाभोलकर या हुतात्म्यास वाहिलेली खरी र्शद्धांजली असेल.
अंधर्शद्धा म्हणजे हे जग अधिक चांगले बनविण्यासाठी पुढे मार्गक्र मणा करू पाहणारे व त्यांच्या प्रयासापासून ज्यांना धोका वाटतो अशा दोन गटातील संघर्षाचे एक लक्षण आहे. दिवसेंदिवस रोडावत जाणारी पृथ्वीची संसाधने व तशात विकासाच्या न्याय्य हक्कापासून वंचित केला गेलेला फार मोठा मानवी समाज या परिस्थितीत, मला वाटते की, हा संघर्ष अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे. हवामान बदलाचा राक्षस आपल्यापुढे आ वासून उभा असताना एकीकडे आपण जागतिक पर्यावरण अस्थिरतेच्या कड्यावर उभे आहोत तर दुसरीकडे आपल्यापुढे ‘आहे रे’ व ‘नाही रे’ या वर्गातील संघर्ष उभा ठाकला आहे.
सुदैवाने आपण ज्ञानाच्या युगात वावरत आहोत. औद्योगिक युगाच्या तुलनेत ज्ञानाचे तंत्नज्ञान हे आर्थिक कार्यक्र मांच्या विकेंद्रीकरणास व लोकशाहीकरणास अधिक पोषक आहे. नागरी-ग्रामीण दरी तसेच र्शीमंत-गरीब दरी आता तुलनेने सहजगत्या भरली जाऊ शकते. तरुण लोकसंख्येचा लाभ असणार्‍या भारतासारख्या देशाने ही संधी दवडता कामा नये. आपल्यासारख्या महाकाय देशाने पृथ्वीचे संतुलन राखण्यासाठी कृती केली पाहिजे व त्यासाठी ज्या मानवी बुद्धिचातुर्याचा वापर करून आपण आजवरची मार्गक्र मणा केली, त्याचा समुचित वापर केला पाहिजे. यासाठी पृथ्वीच्या कमीत कमी संसाधनांचा वापर करून वाढत्या मानवी गरजा भागविणे, मानवी उपभोग अधिक न्याय्य कारणे व पृथ्वीच्या पोषण करण्याच्या क्षमतेच्या र्मयादेत पृथ्वीच्या संसाधनांवर भार टाकणारी चक्र ाकार अर्थव्यवस्था (सक्यरुलर इकॉनॉमी) निर्माण करणे या गोष्टी अंगीकारण्याची गरज आहे. ही आव्हाने अशी आहेत की जी सुधारित विज्ञान-तंत्नज्ञान व मानवी समजूतदारपणाच्या आधारावरच पेलली जाऊ शकतात.
या पुढील काळात मानवी संघर्ष व शाश्वत मानवी विकासाची आव्हाने परिणामकारकरीत्या पेलण्याप्रति उच्च पातळीची शैक्षणिक कामगिरी व समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन गोष्टी गुरुकिल्ल्या म्हणून कामी येतील, असे मला ठामपणे वाटते. दुर्दैवाने केवळ बोलघेवडेपणापलीकडे आपले या बाबतीतले प्रयत्न गरजेच्या मानाने फार कमी पडत आहेत. 
आपण हे समजून घेतले पाहिजे की भारतीय राज्यघटने अनुसार शिक्षण मिळविणे हा आपला मूलभूत अधिकार आहे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे आणि या बाबतीतली आपली कृती तातडीने होण्याची आवश्यकता आहे.
आज जग प्रचंड गतीने बदलत आहे. आजचे आपल्या पुढील आव्हान हे केवळ समाजातल्या विविध घटकातली ज्ञानाची दरी वेगाने भरून काढणे, एवढेच नसून जग ज्या गतीने टांगा टाकत मार्गक्र मण करीत आहे, त्याच्याबरोबर येऊन आपली चालण्याची गती राखणे, हे मोठे आव्हान आहे. बदलत्या गरजांबरोबर गती राखणे हे औपचारिक शासन प्रणालींकडून होणे थोडे असंभवनीयच वाटते. एक समाज म्हणून आपले भविष्य घडविण्याचे पुढारपण आपण आपल्या हाती घेतले पाहिजे. असे पुढारपण घेण्याचे धाडस नरेंद्र दाभोलकर यांच्यात होते. तेच धाडस दाखवून आपण आपले याबाबतीतले अल्प कर्तव्य पार पाडणे, एवढे तरी किमान आपण करूया.

(महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या मुंबई येथे झालेल्या ‘मानवतेच्या विकासासाठी विवेकवाद’ या आंतरराष्ट्रीय संमेलनातील बीजभाषण) 
अनुवाद : प्रा. अरविंद निगळे

Web Title: Veteran scientist Anil Kakodkar's speech at international conference organised by 'Anis' in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.