शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ताडोबातल्या वाघिणी:- वन्यजीव सफारी गाइड म्हणून काम करणाऱ्या महिलांच्या जिद्दीची साहसी गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:51 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात १३ महिला वन्यजीव सफारी गाइड म्हणून काम करतात. गाइड म्हणून महिलांनी काम करण्याला परवानगी मिळवणे इथून सुरू झालेला हा थरारक प्रवास...

- अनंत सोनवणे

‘माझा जन्मच ताडोबातला. बाबा वनमजूर आणि ताडोबा तलावाच्या काठावर आमची कॉलनी. जंगलात हुंदडतच मी मोठी झाले,’ शहनाझ बेग सांगत होती. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातली ही पहिली महिला गाइड! शहनाझ एका एनजीओसाठी क्लॉडिया नावाच्या महिलेची मदतनीस म्हणून काम करत होती. क्लॉडियानं एकदा तिला विचारलं, ‘तू का नाही गाइड बनत?’ शहनाझनं वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं. ते म्हणाले, ‘प्रयत्न करून पाहा.’ पहिली सफारी करून शहनाझ परत आली, तर तिचा निषेध करण्यासाठी पुरुष गाइडस् आणि अवघे ग्रामस्थ जंगलाच्या गेटवर गोळा झालेले! तेव्हा तर गाइड बनण्याचा तिचा निर्धार आणखी पक्का झाला.

शहनाझने २००८ पासून गाइडपदासाठी अर्ज करायला सुरुवात केली. २०१४ साली तत्कालीन क्षेत्र संचालक गणपती गरड यांनी सहकार्याची भूमिका घेतली. ते म्हणाले, ‘चार-पाच महिलांचा गट बनवलास तर तुम्हा सर्वांना प्रशिक्षण देता येईल.’ ध्येयानं पछाडलेली शहनाझ मोहर्ली गावातल्या घराघरात गेली. प्रत्येक महिलेला गळ घातली; पण पुरुष स्पर्धकांनी आधीच नकारात्मकता पसरवली होती; बाईच्या जातीसाठी हे क्षेत्र चांगलं नाही. काही पर्यटक वाईट नजरेचे असतात. बलात्कारही होऊ शकतो, वगैरे; पण शहनाझ बधली नाही. अखेर गायत्री वाढई, माया जेंठे, काजल निकोडे, वर्षा जेंठे आणि भावना वाडे या पाच जणी तयार झाल्या. सगळ्याच परिस्थितीनं गांजलेल्या. बहुतेकजणी लेकुरवाळ्या. कुणी नवऱ्याच्या व्यसनानं त्रासलेली, तर कुणी स्वत:च दारूचा व्यवसाय करणारी. पहिल्यांदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेली तेव्हा एकीला भोवळ आली, कारण तीन दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता!

  फोटो-  सुधेन्द्र सोनवणे

या सहा जणींना त्यांच्या कुटुंबीयांनी साथ दिली. गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पगमार्क संस्थेचे मृगांक सावे यांनी या महिलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. पर्यटकांशी कसं बोलायचं इथपासून ते प्राणी, पक्षी, झाडं ओळखण्यापर्यंत सारं काही शिकवलं गेलं. महिनाभरानं परीक्षा झाली आणि सगळ्याजणी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाल्या! हळूहळू त्या इंग्रजी बोलायलासुद्धा शिकल्या.

८ मार्च २०१५ रोजी जागतिक महिलादिनी या सहा जणींच्या जीवनातलं नवं पर्व सुरू झालं. या महिला गाइडना जिप्सीऐवजी कॅन्टरवर नेमणूक दिली गेली. कॅन्टर म्हणजे वन्यजीव सफारीसाठी वापरली जाणारी, उघड्या छताची २२ ते २४ सीटची मिनी बस. पर्यटक सहसा कॅन्टरपेक्षा जिप्सीतून सफारी करणं पसंत करतात. त्यामुळे जिप्सीवर नेमणुकीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू! अखेर २०१९ पासून या सहा जणी जिप्सी सफारीत गाइड म्हणून जाऊ लागल्या. पण दरम्यानच्या काळात गाइड मानांकन प्रक्रियेत त्यांना ‘सी’ श्रेणी दिली गेली. गाइडची ड्यूटी लावताना ‘ए’ आणि ‘बी’ श्रेणीच्या गाइडना प्राधान्य मिळायचं. त्यामुळे यांना पुरेशी संधीच मिळेना. पुन्हा संघर्ष! अखेर रोटेशन पद्धती अस्तित्वात आली आणि ही समस्या सुटली.

