रंगमंच- दिग्दर्शनाची सर्जनशील प्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 07:00 IST2018-12-23T07:00:00+5:302018-12-23T07:00:07+5:30

एक रस्त्यावर घडणारा अपघात पाहिला आणि ‘वन सेकंदस लाईफ’ ही एकांकिका सुचली, लिहिली गेली याबद्दल मी मागे एका लेखात सांगितलं आहेच. आज त्या एकांकिकेच्या दिग्दर्शनाबद्दल माझ्या आठवणी शेअर करतो...

Theater - the creative process of directing | रंगमंच- दिग्दर्शनाची सर्जनशील प्रक्रिया 

रंगमंच- दिग्दर्शनाची सर्जनशील प्रक्रिया 

-योगेश सोमण-  
‘वन सेकंदस लाईफ’ लिहितानाच हे दिसलेच होते, की संपूर्ण एकांकिका बसच्या खाली घडते. एकांकिका उभी करायला सुरुवात केली, तेव्हा वाचनाच्या वेळीच एकांकिकेच्या सादरीकरणाचा वेग निश्चित केला, इतर वेळी बºयाचदा नाटकाच्या हालचाली आपण बसवत जातो त्यावेळी नाटकाच्या वेगाच्याबाबत जास्त विचार होतो, परंतु ‘वन सेकंदस लाईफ’च्या वेळी वाचनाच्या वेळीच सादरीकरणाच्या वेगाचा विचार केला. संपूर्ण एकांकिका फक्त एका सेकंदात घडते. या एका सेकंदाच्या वेगाचा फील वाचनातून देण्याचा प्रयत्न मी केला. वाचनादरम्यानच साधारण एकांकिका कशी घडेल, याचे दृश्य डोळ्यांसमोर येत होते. अपेक्षित वेगात संवाद ऐकू येऊ लागल्यावर एक नवीनच अडचण आली. संवादातून निर्माण होणाºया विनोदासाठी, म्हणजे विनोद ऐकून समजून प्रतिक्रिया देण्यासाठी वेळच देता येत नव्हता. म्हणजे लाफ्टरसाठी पात्र बोलायची थांबली तर सादरीकरणाचा वेग खंडित होत होता. मग तालमीदरम्यान अशा संवादातील विरामांच्या वेळी हालचालीत वेग दिला आणि सादरीकरणाचा वेग राखला.
 संपूर्ण एकांकिका बसखाली घडते, असं दिसलं वगैरे ठीक आहे; पण ते प्रत्यक्षात दिसेल कसं, याबाबत नेपथ्यकाराबरोबर खूप ऊहापोह झाला. म्हणजे खºया बसच्या एका बाजूला एक फ्लेक्स समोर उभा करायचा आणि त्याच्या खाली सादरीकरण करायचं, यात एक मोठा धोका दृश्यात्मतेत हा होता की रंगमंचावरील सर्व अवकाश त्या निर्जीव फ्लेक्सनी व्यापला असता आणि खाली छोट्याशा फटीत आमची जिवंत एकांकिका घडली असती आणि मरून गेली असती. त्यामुळे फ्लेक्सची आयडिया रद्द केली. नंतर असं डोक्यात आलं, की मध्यभागी बसच्या लांबी रुंदीइतका एक लेव्हल्सचा चौथरा उभा करायचा, त्याच्या चारही बाजूला बसची टायर्स उभी करायची. अशी नेपथ्य रचना निश्चित झाली; परंतु जशा मी हालचाली बसवू लागलो तेव्हा ही चारही टायर्स प्रेक्षक आणि सादरीकरणात अडथळा वाटू लागली; शिवाय हालचालींसाठी बसखाली जागाही मर्यादित मिळू लागली. मग विचार केला, की एकांकिकेच्या सुरुवातीच्या वाक्यातच दोन जण बसखाली सापडलेत, असं लेखकांनी दोन्ही पात्रांच्या तोंडी दिलेल्या संवादात ऐकू येतंय, तर समोरची एकांकिका बसखाली घडतीये हे दिग्दर्शक म्हणून आपण परत परत दाखवायचा प्रयत्न का करतोय. हा विचार मनात येताच रंगमंचावर एक ९.