Stories about election campaigning | पुणेरी कट्टा- किस्से निवडणूक प्रचाराचे 

पुणेरी कट्टा- किस्से निवडणूक प्रचाराचे 

अंकुश काकडे -  
ताटं करा, ताटं करा ! ही काय भानगड आहे असे तुम्ही विचाराल, तर ही घटना आहे खडकवासला मतदारसंघात रमेश वांजळे यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होती. निरीक्षक म्हणून मी त्या मतदारसंघात हिंगणे परिसरात प्रचार करीत होतो. वेळ सायंकाळी ६.३० ची होती म्हणून तेथील नगरसेवक शैलेश चरवड यांच्यासोबत तुकाईनगर येथील झोपडपट्टीत आम्ही गेलो. तिथे गेल्यावर चरवड प्रत्येक घरात सांगत होते, ‘ताटं करा, ताटं करा.’ मला काही समजेना, की इतक्या लवकर जेवणाची तयारी कसली? पण चौकशी केली तर समजलं, की ताटं करा म्हणजे ओवाळण्यासाठी ताटं करा, असे ते सगळ्यांना सांगत होते. झालं पदयात्रा सुरू झाली. उमेदवार प्रत्येक घरात जात होते तिथे त्यांना ओवाळत होते व मग ओवाळणी टाकली जायची १०० रुपये. एका घरातील बाई धीट होती. ती म्हणाली, ‘अहो सकाळी जे उमेदवार आले होते, त्यांनी २०० रुपये टाकले होते, तुम्हीही तेवढेच टाका.’ आता बिचारा उमेदवार काय करणार? गुपचूप टाकलेना २०० रुपये. लोकसभा निवडणुकीत आम्ही एरंडवणा भागात ७ चाळीत उमेदवारासोबत पदयात्रा करीत होतो. कार्यकर्ते घाई करीत होते, ‘लवकर आवरा, लवकर आवरा. आधीच उशीर झाला आहे.’ एका घरापाशी आलो तर त्या घरातली वयस्कर बाई म्हणाली, ‘थांबा काही घाई करू नका.’ तेथील नगरसेवक राजा मंत्री बरोबर होते. त्यांनीही सांगितले, ‘साहेब, आपली फार जुनी कार्यकर्ती आहे, थोडा वेळ द्या.’ बाई आल्या त्यांनी ओवाळले, उमेदवाराच्या हातावर साखर दिली. उमेदवाराची दृष्ट काढली आणि पुढे म्हणाल्या, ‘या आता परत ५ वर्षानंतरच!’ उमेदवाराबरोबर आमचे सर्वांचे चेहरे एकदम पाहण्यासारखे झाले.

परिचयपत्राचा घोटाळा :
एका बाईने दोन उमेदवारांचे परिचयपत्रे वाटण्याचे काम घेतले होते, सकाळी ती एका उमेदवाराचे पत्रक वाटायची, तर दुपारी त्याच भागात दुसºया उमेदवाराचे पत्रक वाटायची. एका मतदाराचे हे लक्षात आले. त्याने तिला विचारले, अहो सकाळी तुम्ही दुसरेच पत्रक वाटत होता, आता दुसरेच आहे, तिने उत्तर दिले, हो, मी ३ ठिकाणी काम करते. सकाळी एकाचे पत्रक, दुपारी दुसºयाचे पत्रक वाटते तर सायंकाळी तिसºया उमेदवाराचे. पदयात्रेत जाते, १५ दिवस चांगला रोज भेटतो, दरवर्षी का निवडणुका होत नाहीत.
कोथरूडमध्ये एका उमेदवाराची सभा होती. वेळ होती ४ वाजण्याची, सभा ६ पर्यंत संपेल असे संयोजकांनी सांगितले होते. तेथील झोपडपट्टीतील ४०-५० स्त्रिया त्या सभेला आल्या होत्या. पण सभा काही ६ पर्यंत सुरूच झाली नाही. तेव्हा त्या उठून जाऊ लागल्या. तर संयोजक त्यांना थांबवू लागला. तर त्याला म्हणू लागल्या, ६ पर्यंत तुमच्याकडे होतो आम्ही, ७ वाजता आम्हाला पौड फाट्यावर सभेला जायचं आहे. संयोजक गयावया करू लागला, ‘अहो आता सभा सुरू होईल थांबा थोडे.’ पण त्या महिला काही ऐकेनात. उलट त्याच त्याला म्हणू लागल्या, ‘टाईम म्हणजे टाईम, सांगा तुमच्या उमेदवाराला.’ एका मोठ्या नेत्याच्या सभेसाठी लोकांची गर्दी जमवण्याचे काम एका ठेकेदाराला दिले होते, त्यांनी प्रथम विचारले की, कशी माणसं हवीत फक्त उपस्थित रहाणारे हवेत, की टाळ्या वाजवणारे पण हवेत, शिट्ट्या मारणारे, मोठ्याने आवाज काढणारे अशीही माणसे आमचेकडे आहेत, पण प्रत्येकाचा वेगळा असा चार्ज असतो, वक्ता कसा आहे त्यावर आम्ही आमची माणसं उपलब्ध करून देत असतो, त्यामुळे टी. व्ही.वर सभांना जमणारी गर्दी त्यात त्या वक्त्याला मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद, शिट्ट्या हे कशा प्रकारे मिळतात, याची चुणूक आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही.
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Stories about election campaigning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.