नाजूक, मनातलं अन् जीवघेणंही लिहिणारी ‘सायमा आफ्रिन’; तिच्या कविता काळजाला भिडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 08:15 PM2020-06-02T20:15:33+5:302020-06-02T20:30:29+5:30

कोलकात्यात आल्यावर सायमाला कविता, कथा आणि कलेचा मोठा दुवा सापडला. घरात कलेचं वातावरण असतं आणि ते फार पोषक असतं.

story of Saima Afrin, who writes delicate, heart-wrenching poems | नाजूक, मनातलं अन् जीवघेणंही लिहिणारी ‘सायमा आफ्रिन’; तिच्या कविता काळजाला भिडतील

नाजूक, मनातलं अन् जीवघेणंही लिहिणारी ‘सायमा आफ्रिन’; तिच्या कविता काळजाला भिडतील

Next
ठळक मुद्देतिला समजायला लागलं तेव्हापासून ते आजपर्यंत सायमा फक्त आपल्या मनातलं गोठलेलं कागदावर उतरवत आली आहे.स्वत:चे, स्वत:पुरते का होईना पण शाश्वत सत्य आपल्या कवितेतून ती उलगडत आली आहे.हळुवार आणि अलगदपणे लिहिणारी सायमा तिच्या कवितांतून सामाजिक भानही जपते आहे.

>> संकेत म्हात्रे

मी नावं लिहिली आपल्या दोघांची
ज्याची अक्षरं अगदी घट्ट निरंतर
एकमेकांच्या मिठीत असतात
हा महासागर स्वच्छ करतो आपल्या नावातल्या कोपऱ्यांनाही
आणि हळूच कुर्वाळतो आपल्या शब्दांतल्या मखमालात विसावणाऱ्या असीम अरण्यांना
लाटा नतमस्तक होतात, शब्दांना धरतात आपल्या माथ्यांवर, पुन्हा परततात
लाटा पुन्हा वर येतात, पुन्हा नाव गिरवतात आपलं इतिहासातल्या हरवलेल्या खजिन्यांवर.
आपण चकाकतो पाण्यावर तरंगणाऱ्या
चांदण्यांखाली ज्या आजन्म वाट पाहतात,
त्या लैलाची जिने आपल्या मजनूचं
पहिलंवहिलं नाव परत करावं...

आता आपण जरा वीसेक वर्षे पाठी जाऊ या. कोलकाता येथे एका १५ वर्षांच्या मुलीला प्रचंड राग आला. ( याचं कारण आपल्याला माहीत नाही, पण त्याने तसा फारसा फरक पडत नाही). ती आदळआपट करू लागली, उशीला रागाने मारू लागली. मग, त्या मुलीने कुठेतरी पेपरात वाचलं की, लिहिण्याने मनातला राग कागदावर उतरवता येतो आणि संपवताही येतो. म्हणून ती लिहू लागली. वाट्टेल ते, वाट्टेल तसं. आपण जे काही लिहिलंय, ते या मुलीनं एका वर्तमानपत्रात आपल्या पद्धतीने पाठवलं आणि पुढच्या आठवड्यात तिनं खरडलेलं काहीतरी कविता या नावाखाली छापून आलं. ती होती, हैदराबादमधल्या सायमा आफ्रिन नावाच्या कवयित्रीची कवितेतली सुरुवात.

ती कोलकात्यात राहत असली, तरीही तिचा जन्म गाया या छोट्याशा शहरातला आहे. हे तेच शहर जिथे गौतम बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झालं. कदाचित, या परिसराचा- जुन्या पिंपळाच्या झाडाचा, गावातल्या वडिलोपार्जित घराचा, पालखीतून येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांचा, घरातल्या रंगीत काचांवर पडणाऱ्या उजेडाचा, त्यातून उधळणाऱ्या कैक रंगांचा, लहान-थोरल्यांच्या कथांचा आणि कुठेतरी बंद डोळ्यांमागच्या सचैल शांतीचा या कवयित्रीवर प्रभाव असलेला जाणवतो. कारण, एका वर्तमानपत्रात काम करणारी सायमा, दुसरीकडे इतकं हळुवार आणि अलगद पण अस्वस्थ करणारं लिहिते,

ही कदाचित गायामधल्या त्या बुद्धाची महती असावी.

पुढे कोलकात्यात आल्यावर सायमाला कविता, कथा आणि कलेचा मोठा दुवा सापडला. घरात कलेचं वातावरण असतं आणि ते फार पोषक असतं. सायमाचे आईबाबा बऱ्याचदा उर्दू आणि फारसी दोह्यांमधून एकमेकांशी संवाद साधत, पण कदाचित यामुळेच सायमावर कवितेचा आणि भाषेचा फार मोठा प्रभाव पडत राहिला. ही कवयित्री शब्दांच्या अधिक जवळ जाऊ लागली. गाया, कोलकाता, कामासाठी हैदराबाद आणि मग कवितेच्या शिष्यवृत्तींमुळे सायमा जग हिंडू लागली किंवा आपल्यात वैश्विक कवितेची मुळात जाणीव असल्यामुळे जगातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांतून तिला निमंत्रणं मिळू लागली. पण, खरी गंमत मला तिच्या कवितेच्या आशयाबाबत वाटते. सूक्ष्मतेचा धागा सायमा अगदी सहज पकडते आणि त्याच्या विळख्यात वाचकाला गुरफटून टाकते. कदाचित, यालाच काव्यानुभूती म्हणत असावेत.