या सहा महिला ताडोबाच्या कोअर क्षेत्रात गाइड म्हणून नावारूपाला येत असतानाच गावातल्या इतर महिलांनाही प्रेरणा मिळत होती. सप्टेंबर २०२० मध्ये वनविभागानं एक पक्षी ओळख प्रशिक्षण आयोजित केलं. मोहर्ली गावातल्या सुषमा सोनुले, निरंजना मेश्राम, गीता पेंदाम, वृंदा कडाम, मंजूषा सिडाम, अरुणा सोनुले आणि दिव्या पालमवार या सात महिला त्यात सहभागी झाल्या त्या गाइड बनण्याचा निर्धार करूनच. ‘पगमार्क’चे संस्थापक अनिरुद्ध चावजी यांनी त्यांना पक्षी ओळखायला शिकवलं. दरम्यान बफर क्षेत्राचे उपसंचालक गुरुप्रसाद यांनी बफरमध्ये नाइट सफारी सुरू करायचं ठरवलं आणि डिसेंबर २०१९ मध्ये चार पुरुष सहकाऱ्यांसोबत या सात जणींना संधी मिळाली. रात्रीच्या वेळी पर्यटकांना घेऊन जंगलात जाणं, हे मोठं आव्हानच होतं; पण यांनी ते स्वीकारलं. एकीकडे गणवेशही नव्हता. मग कोणाकडून पॅन्ट आण, कुठून शर्ट मिळव, असं करून त्यांचा प्रवास सुरू झाला. पर्यटकांचा ओघ वाढला. आधी नाक मुरडणारेच आता कौतुक करू लागले.

सफारी गाइड म्हणून काम करू लागल्यावर या १३ जणींचं जीवन आमूलाग्र बदललं. रोजगार उपलब्ध झाल्यानं आर्थिक स्वातंत्र्य तर मिळालंच, शिवाय जगभरातून आलेल्या पर्यटकांशी संवाद होऊ लागल्यानं आत्मविश्वासही प्रचंड बळावला. इंग्रजीची भीतीही गळून पडली. जंगलात अचानक उद्भवलेल्या समस्यांचा सामना करताना अंगी वाघिणीचं बळ आलं. विद्यमान क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक गुरुप्रसाद आणि नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना नवी स्वप्नं मिळाली.

------------------------------------------------------------------

थरारक अनुभवांची शिदोरी

काजल निकोडे : जून २०१६ मधली एक संध्याकाळ. मी आणि शहनाझ कॅन्टर सफारीवर गाइड होते. संध्याकाळी जंगलातून बाहेर निघण्याच्या वेळेस अंधारून आलं. जोरदार वारे वाहू लागले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. कितीतरी झाडं उन्मळून पडू लागली. आमच्या रस्त्यात एक भलं मोठं झाड पडलं. गाडीत २२ पर्यटक, १० लहान मुलं. मोबाइलला नेटवर्क नाही. इतर सफारी गाड्या केव्हाच पुढे निघून गेलेल्या. गेट किमान दोन-तीन कालोमीटर अंतरावर. शेवटी मी आणि शहनाझ गाडीतून उतरलो. जीव मुठीत धरून पायी निघालो. तो सोनम वाघिणीचा परिसर होता. बिबट्याचा वावर होता. सर्वाधिक भय अस्वल आणि रानडुकराचं होतं. एकमेकींना धीर देत, देवाचा धावा करत कसंबसं गेट गाठलं आणि मदत घेऊन पर्यटकांच्या सुटकेसाठी परत गेलो. पर्यटकांनी आमच्या धाडसाला सलाम केला!

 वर्षा जेंठे : माझ्या पर्यटकांना एका पाणवठ्यावर घेऊन गेले होते. रस्त्याच्या कडेला वनमजुरांचे जेवणाचे डबे मांडून ठेवले होते. अचानक छोटी तारा नावाची वाघीण आणि दीड-दोन वर्षांचे तिचे बछडे- छोटा मटका आणि ताराचंद रस्त्यानं चालत आले. बछड्यांनी उत्सुकतेनं डब्यांचा वास घेतला आणि त्यातले दोन डबे उचलून ते जंगलात निघून गेले! नंतर तीन दिवसांनी ते डबे सापडले!

(लेखक पर्यावरण आणि वन्यजीव पत्रकार आहेत)

sonawane.anant@gmail.com