वसंत बापट @ ९९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 06:02 AM2021-07-25T06:02:00+5:302021-07-25T06:05:07+5:30

केवळ सौंदर्य, केवळ आनंद - हेच वसंत बापट यांच्या जीवनदृष्टीचं सार होतं! या माझ्या उत्फुल्ल मित्राने किती क्षेत्रात संचार केला हे पाहताना मन थक्क होतं!

Vasant Bapat @ 99 | वसंत बापट @ ९९

वसंत बापट @ ९९

Next
ठळक मुद्देख्यातनाम कवी वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीचा आज प्रारंभ होतो आहे. त्यानिमित्ताने..

- रामदास भटकळ

(ख्यातनाम साहित्यिक, संपादक, प्रकाशक)

‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ हे सेवा दलातलं गीत, ‘देह मंदिर चित्त मंदिर’ ही श्रेष्ठ दर्जाची निर्गुणी प्रार्थना, ‘साखर चुंबन देशील राणी’ हे किंचित खट्याळ प्रेमगीत आणि ‘इंच इंच लढवू’सारखं समरगीत ही सारी एकाच कवीची अपत्यं यावर पटकन विश्वास बसत नाही. ह्याच कवीने पोवाडे लिहिले आहेत. मीना नेरूरकर, झेलम परांजपे यांच्यासाठी नृत्याला साजेसं लेखन केलं आहे. ‘बिजली’पासून सुरू झालेला काव्यप्रवास पाच दशकं चालू ठेवला आहे. आणि राष्ट्रसेवा दलाचं कलापथक वाढवताना अविरत लेखन केलं आहे. वसंत बापट यांच्या लेखनाचा आवाका पाहिला तर सर्जनशीलतेविषयी अनेक प्रश्न सुटतात, आणि काही नव्याने उभेही राहतात.

काव्यलेखन हा त्यांच्या लेखन प्रपंचातील फक्त एक भाग. मोजक्याच कथा, पण बाकी अनंत प्रकारचं लेखन केलं. ‘साधना’ साप्ताहिकाचे (दीर्घकाळ) संपादक या नात्याने त्यांनी किती लेखन केलं असेल याची कल्पना केलेली बरी. बापटांच्या उपलब्ध ग्रंथलेखन सूचीमध्ये एकशेसाठ असंग्रहित साहित्याच्या नोंदी आहेत. त्यातून अनेक पुस्तकं तयार होऊ शकली असती; पण त्यांचा कार्यबाहुल्यामुळे ही जमवाजमव तशीच राहिली असणार.

प्रवास हा बापटांचा छंद. काव्यवाचन, राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाचे कार्यक्रम यानिमित्ताने ते देशभर हिंडत असत. अमेरिकेला दोनदा आणि युगोस्लावियात एकदा जाऊन आले. ‘प्रवासाच्या कविता’ हा प्रवासानुभवाला काव्यरूप देण्याचा त्यांचा फार वेगळा प्रयत्न होता.

कवी वसंत बापटांची ओळख माझ्या पिढीला झाली ती ‘दख्खन राणी’ या त्यांच्या कवितेने. ही कविता ते म्हणायचेही डौलात. त्या कवितेच्या चालीला आगगाडीची लय होती. बापटांनी जीवनभर बाळगलेल्या दृष्टीचं - केवळ सौंदर्य, केवळ आनंद - असं बहुढंगी रूप या त्यांच्या सुरुवातीच्या कवितेतच दिसून आलं.

बापटांनी कधी काय वाचलं याचा थांग लावता येणार नाही. परंतु संस्कृत वाङ्मय, मराठी संतांचा काव्यसंभार, पंडिती काव्य, लावणी-पोवाडे हे जानपद साहित्य या सर्वांना त्यांनी मुरवून घेतलं होतं. आणि पाश्चात्त्य वाङ्मयाशी इतर अनेक मराठी साहित्यिकांपेक्षा त्यांचा अधिक परिचय होता. अनेक वर्षें मराठीचे अध्यापन करीत असत. पण, प्रत्येक अध्यापक अशा तऱ्हेचे चतुरस्र वाचन करीत असेल असं नाही. या सर्वाचा परिपाक म्हणजे मुंबई विद्यापीठात तौलनिक साहित्य-अभ्यासासाठी पहिले टागोर प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.

बापट हे पट्टीचे व्याख्याते होते. विषय साहित्यिक असो, नैमित्तिक असो, सामाजिक असो त्यांची अनेक भाषणं ऐकण्याची संधी मला मिळाली आहे. यशवंत देव यांच्या ‘शब्दप्रधान गायकी’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त कार्यक्रम होता. मंगेश पाडगांवकर, शांता शेळके अशा उत्तम वक्त्यांची भाषणं झाली होती.

त्यानंतर आशा भोसले यांनी आपल्या भाषणात गाणाऱ्यांच्या नकला करून धमाल आणली होती. या सर्वांवर कडी करणारं असं उत्तम भाषण करून बापटांनी त्या कार्यक्रमात ठसा उमटवला.

त्यांच्या काव्यवाचनात नाट्यमयता होतीच. विद्वत्ता आणि गरज वाटल्यास खट्याळपणा यांचं मिश्रण त्यांच्या भाषणात दिसायचं. संस्कृतच्या अभ्यासामुळे त्यांची वाणी स्वच्छ होती.

