Specialty dining rooms :aasha dining hall | वैशिष्टयपूर्ण भोजनगृहे : आशा डायनिंग हॉल
वैशिष्टयपूर्ण भोजनगृहे : आशा डायनिंग हॉल

- अंकुश काकडे - 
आपटे रोडवर साधं जेवणासाठी गेली अनेक वर्षे प्रसिद्ध असलेले आशा डायनिंग हॉल, आजही फास्ट फूडच्या जमान्यात टिकून आहे. १५ ऑगस्ट १९४९ मध्ये रामराव केशव किणी यांनी ते सुरु केलंय. किणी हे मुळचे कर्नाटकातील कारवार जवळील युलगोड या खेडेगावातून ते आणि पत्नी सिताबाई चरितार्थासाठी पुण्यात आले. सुरुवातीस ह्या पती-पत्नीने सारस्वत लोकांचे घरी स्वयपांकी, घरगडी म्हणून काम केले, कांही काळ फर्ग्युसन कॉलेजमधील मेसमध्ये काम करीत असतांना त्यांनी महाराष्ट्रीय पद्धतीचा स्वयंपाक शिकून घेतला, आणि कमला नेहरु पार्कजवळ रेग्युलर बोर्डींग हाऊस नावाने खाणावळ सुरु केली. त्यांच्या जेवणाचा स्वाद पुणेकरांना पसंत पडु लागला आणि मग आपटे रस्त्यावरील वैदिकाश्रम वेदपाठ शाळेतील बंद पडलेली इमारत भाड्याने घेतली आणि तेथे सुरु झालं आशा डायनिंग हॉल. दर महिना पद्धतीने मेस सुरु झाली त्यावेळी महिन्याच्या ३० दिवसांचे  फक्त ११ रुपये घेतले जात होते. २ वेळचं जेवण, दर रविवारी फिस्ट, बुधवारी चेंज असे इतर मेसप्रमाणेच याचं स्वरुप होतं, पण जेवण अगदी साधं, तिखटपणा नाही, फारसं तेल नाही, गरम गरम मोठ्या पोळ्या आणि येथील एक वैशीष्ठ जे इतर दिसत नाही, फणसाची भाजी, पडवळ भाजी, केळ्याची कोशींबीर, बिटाची कोशींबीर, सांभार, कारळ्याची चटणी हे फक्त येथेच पहावयास मिळते.
रामरावांचे निधनानंतर त्यांचे चिरंजीव प्रकाश आणि सुरेश तसेंच नातू अरुण आता हा व्यवसाय पहातात. पूर्वी तळमजल्यावर असलेला डायनिंग हॉलचे नूतनीकरण करुन १ ल्या मजल्यावर नविन फर्निचरसहीत सुरु केला, त्याचे उद्घाटनही त्यांच्या मातोश्रीनेच केलं. आशा डायनिंग हॉलबाबत अनेक महत्त्वाच्या घटना लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. वैदीकाश्रम ही जागा धनराज गिरजी यांची, त्यांनी तेथे वेदपठण शाळा होती, पण पुढे ती १९४० मध्ये बंद पडली, आणि तेथे विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरु झालं, अर्थात एखाद्या चाळी सारखं ते होतं आणि दरमहा भाडे होतं फक्त ५ रुपये पण ते देण्याचीही अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती नसे,कै. पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव पुण्यात शिक्षणासाठी होते, त्यावेळी ते येथे रहावयास होते आणि त्यांची कायम स्वरुपाची रुम नं. ५५ होती, अशी आठवण प्रकाश किणी सांगतात, तर सुरेश किणींनी शरदराव पवारांसंदर्भातील १९६२ ची घटना सांगितली, शरदराव बी.एम.सी.मध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून निवडुन आले, त्यांचे सहकारी गुलालाने माखुन तेथे जेवणांस आले होते, त्यावंळी हात धुण्यासाठी वॉश बेसिन वगैरे कांही नसे, बॅरलमधून पाणी घेऊन हात धुणे अशी पद्धत. त्या सर्वांच्या गुलालाचे हातामुळे संपूर्ण बॅरल रंगून गेला आणि पाणी शिल्लक राहिले नाही, ही बाब शरदरावांना समजली त्यांनी तेथे येऊन सर्व मित्रांना सांगितले येथील बादल्या घ्या आणि त्याच रस्त्यावर एल.डी.भावे गॅस गोडावून शेजारी विहीर होती तेथून पाणी भरुन आणा. 
आशा डायनिंग मध्ये येणाऱ्या नामवंतांची यादी मोठी आहे, मोहन वाघ, मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी, दिलीप प्रभावळकर, जितेंद्र जोशी, सुधीर गाडगीळ हे तर उल्हास पवार, गिरीश बापट, अंकुश काकडे, मोहन जोशी हे नियमीत जेवणांस येणारे ग्राहक आहेत. शिवाय यशवंतराव गडाख, शिवाजीराव गिरीधर पाटील, धुळे, दिलीप सोपल, शंकरराव कोल्हे, गणपतराव देशमुख, मधुकरराव चव्हाण हे पुण्यात आल्यावर येथे आवर्जून भेट देतात. बी.के. एस. अय्यंगार हे स्वत: तर त्यांचेकड येणारे परदेशी पाहुणे आजही येथेच जेवणास येतात असे प्रकाश किणी अभिमानाने सांगतात.

 (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)


Web Title: Specialty dining rooms :aasha dining hall
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.