सुशेगाद !

By Admin | Updated: March 1, 2015 14:44 IST2015-03-01T14:44:42+5:302015-03-01T14:44:42+5:30

गोव्याच्या समुद्रकिनार्‍यांवरची चकाकणारी वाळू आज प्रदूषणानं काळवंडली आहे, मादक द्रव्यांची काहीशी झिंगही चढली आहे, पण तरीही या वाळूत एक वेगळीच जादू आहे.

Suzigadad! | सुशेगाद !

सुशेगाद !

सुजाता सिंगबाळ

 
गोव्याच्या समुद्रकिनार्‍यांवरची चकाकणारी वाळू आज प्रदूषणानं काळवंडली आहे, मादक द्रव्यांची काहीशी झिंगही  चढली आहे, पण तरीही या वाळूत एक वेगळीच जादू आहे. आजही जगभरातील पर्यटक अनिवार ओढीनं वारंवार इथे येतात. गोवा हे त्यांच्यासाठी ‘हॉलिडे डेस्टिनेशन’ नाही,
ते तर त्यांचं दुसरं घरच आहे!
-----------
कांदोळी, हणजुण, वाघातोर. शिवोलीच्या नदीतीरावर एकमेकांच्या हातात हात घालून फिरणारे वार्धक्याकडे झुकलेली विदेशी जोडपी, एखादी वयस्क स्त्री वा दोन वयस्क मैत्रिणी. कधी डॉकमध्ये कॉकटेल घेऊन बसलेले. कधी ड्रम्स वाजवणारे तर कधी अनवाणी पावलांनी किनार्‍यावर चालत जाणारे. 
आयुष्याच्या संध्याकाळीही आपलं आयुष्य आपल्याच मस्तीत आणि आनंदानं जगणारी ही वृद्ध मंडळी पाहिली की आश्‍चर्य वाटतं. 
गोव्यात अशा वयस्क विदेशी नागरिकांचं एक स्वतंत्र असं जग आहे. कांदोळीतल्या कित्येक घरांमध्ये भाडेकरारानं  राहतात. त्यांचा दिवस आपल्यासारखाच सुरू होतो. रोजच्या जेवणासाठीची भाजी, मासोळी, जीवनावश्यक वस्तू  खरेदी करतात. खळखळून हसताना दिसतात. कधी शिवोलीच्या नदीवर मासे गरवताना दिसतात. नाइट लाइफशी त्यांचा तसा संबंध नाही.
त्यांचं जीवन गोव्यात विसावलं आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये यायचं आणि मार्च एण्डला परत जायचं असा नियम जणू ठरलेला. कित्येक विदेशी वयस्क जोडप्यांसाठी गोवा हे जणू विसाव्याचं ठिकाण झालेलं आहे.
गोव्यातील या वेगळ्या विश्‍वाचा भाग झालेले कित्येक जण पर्यटक म्हणून इथे आले, येत राहिले, आणि मग गोवा हे त्यांच्यासाठी ‘हॉलिडे डेस्टिनेशन’ न राहता त्यांचं ते घरच झालं. चाकोरीची वा एकसुरीपणाची भीती वाटल्यामुळे कित्येकजण स्वत:ला शोधण्यासाठी गोव्यात येतात. 
मला भेटलेली स्वित्झर्लंडची अँनी. नॅचरोपॅथीची अभ्यासक आहे. हातात डायरी आणि एक कॅमेरा घेऊन ती इथल्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करते. कडधान्ये, रस (नॅचरल ज्यूस), भाज्यांचे रस, न शिजलेलं अन्न खाते. जानेवारीच्या अखेरीस ती परत मायदेशी जाईल आणि गोव्याच्या ओढीनं पुढच्या वर्षी परत येईल. गोव्यातली चकाकणारी वाळू (जी आज पोल्युशनमुळे काळवंडली आहे). तिच्यावर बसून समुद्राच्या लाटांचा नाद न्याहाळणं हा तिचा छंद. निसर्गाच्या सान्निध्यात राहायला, निर्जन किनारपट्टीवर शांतपणे बसायला तिला आवडतं.  नदीकाठी हिंडणं, शहरापासून दूर निवांत ठिकाणी प्रवासाला जाणं.. या प्रेमापोटी गेली सात-आठ वर्षं सातत्यानं ती गोव्यात येते आहे. 
दक्षिण गोव्यातील उतोर्डा, वेळसाव हे किनारे अजून तितके गर्दीने भसभसलेले आणि कर्मशिअलही झालेले नाहीत; उत्तर गोव्यातील किनारे मात्र याच्या अगदी उलट. 