काही कलाप्रेमी साहित्यिकांनी जाणीवपूर्वक राजकारण टाळलं किंवा काहींनी आणीबाणीच्या दिवसांपुरतं मर्यादित ठेवलं. पण, बापटांना सामाजिक - राजकीय विषयांचं वावडं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या भाषणात तडफही होती. बापट अधूनमधून रंगमंचावरही पाहिले; तरी त्यांची नाट्यमयता कवितांच्या सादरीकरणात पाहिली ती सगळ्यात विलोभनीय होती.

या काव्यवाचनातील यशाची जबर किंमत त्यांना एका बाबतीत चुकवावी लागली. बापटांची कविता ही मंचीय कविता आहे, ‘बिजली’ किंवा ‘दख्खन राणी’सारखी श्रोत्यांचा अनुनय करणारी कविता ही अभिजात नव्हे, असा पुढील पिढीने ओरडा सुरू केला. वास्तविक, त्यांनी निरनिराळ्या प्रकारचं श्रेष्ठ दर्जाचं लेखन केलं होतं. पूर्वसुरींच्या कवितांपैकी अनेकांच्या काही कविता मंचीय वाटण्याइतक्या लोकाभिमुख होत्या. परंतु केशवसुत, बालकवींच्या जमान्यात या प्रकारचा जनसंपर्क नव्हता. हळूहळू काव्यगुणांचा स्वीकार होऊ लागला. नवीन पिढीतील कवीही बापटांच्या विविध लेखनाचे अनुकरण करू लागले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला महत्त्व न देणारेही वसंत बापटांचं साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आणि इतर मानसन्मान यांनी प्रभावित झाले.

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हे मानाचं पद; पण त्यासाठी निवडणूक लढवावी लागे. मुंबईच्या संमेलनासाठी निवडणूक जिंकून बापट अध्यक्ष झाले. बाळासाहेब ठाकरे स्वागताध्यक्ष होते. हिंदुहृदयसम्राट आणि ‘जगाला प्रेम अर्पावे’ म्हणणाऱ्या साने गुरुजींचे अनुयायी यांचं कसं पटणार हा प्रश्नच होता. मी दादरकर असूनही या शिवाजी पार्कच्या संमेलनाला हजर राहिलो नाही. फक्त बापटांचं पुस्तक ‘शततारका’ प्रसिद्ध करायला दिलं. याच संमेलनात बाळासाहेबांनी साहित्यिकांबद्दल अनुदार उद्गार काढले, बापटांनी परखड शब्दांत त्यांना उत्तर दिलं होतं!

बापट निर्भय होतेच; शिवाय त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा होती. त्यांनी किती गोष्टी केल्या या एका आयुष्यात? ते स्वत:ला विचारवंत म्हणवून घेत नसत. पण राजकारण, समाजकारण या सर्वांत ते वाकबगार होते. त्यांना माणसं आवडायची. कलापथकात त्यांनी शेकडो मुलामुलींबरोबर आणि जाणत्यांबरोबरही काम केलं. मुलांबरोबर ते मूल होऊन वागू शकत. तर रावसाहेब पटवर्धन, ग.प्र. प्रधान अशा ज्येष्ठ नेत्यांशीही जवळीक सांगत. साहित्यिकांत मामा वरेरकर आणि आचार्य अत्रे दोघेही त्यांना आपला मानू शकत.

कोणालाही गरज लागली की धावून जायचं, कोणत्याही कामाच्या योजनेत पुढाकार घ्यायचा हा बापटांचा स्वभावच होता. दूरदर्शनवर बरेच सर्जनशील कार्यक्रम आमची मैत्रीण सुहासिनी मुळगांवकर हिच्या बरोबरीने बापटांनी दूरदर्शनवरही खूप काम केलं. ‘प्रतिभा आणि प्रतिमा’, ‘शब्दांच्या पलीकडले’, ‘गजरा’ अशा अनेक कार्यक्रमांत बापटांनी बहार आणली. त्यांना संगीताचा ध्यास होता आणि भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांचे बरेच कार्यक्रम बापटांच्या निवेदनात नटले होते.

बापट सारं काही करू शकत. बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्याही. साने गुरुजी यांनी तशी एक पिढीच तयार केली. तोच वारसा बापट यांनी त्यांच्या वेगळ्या पद्धतीने पुढे चालवला. आता बापटांच्या जन्मशताब्दीनिमित्त या दिशेने शोध घेतला पाहिजे.

‘शेंबडी क्लब’, बापट आणि ‘ग्रंथवाचन’

बापट ऐन भरात असताना एक साहित्यिक गट तयार झाला. हा गट महिन्यातून एकदा एकत्र जेवायला आणि विरंगुळ्यासाठी जात असे. त्यात गंगाधर गाडगीळ, मंगेश पाडगांवकर, सदानंद रेगे आणि श्री.पु. भागवत असायचे. त्या गटाला ‘शेंबडी क्लब’ असं गमतीने म्हणत. त्यांपैकी श्री.पु. भागवत हे शाकाहारी आणि न-मद्य. बापट तितके सोवळे नसावेत. ते ह्या उनाडक्यात भाग घेत. पण, मदिरा सेवनापासून - कुसुमाग्रजांनी दिलेला सुभग शब्द ‘ग्रंथवाचन’ - मात्र अलग असायचे. ते चहासुद्धा घेत नसत. आलटून पालटून हे सहा जण यजमान होत. प्रत्येकाची पद्धत वेगळी. त्यांत बापट दिलदार होते. कधीही दुसऱ्यांनी आधी पाकीट काढावं याची ते वाट पाहत नसत.

ramdasbhatkal@gmail.com

(प्रकाशचित्रे : सतीश पाकणीकर)

Web Title: Vasant Bapat @ 99

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.