साठीनंतरचे सहजीवन; साठीनंतर विवाह करण्यात गैर काय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 09:09 AM2023-09-24T09:09:33+5:302023-09-24T09:10:37+5:30

ख्यातनाम विधिज्ञ हरीश साळवे यांनी वयाच्या 68 व्या वर्षी लग्न केले. साठीनंतर विवाह करण्यात गैर काय, यावर चर्चा होऊ लागली आहे. साठीनंतरच्या सहजीवनाकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे...

symbiosis after; What is wrong with getting married later? | साठीनंतरचे सहजीवन; साठीनंतर विवाह करण्यात गैर काय

साठीनंतरचे सहजीवन; साठीनंतर विवाह करण्यात गैर काय

googlenewsNext

डॉ. शैलेश उमाटे, मानसोपचारतज्ज्ञ

देशात वय वर्षे साठ पूर्ण केलेल्यांची संख्या १० कोटींहून अधिक आहे. त्यात ६० ते ६४ वयोगटातील दहा टक्के पुरुष विदुर, ४४ टक्के स्त्रिया विधवा आहेत. वाढते जीवनमान, बदलत चाललेली कुटुंबपद्धती यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात एकाकीपणा येतो. या वयात सहजीवनाची ओढ जाणवते.

पाश्चात्य देशात साठीनंतर प्रेम होणे,  लग्न करणे आणि एकत्र राहणे हे बऱ्याच प्रमाणात होते. तेथील समाजाने त्याचा स्वीकारही केला आहे. मात्र, भारतात अजून याची रुजवात व्हायची आहे. म्हणून साठीनंतर नातवाला खेळवावे,  घरातील इतर कामे करावीत, असे ज्येष्ठांकडून अपेक्षित असते. पण, येथील बरीच वृद्ध मंडळी ही एकटीच असतात. बहुधा त्यांची मुले ही बाहेरील देशात स्थायिक झालेली असतात. मग या वयात जोडीदार किंवा साथीदार असावा या विचारात गैर काय आहे ? तसे कुणी पाऊल उचलले तर समाज त्यांना कुत्सित नजरेने पाहतो. त्यांना नावे ठेवतो. बुढ्ढा सठिया गया है, वगैरे शेलकी विशेषणे लावली जातात. सामाजिक दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विवंचन केले जाते. ‘ त्यांना प्रॉपर्टी पाहिजे असेल, त्यांची कामभावना जास्त असेल ‘ असे निष्कर्ष काढले जातात. पण, त्यांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. उतारवयात लग्न करण्याच्या मानवी मनाचा आढावा घेऊ या. १९ व्या शतकात असे काही लग्न व्हायचे का? नक्कीच होत असत. पण, त्यामागील कारणे वेगळी असत. तेंव्हा संपत्तीसाठी, दोन घराण्यांना जोडण्यासाठी किंवा संपत्तीला वारस देण्यासाठी असा समझोता होत असे. स्त्री अशा लग्नासाठी तयार होण्याचे मुख्य कारण म्हणजे समाजात तिचे संरक्षण आणि सुरक्षा. पण समाजातील बदलांनी घराणेशाही गेली. स्त्री स्वबळावर जगू लागली. विभक्त कुटुंब वाढत चाललेले आहेत. सर्वच समाज स्व-केंद्रित होत चाललेले आहेत. अशा कालमानात या लग्नाची कारणे सामाजिक नसून व्यक्तिगत असतील. म्हणून समाज याला अजून नावे ठेवू शकतो.

या वयात आपण रोमान्स करू शकतो, या कल्पनेनेच स्त्री-पुरुष दोघेही भारावून जातात. मनात हुरहुर, पोटात गोळा अशा किशोर वयातील भावना आत्ताही तशाच स्वरूपात येतात. या सर्व भावना रोमांचकारी जाणवतात. प्रेमातील या सर्व भावना सकारात्मक असतात. त्याने मानसिकता सुदृढ राहते. या प्रेमातून आत्मीयता निर्माण होते. प्रेमळ मनात नकारात्मकता कशी राहील ? अशा प्रेमी युगुलांचा जीवनकाळ जास्त कालावधीसाठी असतो, असे बऱ्याच संशोधनात दिसून आले आहे. प्रेम, सहजीवन हे कोणत्याही वयासाठी सकारात्मकच आहे. त्याला वयाच्या बंधनात बांधूच नये.

व्यक्तिगत कारणे चुकीची आहेत का, बघू या...
साठीच्या वयात मनुष्य परिपक्व होतो. स्वतःला बऱ्यापैकी समजून घेत असतो. जर ती अगोदर नातेसंबंधात असेल तर त्यातील चुका, समजुती गैर समजुती यातून पक्व झालेली असते. म्हणून तो दुसऱ्याला समजून घेण्यासाठी योग्य असतो. 
या वयात ज्यांना प्रेम होते, ते स्वतःचा पुन्हा शोध घेतात. ही एक सकारात्मक भावना आहे. दररोजच्या घडामोडीत एक साथीदार गरजेचा असतो. ज्याच्यासाेबत सुखदुःख वाटून घेऊ शकतात. त्याने मानसिकता सुदृढ राहते. 
पुरुषाला घरी परतण्यासाठी कारण असते. स्त्रीला समाजात वावरताना एक आधार असतो. साठीनंतर एकटा असलेल्या व्यक्तीत डिप्रेशन, चिंतेचा आजार जास्त प्रमाणात आढळतात. त्यातून आत्महत्येचा प्रयत्न होऊ शकतो. 
अशा एकाकीपणात शारीरिक आजारही बळावतात. डायबेटिस, ब्लड प्रेशर, हार्ट ॲटॅक इत्यादी आजाराने मृत्यू लवकर येऊ शकतो. एकाकीपणामुळे स्मृतीभंश होतो. ते कामातही कमी पडतात.
एकाकीपण कोणास हवे असते? ही स्थिती स्त्री, पुरुष दोघांनाही लागू होते. पुरुष या वयात साथीदार निवडताना चांगले आरोग्य असलेली स्त्री निवडतात. स्त्री ही चांगले आरोग्य आणि धन असलेले पुरुष निवडते.

Web Title: symbiosis after; What is wrong with getting married later?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.