या विदेशी लोकांची एक गोष्ट मला फार आवडते. ते स्वत:ला विसरून जगतात. स्वत:च्या विश्‍वात दुसर्‍याला डोकावू देत नाहीत आणि स्वत:ही तसं करत नाहीत. स्वातंत्र्याचा कैफ अनुभवताना, स्वत:ला ‘एक्सप्लोअर’ करतानाही त्यांच्या जीवनाला एक शिस्त असते. आपल्यासारखं कुटुंबीय वा मित्र-मैत्रिणींनी आपल्याबरोबर फिरण्यासाठी यावं म्हणून ते ताटकळत राहत नाहीत. त्यांच्या विश्‍वात डोकावताना मलाही वाटलंच, त्यांचा हा गुण आपणही घ्यायला काय हरकत आहे? एकट्यानं फिरण्याचं, राहण्याचं स्वातंत्र्य एकदातरी मनसोक्त उपभोगायलाच हवं.
जगभरातून येणारे हे मित्र गोव्यात सामावले जातात. काही विदेशी संगीतप्रेमी गिटार, व्हायोलिनचे क्लास घेतात. रविवारी वा शनिवारी एकत्र येऊन सांगीतिक कार्यक्रम करतात. स्वत:ला ताजंतवानं ठेवण्यासाठी छोट्या-छोट्या आनंदात सहभागी होतात. 
गोव्याच्या प्रेमात पडलेल्या कित्येक जणांना गोव्यात लाइफ पार्टनरही मिळालाय. सच्चं, खरं प्रेम मिळालंय. ऑस्ट्रीयाची एक तरुणी इथं आली. ऑस्ट्रीयन पतीबरोबर तिचं पटत नव्हतं. तो परत ऑस्ट्रीयात गेला, ही इथेच राहिली. उत्तर भारतातील एका अशिक्षित तरुणाशी (जो तिच्यापेक्षा वयाने लहान आहे) तिची मैत्री झाली. आता दोघे एकत्र राहातात. त्यांनी गोव्यात स्वत:चं ‘गेस्ट होम’ सुरू केलंय. त्यांचं सारं विश्‍वच वेगळं आहे. ते आपल्यासारखे धोपटमार्गी नाहीत. 
कळंगुट-कांदोळी रस्त्यावर असलेल्या बाजारात एखादा अँण्टिक पिस, टेबल लॅम्प वा जीवनावश्यक कलात्मक वस्तू खरेदी करून आपण राहातो ते घर सजवणारी विदेशी युवती वा दांपत्य पाहिलं की वाटतं, किती मस्त जगतात! आपल्या मातीपासून, हजारो मैल दूर, परप्रांतातही आपलं छोटंसं कौटुंबिक विश्‍व उभारतात आणि त्याच विश्‍वात जगताना त्याच्याशी पार एकरूप होऊन जातात. 
मात्र याच एका अनोख्या, विलक्षण सुंदर, अजब, हव्याहव्याशा जगाचं दुसरंही एक रूप आहे. जे भयानक आहे, किडलेलं आहे. स्थानिकांवर अतिक्रमण करणारं आहे. 
मोरजी हे गोव्यातील सुंदर गाव. रशियन लोक इथे पर्यटक म्हणून आले, गावात अंदाजे ७-८ हजाराला मिळणारी घरं त्यांनी तिप्पट रक्कम मोजून भाडेपट्टीवर  घेतली. आज मोरजी ‘मिनी रशिया’ झालं आहे. रशियन भाषेतले फलक जागोजागी दिसतात. ‘टुरिझम’च्या नावानं इथं सारं काही चालतं. स्वत:ची जागा, आपल्या नावावर धंदा आणि चालवणारे विदेशी केवळ रशियनच नव्हे, इटालियन, फ्रेंच, इस्त्रायली आणि आपल्याच देशातील काश्मिरी, झारखंडवाले, दिल्लीवालेही आहेत. पैशाचे व्यवहार, ‘लेनदेन’ यावरून भांडणं, मारामार्‍या, गॅँग वॉरमधून खूनही! गेल्या वर्षी नायजेरियन तरुणांनी ‘एनएच १७’ (नॅशनल हायवे क्रमांक १७) अडवला होता.त्यांच्या टगेगिरीचा समाचार घ्यायला सरकारही कमी पडलं. पर्यटनावर गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा आहे, म्हणून मग पर्यटनाच्या नावानं काहीही चालतं. अशा व्यवहारात कित्येकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. या बेकायदा, काळ्या विश्‍वाला सामावून घ्यायला कोणताही गोवेकर तयार नाही. 
खरंतर गोव्यातील लोक शांत, सुशेगाद. इथे येणार्‍यांना त्यांनी कायमच मोठय़ा मनानं आपल्यामध्ये सामावून घेतलं, पुढेही घेतील. चांगल्याचं त्यांनी नेहमी स्वागत, कौतुकच केलं. त्याच सुशेगाद गोव्याचं हे रूप डोळ्यांत घेऊन बरेच विदेशी पर्यटक गोव्याच्या भूमीवर येतात. त्यांच्या स्वागतासाठी गोव्याचे शांत किनारे आजही बाहू फैलावून तयार आहेत.
 (समाप्त)
 
(गोव्यात दीर्घकाळ वास्तव्य असलेल्या लेखिका सामाजिक जीवनात सक्रिय आहेत.)

Web Title: Suzigadad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.