तू, तू होण्याआधी, होतास पाणी, हवा,
जंगल, फूल आणि एक सरोवर
एका परित्यक्त घरातला ज्याचे खांदे हवेच्या झुळुकेने इतक्या वेळा घासले
की शेवटी त्यात निर्माण झाला एक छिद्र.
आत : हलका उजेड. त्यानंतर, फक्त अंधार.
शेवटी अंधारामुळेच तुला कळते
उजेडाची चव जसे कळते रक्त
एका सिंहाला जो पाठलाग करतो त्या रक्ताचा,
काळोखात, स्वत: काळोखासारखा होईपर्यंत.
उजेडाची भूक पसरते जंगलाच्या भूमीवर,
गडद हिरव्या नेचांवर,
त्यांची पानं ज्वलनांच्या रेखाकृतींसारखी,
ज्वालांमध्येच मिसळलेली.
काल, हे तलाव पसरलं या अशुपालाच्या रस्त्यांवर
जे चालले होते सूर्याकडे.
त्या आभाळाने चव घेतली त्या तळ्याची
आणि बाहेर थुंकलं अंधाराला, म्हणजे तुला.

सायमाची कविता ही काळानुसार बदलत गेली आणि त्यात निरनिराळे विषय, आशयघनता आणि अनुभव झळकू लागले. एकीकडे आपल्याला सामाजिक भान येतंय याची चाहूल लागते आणि दुसरीकडे आपला स्वतंत्र आवाज आहे हे सुद्धा जाणवायला लागतं. म्हणजे सुरुवातीला सायमा किट्स किंवा शेलेसारखं लिहू पाहायची. पण पुढेपुढे तिला एक वेगळा सखोल आवाज सापडला आणि तो सुद्धा फार विलक्षण होता. पुढे ती निरनिराळ्या भाषांत कविता वाचू लागली, अभ्यासू लागली, त्यामुळे विविध भाषांत एकच गोष्ट किती वैविध्यपूर्ण मांडली जाते, हे सुद्धा तिला कळू लागलं. कदाचित, कवितेच्या या नव्या वळणावर तिला पाब्लोसारख्याही एका कवीने मोहून टाकलं असावं...

नेरुदाची गाणी भरतात
आपल्या गुडघ्यात शंखातल्या लाटा
मृत्युमुखी पडतात जेव्हा चिरडल्या जातात
होरपळलेल्या ट्रेनमधून उतरणाऱ्या बुटांखाली

सायमाची कविता लिहिण्याची प्रक्रिया फार सुरेख आणि नैसर्गिकतेकडे झुकणारी आहे. ती कधीही कविता ठरवून लिहीत नाही. याउलट, तिचं मंथन चालूच असतं. ती कवितेला तिच्या अंतर्मनात झिरपू देते आणि मग कागदावर उतरवते. कविता लिहीत नसली, तरीही सायमाचा कवितेचा अभ्यास निरंतर चालू असतो. सामाजिकतेचं भान ती फार स्पष्टपणे मांडते. काश्मीर हा विषय तिच्या कवितेत डोकावतो, तसंच जसं नेरुदा, तिचे बाबा किंवा कविता, शब्द पुन:पुन्हा तिच्या ओळींमध्ये आढळतात. काश्मीरमधल्या मुलासाठी सायमा असं लिहिते -

रे मुला बघ एक छोटी कागदाची होडी हलतेय
तांबड्या पाण्यावर
जिथे कत्तल झाली आहे बालगीतांची
जिथे तुझ्या आईने एकेकाळी ठेवला होता
तुझ्या स्वप्नांचा एक अश्रू
आणि एक काजवा, तिच्या चेहऱ्यावरचा
रे मुला मला सांग
या जगाला कधी कळू शकेल का
मर्त्य गर्भात श्वास घेणं किती कठीण असतं ते!

इतकं नाजूक आणि आतलं लिहिणारी सायमा इतकं जीवघेणंही लिहू शकते, यावर विश्वास बसत नाही. पण, माझ्या मते, ज्यांच्या शब्दांना वेदनेचं मूळ कळलं असतं, त्या नेमक्या अर्थाशी आणि अनुभवाशी पोहोचू शकतात. हीच कवितेची किमया!

(संकलन : स्नेहा पावसकर)

Web Title: story of Saima Afrin, who writes delicate, heart-wrenching poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.