१२ फुटाचा दीड फूट उंच चौथरा उभा करून त्यावर संपूर्ण एकांकिका सादर करायचं ठरवलं. साउंडमधून बसच्या इंजिनाचा आवाज आणि रस्त्यावरचा गोंगाट याचा माफक वापर करायचा ठरवलं. एकांकिका उभी करताना माझ्यापुढील सगळ्यात मोठं आव्हान होतं हालचाली बसविण्याचे. एक तर फक्त दोन पात्रे. त्यात बसखाली सापडलेली म्हणजे चार फुटाच्यावर हालचाली जाता कामा नये. त्यामुळे दोन्ही पात्र रंगमंचावर दोन्ही पायावर फक्त सुरुवातीला आणि शेवटीच उभी राहणार होती. संपूर्ण एकांकिकाभर बसणे, झोपणे, लोळणे, रांगणे, क्राऊलिंग करणे, गडगडणे, अशा विविध हालचालींची परमुटेशन कॉम्बिनेशन्स बसवली आणि अगदी जणू रोज बसखालीच जगत असल्यासारख्या स्वाभाविक हालचाली बसवल्या. बरं या हालचाली इतक्या दमणूक करणाºया होत्या, की रोज एकांकिकेचे एक एक पान बसवत जावं लागत होतं. तालमीच्या आधी दोन्ही पात्रं आणि मी पाय, गुडघे, मान, हात याचे व्यायाम करायचो आणि प्रत्येक दिवशी सलग जेवढं नाटक बसवलं आहे त्याची सलग रन थ्रू घ्यायचो, यांनी संपूर्ण एकांकिका करायचा दमसाज दोन्ही कलाकारांचा वाढू लागला. एवढ्या अवघड हालचाली करत भरभर संवाद बोलण्याचा स्टॅमिनाही वाढू लागला. एकदा हालचाली आणि बोलणं याचा ताळमेळ व्यवस्थित बसल्यावर संवादातील विराम, स्पष्टता यावर काम केलं.
 सादरीकरण होत असताना मला रंगमंचावरील पाच फुटांच्यावरची स्पेस अनावश्यक होती. त्यामुळे सुरुवातीला समोरून चार फूट लाईट्स ठेवले. मग असं लक्षात आलं, की चारही फूट लाईट्समुळे मागच्या पडद्यावर मोठ्याच्या मोठ्या सावल्या पडतायत आणि त्या सादरीकरणाला मारक ठरतायत. मग या सावल्या मारण्यासाठी रंगमंचाच्या डाव्या आणि उजव्या बाजूने दोन फूट उंचीवरून चार स्पॉट लावले जेणेकरून सावल्या मागच्या पडद्यावर न पडता विंगेमध्ये पडतील आणि वरून जनरलचा डीमर अर्धा ओपन केला. या एकांकिकेच्या दिग्दर्शनाच्या प्रक्रियेला साधारण चाळीस दिवस लागले. पहिला प्रयोग बघून तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह जेव्हा बाहेर पडत होतं तेव्हा प्रत्येकाच्या चेहºयावर काहीतरी अचाट बघितल्याचं आश्चर्य दिसत होतं. १९९६ मध्ये ही एकांकिका मी दिग्दर्शित केली, पण आजही जेव्हा प्रेक्षक त्या एकांकिकेची आठवण सांगतात तेव्हा मनात उगीचच एक विचार येऊन जातो, ‘लेको, तुमच्या आधी रिकाम्या रंगमंचावर काही नसताना ही एकांकिका सादर होताना बघितलीये.’ 
(लेखक प्रसिद्ध रंगकर्मी आहेत.)

Web Title: Theater - the creative process of directing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.