कब्जा फक्त आमचाच असेल, तुमचे काहीही चालणार नाही! ग्रीनलँड बळकावण्याचा हेतू म्हणजे अमेरिकन साम्राज्यवादाचा क्रूर चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:49 IST2026-01-25T11:48:59+5:302026-01-25T11:49:39+5:30
Greenland Issue: ग्रीनलँडमधील अमेरिकेचे आक्रमण हा केवळ एका बेटाचा प्रश्न नाही. तो सध्याच्या जागतिक व्यवस्थेचा क्रूर चेहरा आहे. चीनवर दबाव निर्माण करणे आणि असहाय युरोपचे लचके तोडत राहणे असा यामागे डाव आहे. जगात महत्त्वाच्या ठिकाणांवर आमचा कब्जा असेल अन् तुमचे काहीही चालणार नाही.. अशी एकूणच ट्रम्प यांची भूमिका दिसते आहे.

कब्जा फक्त आमचाच असेल, तुमचे काहीही चालणार नाही! ग्रीनलँड बळकावण्याचा हेतू म्हणजे अमेरिकन साम्राज्यवादाचा क्रूर चेहरा
- रोहन चौधरी
(आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक)
ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन साम्राज्यवाद दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण करत आहे. व्हेनेझुएलामधील अनैतिक आणि बेकायदेशीर हस्तक्षेपानंतर ट्रम्प यांची साम्राज्यवादी नजर ग्रीनलँडवर पडली आहे. रशियाने क्रिमिया आणि युक्रेनचा गिळंकृत केलेला भूभाग, इस्रायलने गाझावर केलेला कब्जा आणि आता ट्रम्प यांची ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी केलेली घोषणा यावरून साम्राज्यवादाचे संकट पुन्हा जगावर घोंगावणार हे निश्चित. आंतरराष्ट्रीय राजकारणात घडत असलेल्या या घटना जरी वेगवेगळ्या भूभागात घडत असल्या तरीही त्यामध्ये साम्राज्यवादाचा समान धागा आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रहिताच्या नावाखाली सामरिक वर्चस्वाची ही पायभरणी आहे.
ग्रीनलँड हे डेन्मार्कचे अर्धस्वायत्त क्षेत्र असले, तरी आर्क्टिक प्रदेशात त्याचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. एकेकाळी 'परिघावरील प्रदेश' मानला जाणारा आर्क्टिक आज थेट जागतिक सामरिक स्पर्धेचे रणांगण बनला आहे. ग्रीनलँड हे या रणांगणाचे प्रवेशद्वार आहे. म्हणूनच ट्रम्प यांना या सामरिक प्रदेशाचे चौकीदार व्हायचे आहे. आर्क्टिक प्रदेशात वेगाने घडत असलेले हवामान बदल, वितळणाऱ्या हिमनद्या आणि त्यामुळे खुले होत असलेले नवे सागरी मार्ग यामुळे ग्रीनलँडचे भू-राजकीय मूल्य झपाट्याने वाढले आहे.
ग्रीनलँडमधील दुर्मिळ खनिजे, विशेषतः लिथियम, कोबाल्ट आणि निकेल, हे केवळ नैसर्गिक साधनसंपत्ती नाही, तर ती हरित तंत्रज्ञान, लष्करी उद्योग आणि सामरिक स्वावलंबनाची गुरुकिल्ली आहे. आपल्याला नोबेल पुरस्कार दिला न गेल्यामुळे आपण ग्रीनलँडवर हल्ला करत आहोत, हे ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य जाणूनबुजून असून त्यांचा डोळा हा नोबेल पुरस्कारावर नसून या नैसर्गिक संसाधनांवर आहे. ट्रम्प यांनी २०१९ मध्येही ग्रीनलँडवर कब्जा करण्याची मनीषा व्यक्त केली होती, परंतु ट्रम्प यांच्या वक्तव्याची हेटाळणी करण्यात आली होती. वर्तमानात साम्राज्यवादालाच जनमताचा पाठिंबा मिळत असल्यामुळे दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या ट्रम्प यांना ग्रीनलँडमध्ये आपली साम्राज्यवादी भूक भागविण्याचे अधिक सोपे आहे.
ट्रम्प यांच्या ग्रीनलँड धोरणांच्या मागे चीनचा वाढता प्रभाव हे देखील एक कारण आहे. अमेरिकन जनमानसात चीनविरोधात प्रचंड असंतोष आहे, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांनी चीनला रोखण्यासाठी कोणतीही कृती केली नाही, हा ट्रम्प यांचा आक्षेप आहे. पहिल्या कारकिर्दीत आपण चीनच्या महत्त्वाकांक्षेला आळा घातला आहे, अशी ट्रम्प यांची धारणा आहे. ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा आणि चीनविरोधाचे कार्ड युरोपला अस्वस्थ करणारे आहे. ग्रीनलँडचा प्रश्न हा युरोपच्या तथाकथित "धोरणात्मक स्वायत्ततेची" कसोटी आहे. अमेरिकेच्या दबावाला विरोध न करता ट्रम्प यांच्या कृतीला मान्यता दिली, तर आंतरराष्ट्रीय नियमाधिष्ठित व्यवस्थेचा पाया कमकुवत होईल. ब्रेक्झिटनंतर आधीच कमकुवत झालेली युरोपियन युती अजून कमकुवत होईल. तसेच अमेरिकेला रान मोकळे करून दिल्यासारखे होईल. आपली साम्राज्यवादी भूक भागवण्यासाठी ट्रम्प अशा असहाय युरोपचा सातत्याने लचके तोडतील, हे ओघाने आलेच. म्हणूनच ग्रीनलँडमधील अमेरिकेचे आक्रमण हा केवळ एका बेटाचा प्रश्न नाही. तो सध्याच्या जागतिक व्यवस्थेचा क्रूर चेहरा आहे.
असे आहेत आर्क्टिकमधील सागरी वाहतुकीचे प्रमुख मार्ग
अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणारे तीन प्रमुख सागरी मार्ग आहेत. ईशान्य मार्ग (नॉर्थईस्ट पॅसेज), वायव्य मार्ग (नॉर्थवेस्ट पॅसेज) आणि प्रामुख्याने न वापरला जाणारा ट्रान्सपोलर सागरी मार्ग (ट्रान्सपोलर सी रूट).
ग्रीनलँडमधील खनिज संपत्तीचा नकाशा
युरोपियन आयोगाच्या अहवालानुसार, ३४ पैकी २५ महत्त्वाचे खनिजे ग्रीनलँडमध्ये आढळले. २०२३ मधील सर्वेक्षणानुसार, युरोपियन आयोगाने "महत्त्वाचे कच्चे पदार्थ" म्हणून ओळखलेल्या ३४ खनिजांपैकी तब्बल २५ खनिजे ग्रीनलँडमध्ये सापडले आहेत.
चीनचा बागुलबुवा, अमेरिकनचा पाठिंबा
१. आर्क्टिकमधील सागरी मार्गावर नियंत्रण मिळवणे म्हणजे भविष्यातील जागतिक व्यापाराच्या मार्गावर प्रभाव टाकणे. त्यामुळे ग्रीनलँडमध्ये बंदरे, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याचे प्रयत्न हा ट्रम्प यांच्या चीनविरोधी व्यापक रणनीतीचा भाग आहे.
२. चीनचा बागुलबुवा उभा करून अमेरिकन जनतेचा पाठिंबा मिळविणे व चीनविरोधी देशांना मित्रवत धारण करण्यास भाग पाडणे हा ट्रम्पचा मनसुबा आहे. जेणेकरून ग्रीनलँडबाबत त्यांच्या या कृतीला अमेरिकन मतदारांच्या आणि जागतिक समुदायाच्या विरोधाला त्यांना सामोरे जावे लागणार नाही.
ग्रीनलँडचे नैसर्गिक संपत्तीचे भांडार
ग्रीनलँड हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असा प्रदेश मानला जातो. या बर्फाच्छादित बेटात झिंक, शिसे, सोने, लोखंडाचे धातू, दुर्मिळ धातू (रेअर अर्थ), तांबे आणि तेलाचे प्रचंड साठे आढळतात.
ग्रीनलँडमध्ये जगातील काही सर्वात मोठ्या दुर्मिळ धातूंचे साठे आहेत, जे उच्च-तंत्रज्ञान उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. त्यामुळे अनेक देश आणि कंपन्यांचे, अगदी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेकांचे लक्ष या बेटाकडे वेधले गेले आहे.
सोने, हिऱ्यांचे आणि तांब्याचे खनिजे
नॅनोर्तलिक आणि दक्षिण ग्रीनलँड या भागात सोन्याचे पट्टिका सापडले आहेत. मनित्सोक परिसरात जो नुकच्या उत्तरेस आहे तिथे हिऱ्यांचे साठे आढळले. तांब्याच्या साठ्याबाबत खनिज संसाधन प्राधिकरण सांगते की हे क्षेत्र अद्याप बहुअंशी अन्वेषित झालेले नाही. ईशान्य व मध्य-पूर्व ग्रीनलँडमध्ये तांब्याचे संभाव्य साठे मोठ्या प्रमाणावर आहेत.